मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी ४५ लक्ष्य ठेवणार्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. सर्वाधिक २८ जागा लढवणार्या भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. अनेक केंद्रीय मंत्री, दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या युतीविषयी टीका केली आहे. तर ‘कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश आहे, हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले, तरी तेवढेच कारण नसून ते केवळ हिमनगाचे टोक आहे’, अशा शब्दांत ‘विवेक’ साप्ताहिकामधून भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
लोकसभेतील अपयशाच्या कारणांची चर्चा होतांना सर्वांकडून राष्ट्रवादी काँग्रेससमवेतची युती हे कारण प्रामुख्याने पुढे येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना ते आवडलेले नाही, हे लक्षात येते. निवडणुकीच्या अपयशामागे अन्यही अनेक कारणे आहेत.
भाजपमधील कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपचे सर्वांत मोठे बलस्थान आहे, ती प्रक्रियाच पुढील काळात अल्प होत जाईल कि काय, अशी एक प्रकारची भीती वा शंका कार्यकर्त्यांच्या मनात आहे. ‘भाजप ‘वॉशिंग मशीन’ (धुलाई यंत्र) आहे’, ‘भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे’, अशा प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला; परंतु दुसरीकडे समाज माध्यमातून हिंदुत्वाची बाजू मांडणार्या ज्येष्ठ मंडळींविषयी अपप्रचार झाला, त्यामुळे गावागावांत चुकीचा संदेश गेला’, याकडेही ‘विवेक’मधील लेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.