लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणे देशभक्तीचे अनुसरण करणे हेच खरे पुण्यस्मरण !

उद्या १ ऑगस्ट या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

१. भारताच्या पारतंत्र्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी केलेले कार्य ! 

अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट

उद्या १ ऑगस्ट, म्हणजे लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण ! १ ऑगस्ट १९२० या दिवशी लोकमान्य टिळक यांनी देशभक्तीसाठी देह ठेवला. १०० वर्षे उलटून गेली, तरी लोकमान्यांच्या स्मृती भारतीय जनमानसातून पुसल्या गेलेल्या नाहीत. पारतंत्र्याच्या त्या काळात भारतीय समाज एखाद्या थंड गोळ्यासमान निद्रिस्त झाला होता. ब्रिटिशांच्या जुलुमी, अन्यायकारी राजवटीच्या ओझ्याखाली दबला होता. आपले स्वत्व, अस्मिता हरवून बसला होता. आपल्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास त्याच्या पूर्ण विस्मृतीत गेला होता. ब्रिटीश पारतंत्र्याचे जोखड उलथवून टाकून स्वातंत्र्य मिळवण्याचा विचार तर सोडाच; परंतु त्यांच्या अन्यायकारक निर्बंधांच्या विरोधात ‘ब्र’ही काढण्याचे धाडस त्याच्या अंगी नव्हते. अशा परिस्थितीत लोकमान्य टिळक पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्या वेळी वासुदेव बळवंत फडके यांनी सरकारच्या विरोधात बंड पुकारले आणि तरुणांना समवेत घेऊन सशस्त्र क्रांतीला प्रारंभ केला. ब्रिटिशांनी ती क्रांती सर्व सामर्थ्यानिशी दडपून टाकली आणि वासुदेव बळवंत फडके यांना फाशीची शिक्षा  दिली. हा अन्याय टिळकांच्या मनावर खोल जखम करून गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मित्र गोपाळ आगरकर यांच्यासह सरकारी नोकरी न स्वीकारता देशसेवेचे व्रत अंगीकारले. त्यांनी समविचारी सहकार्‍यांना समवेत घेऊन १ जानेवारी १८८० या दिवशी पुण्यामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. शिक्षणासह राष्ट्रभक्तीचे धडे देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयही चालू केले.

२. धर्महित आणि राष्ट्रहित जपणारे टिळक ! 

कालांतराने त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे चालू केली. त्या माध्यमातून टिळक यांनी ब्रिटिशांकडून होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडली. टिळकांचा आग्रह होता की, आधी भारताला स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे आहे. ते मिळाल्यावर समाजसुधारणा करता येतील. हिंदु धर्मातील रुढींसंदर्भात इंग्रजांचे साहाय्य घेणे, म्हणजे त्यांना आपल्या धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करण्यास वाव देणे सर्वथा अयोग्य आहे. वर्ष १८८५ मध्ये भारतात ‘अखिल भारतीय काँग्रेस’ची स्थापना करण्यात आली. प्रतिवर्षी तिचे अधिवेशन भरवले जायचे. महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक हे जहाल पक्षाचे अध्वर्यू होते. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांमध्ये जाऊन त्यांचे जहाल विचार जिद्दीने मांडत राहिले. राष्ट्रहित हाच त्यांचा यामागील उद्देश होता.

३. टिळकांचे कार्य – केसरी ते गणेशोत्सव ! 

१९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब केला. त्यामुळे हिंदु-मुसलमान, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात संघर्ष पेटू लागला. परिणामी वर्ष १८९३ मध्ये हिंदु-मुसलमानांच्या दंगलींना प्रारंभ झाला. मुंबईमध्येही मोठा दंगा झाला. त्यात हिंदूंची अवस्था दयनीय झाली. हे कळल्यावर लोकमान्य टिळक यांना संताप अनावर झाला. त्यांनी ‘केसरी’तून या दंग्यांवर सडेतोडपणे लेख लिहिले. ‘सरकार पक्षपातीपणा करून मुसलमानांची बाजू घेते आणि हिंदूंचे दमन करते; म्हणून दंगे होतात. या दंगलींना सरकारच सर्वस्वी उत्तरदायी आहे’, असे निर्भीड प्रतिपादन त्यांनी केले. हिंदू संघटित होऊन त्यांच्यात स्वधर्माभिमान जागृत आणि आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यानंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सवही आरंभला.

४. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

वर्ष १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आल्यावर रोग्यांना शोधण्यासाठी ब्रिटीश अधिकारी रँड याने नागरिकांच्या घरांची झडती घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. यामुळे संतप्त होऊन चापेकर बंधूंनी शेवटी रँडचा खून केला. या कटाचा सूत्रधार शोधण्यासाठी ब्रिटिशांनी अनेकांची धरपकड चालू केली. दडपशाही चालू झाली. तेव्हा टिळक यांनी संतप्त होऊन ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’, हा जळजळीत लेख लिहिला. ‘रँडच्या खूनाचा कट टिळक यांनी रचला’, या संशयावरून त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला भरला. टिळक यांना १८ मासांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

५. राजद्रोहाच्या खटल्याखाली सरकारने लोकमान्य टिळक यांना कारागृहात पाठवले !

ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात टिळकांनी ‘देशाचे दुर्दैव’ या मथळ्याखाली लेख लिहिला. ‘जहाल तरुणांच्या वागण्याला सरकारचे दडपशाहीचे धोरणच कारणीभूत आहे’, असे स्पष्टपणे लिहिले. हे सरकारला सहन न झाल्याने हा राजद्रोह समजून पुन्हा एकदा टिळक यांना कारावासात पाठवण्याचा चंग सरकारने बांधला. आणखी सबळ कारणासाठी त्यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा स्फोटक द्रव्यांची माहिती असलेल्या २ पुस्तकांची नावे लिहिलेला कागद त्यांच्या हाती लागला. त्याआधारे सरकारने टिळक यांचा बाँबस्फोटाच्या घटनांशी संबंध जोडून त्यांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना ६ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना मंडाले येथील कारागृहात ठेवण्यात आले. या कालावधीत टिळक यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. वर्ष १९१६ मध्ये लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे काँग्रेसच्या अधिवेशनातील भाषणात टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, हा ऐतिहासिक मंत्र भारतियांना दिला. एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.

६. निःस्पृह, कणखर आणि बाणेदार नेत्याची आवश्यकता ! 

भारतातील सद्यःस्थिती सामाजिक, राजकीय परिस्थिती पहाता लोकमान्य टिळक यांच्यासारख्या निःस्पृह, कणखर, बाणेदार नेत्याची आवश्यकता आहे. टिळक यांनी स्वतःच्या प्रपंचाकडे त्रयस्थाप्रमाणे बघून देशाच्या प्रपंचासाठी सर्वस्व अर्पण केले. ‘केवळ पुण्यतिथीच्या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण करण्यापेक्षा वर्षाचे सर्वच दिवस त्यांच्या देशभक्तीचे अनुसरण करण्याचा निश्चय केला, तरच खर्‍या अर्थाने त्यांना आदरांजली वाहिली’, असे म्हणता येईल. अशा या महान विभूतीस कोटी कोटी प्रणाम !

संकलक : अधिवक्त्या (श्रीमती) श्रुति भट, अकोला