(म्हणे) ‘पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न !’ – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील

मुंबई – महाराष्ट्रात शहरी नक्षलवादी आणि त्यांच्या संस्था यांवर कारवाईचा बडगा उगारणारा ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ‘पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्यासाठी हा कायदा केला जात असल्या’चे विधान केले आहे. (देशाच्या शत्रूची बाजू घेणारे पक्ष देशात दुफळीखेरीज दुसरे काय माजवणार ? असे नेते असल्यामुळेच काँग्रेसच्या काळात नक्षलवाद वाढला ! – संपादक)

पोलिसांना कारवाया करणे सोपे जावे, यासाठी होत असलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याची अत्यंत आवश्यकता आहे. अध्यादेशाद्वारे हा कायदा होणार आहे; मात्र हा कायदा होतांना तज्ञांचे अभिप्राय, जनतेमध्ये चर्चा, विधीमंडळात चर्चा इत्यादी होत नसल्याविषयी जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे एखाद्या संघटनेला अनधिकृत म्हणून घोषित करण्याचे अधिकार शासनाला प्राप्त होणार आहेत, असे म्हणून त्यांनी या विधेयकाला विराेध केला आहे. (देशाच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यात अशा प्रकारे खोट घालणार्‍यांमुळेच आतापर्यंत शत्रूचे फावले आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • शहरी नक्षलवाद्यांवर थेट पंतप्रधानांच्या हत्येच्या कट रचल्याचा आरोप आहे. नक्षलवादी कारवायांचा भक्कम आधार असलेले आणि त्यांच्यापेक्षा संख्येने कितीतरी पट अधिक शहरी नक्षलवादी हे विविध संस्था चालवून, तसेच कलेच्या नावाखाली सरकार आणि देश विरोधी प्रसार करतांना सातत्याने आढळून आले आहेत. असे असतांना जयंत पाटील यांना असलेला शहरी नक्षलवाद्यांचा पुळका काय दर्शवतो ?
  • देशाच्या शत्रूंची तळी उचलून धरणार्‍या अशा राष्ट्रविरोधी पक्षांना देशप्रेमी नागरिकांनी आता त्यांची जागा दाखवून द्यावी !