वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा चौथा दिवस (२७ जून) : हिंदु राष्‍ट्रसाठी वैचारिक आंदोलन

हिंदु राष्‍ट्राच्‍या ‘नॅरेटिव्‍ह’च्‍या विरोधात लढण्‍यासाठी बौद्धिक योगदान द्या ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था


विद्याधिराज सभागृह – सद्य:स्‍थितीत विषयाचा प्रॉपगंडा (प्रचार) करून राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात ‘नॅरेटिव्‍ह’ (कथानक) पसरवले जात आहेत. यामागे एखादी व्‍यक्‍ती असल्‍याचे वरवर दिसत असले, तरी यामागे राष्‍ट्रविरोधी शक्‍ती कार्यरत आहेत.  मार्क्‍सवादी, नास्‍तिकतावादी, पुरोगामी, मिशनरी हे एकत्रितपणे येऊन अजेंडा (कार्यसूची) ठेवून काम करत आहेत. भारताला तोडण्‍याचा आणि हिंदु धर्म नष्‍ट करण्‍याचा त्‍यांचा डाव आहे. अकलाख (उत्तरप्रदेशातील दादरी येथे गोहत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणात जमावाने त्‍यांची हत्‍या केली होती.) याच्‍या हत्‍येनंतर हे पुरस्‍कार वापसीची चळवळ वापरतात; मात्र राजस्‍थानमधील कन्‍हैयालाल (नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिल्‍यामुळे धर्मांधांनी त्‍यांचा शिरच्‍छेद केला) यांच्‍या हत्‍येनंतर मात्र हे मौन बाळगतात. हे लोक लव्‍ह जिहादविषयी बोलत नाहीत. एकीकडे ही मंडळी धर्माला ‘अफूची गोळी’ म्‍हणतात, तर दुसरीकडे केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करतात. निवडक घटनांविषयी हे शांतता बाळगतात. यांचा सामना करण्‍यासाठी हिंदूंनाही एकत्रित कार्य करावे लागेल.

चित्रपटसृष्‍टी, सामाजिक माध्‍यमे, न्‍यायव्‍यवस्‍था, राजकारण, क्रीडा, कला आदी माध्‍यमांतून राष्‍ट्र आणि हिंदु धर्म विरोधी कथानक सिद्ध करण्‍याचे काम झालू आहे. मागील १० वर्षांत या सर्व क्षेत्रात मोठे वैचारिक ध्रुवीकरण झाले आहे. त्‍यामुळे पुढील ५ वर्षे आपल्‍यासाठी महत्त्वाची आहेत. बौद्धिक समाज मतभेदामुळे एकत्रित कार्य करत नाही, असे म्‍हटले जाते; मात्र भविष्‍यात हा निष्‍कर्ष पालटावा लागेल. बौद्धिक मतभेद विसरून हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी हिंदूंना एकत्रित कार्य करावे लागेल. ‘ब्रेन वॉशिंग’ म्‍हणजे खर्‍या अर्थाने बुद्धी शुद्ध करून बौद्धिक युद्धामध्‍ये सहभागी व्‍हावे लागेल, असे वक्‍तव्‍य सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या चौथ्‍या दिवशी ‘हिंदु विचारमंथन महोत्‍सव : वैचारिक आंदोलनाची दिशा’ या विषयावर बोलतांना केले.

हिंदूंविना भारताचे अस्‍तित्‍व शक्‍य नाही आणि भारताविना हिंदू सुरक्षित नाहीत ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, संरक्षणततज्ञ

कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

विद्याधिराज सभागृह – सनातनच्‍या समर्पणामुळे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनामुळे हे राष्‍ट्र अजून टिकून आहे. याच समर्पणामुळे यावर्षी भाजपच्‍या लोकसभेत २४० जागा निवडून आल्‍या आहेत. हिंदूंविना भारताचे अस्‍तित्‍व शक्‍य नाही आणि भारताविना हिंदू सुरक्षित नाहीत. वर्ष २०२४ ची लोकसभा निवडणूक हे एक युद्ध होते. या युद्धात आपण रक्‍तबंबाळ झालो; पण शेवटी विजय आपलाच झाला आहे, असे वक्‍तव्‍य संरक्षणततज्ञ कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या चौथ्‍या दिवशी केले. ते ‘राष्‍ट्रावर होणारे आघात’ या विषयावर बोलत होते.

विरोधकांच्‍या षड्‍यंत्रांना भारतीय बळी पडतात, हे लज्‍जास्‍पद !

कर्नल म्‍हणाले, ‘‘मुसलमानांना कुराण आणि राज्‍यघटना यांमध्‍ये श्रेष्‍ठ काय ? किंवा ख्रिस्‍त्‍यांना ‘बायबल आणि राज्‍यघटना यांमध्‍ये श्रेष्‍ठ काय आहे ?’, हे विचारले, तर त्‍यांचे उत्तर काय असेल, हे आपल्‍याला ठाऊक आहे. विरोधकांच्‍या ‘इकोसिस्‍टिम’नुसार भारत हे राष्‍ट्र नसून भूमीचा केवळ तुकडा आहे. या ‘इकोसिस्‍टिम’चा प्रारंभ बहुचर्चित ‘तुकडे तुकडे’ आंदोलनापासून झाला. या आंदोलनानंतर ‘हिंदूंची प्रतिक्रिया काय असेल ?’, ‘या आंदोलनाला विरोध करणारे किती आहेत ?’, ‘तटस्‍थ किती आणि समर्थन करणारे किती असणार आहेत ?’, याची हे आंदोलन एक चाचणी होती. दुर्दैवाने यात तटस्‍थ आणि विरोधकांच्‍या सूत्राचे समर्थन करणारे अधिक होते. हे आपल्‍यासाठी लज्‍जास्‍पद आहे.’’

‘सनातनच्‍या ग्‍लोबलायझेशन’ची विरोधकांना भीती !

ते म्‍हणाले, ‘‘विरोधकांना सर्वाधिक धोका ‘सनातनच्‍या ग्‍लोबलायझेशन’पासून आहे. गांधींनाही यांचाच धोका होता. त्‍यामुळे त्‍यांनी भगतसिंह आदी क्रांतीकारकांची फाशी थांबवली नाही, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची काळ्‍यापाण्‍याची शिक्षा थांबवली नाही. या भीतीमुळेच त्‍यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाचे त्‍यागपत्र द्यायला लावले होते. या ‘सनातन ग्‍लोबलायझेशन’ला नेहरू आणि इंदिरा गांधी यांचाही विरोध होता.’’

भारतातील ‘ट्रान्‍सजेंडर’चे उदात्तीकरण धोकादायक ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, पंचकुला, हरियाणा

श्री. नीरज अत्री

विद्याधिराज सभागृह – शस्‍त्रक्रियेद्वारे लिंगपालट केले, तरी व्‍यक्‍तीच्‍या मनातील भावना पालटता येत नाहीत. त्‍यामुळे अशा व्‍यक्‍तींचे जीवन नरकमय होते; मात्र प्रप्रोगंडा (प्रचार) करून याला ‘आधुनिकता’ असल्‍याचे दाखवले जात आहे. एकदा लिंगपालट केला, तर पुन्‍हा शस्‍त्रक्रियाकरून पुन्‍हा मूळ रूपात आणता येते नाही. विदेशामध्‍ये यामुळे शेकडो लोकांचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त झाले आहे. भारतातही युवा पिढीला याचे शिकार बनवले जात आहे. चित्रपटांमध्‍ये अशी पात्र जाणीवपूर्वक दाखवून त्‍यांचे उद्दात्तीकरण केले जात आहे. भारत सरकारच्‍या आरोग्‍याच्‍या आयुष्‍यमान योजनेमध्‍ये ‘तृतीयपंथींसाठी असलेल्‍या पर्यायामध्‍ये ‘ट्रान्‍सजेंडर’ हा पर्याय देण्‍यात आला आहे. याद्वारे या शब्‍दाला प्रसारित केले जात आहे. यामध्‍ये लिंगपालट करण्‍याचा व्‍यय सरकारकडून ५ लाख रुपयांपर्यंत साहाय्‍य करण्‍याची योजना आहे. यामागे मोठी ‘मेडिकल लॉबी’ आहे.

अमेरिकेमध्‍ये लिंगपालट करण्‍याचा निर्णय महाविद्यायातील विद्यार्थ्‍यांना घेता येतो. यामध्‍ये पालकांनी आडकाठी आणण्‍याचा प्रयत्न केला, तर त्‍यांना दोषी ठरवले जाते. भारतातही आरोग्‍य विम्‍याच्‍या नावाखाली हे काम चालू झाले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकारी याला प्रोत्‍साहन देत आहेत. केंद्रशासनाच्‍या महिला आणि बाल कल्‍याण विभागाच्‍या संकेतस्‍थळावरून याचे अधिकृतपणे प्रसार केला जात आहे. शस्‍त्रक्रियेद्वारे मुलाला मुलगी बनवणे आणि मुलीला मुलगा बनवणे म्‍हणजे लिंगपालट करणार्‍यांना ‘वोकीजम’ म्‍हटले जाते. विदेशात चालणारे हे प्रकार भारतातही चालू झाले आहेत. भारतासाठी हे अतिशय घातक आहे, असे वक्‍तव्‍य हरियाणातील विवेकानंद कार्य समितीचे अध्‍यक्ष श्री. नीरज अत्री यांनी केले. ते ‘वोकिझम : राष्‍ट्रघातकी विचार’ या विषयावर बोलत होते.

संगणकीय माहितीचे राक्षसीकरण रोखण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये धर्मप्रेमी भारतियांची उपस्थिती आवश्यक ! – प्रा. के. गोपीनाथ, ऋषिहूड विश्वविद्यालय, बेंगळुरू, कर्नाटक

प्रा. के. गोपीनाथ

रामनाथी (गोवा) –  कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) ही प्रणाली अंदाज बांधण्याशी संबंधित आहे. माहिती (डेटा) गोळा करणे, तिचा एकमेकांशी संबंध जोडणे आणि या माहितीच्या आधारे अंदाज वर्तवणे, अशी ही प्रक्रिया असते. अंदाज वर्तवण्याची पद्धत पुष्कळ पूर्वीपासून आपल्याकडे आहे. खगोलशास्त्रामध्ये ग्रहणाविषयी अंदाज वर्तवला जातो. विविध ग्रहांच्या स्थितीची गणना करून ग्रहणाविषयी अंदाज वर्तवला जातो. ‘एआय’ ही प्रणाली पूर्णपणे अंदाजावर आधारित आहे. तार्किक आणि संख्यात्मक माहितीच्या आधारे हा अंदाज वर्तवला जातो.

‘चॅटजीपीटी’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित प्रणालीमध्येही साठवलेल्या माहितीच्या आधारे पुढचा अंदाज वर्तवला जातो. ‘एआय’ ही प्रणाली अनेक प्रकारच्या माहितीवर आधारलेली आणि उच्च स्तरावरील अंदाज वर्तवण्याशी संबंधित आहे. त्यासाठी तिला पुष्कळ मोठा ‘डेटा’ संग्रहित करण्याची आवश्यकता असते. भारतीय संस्कृतीशी संबंधित माहिती कृत्रिम बुद्धीमत्तेला मिळण्यासाठी धर्मप्रेमी भारतियांची सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये उपस्थिती आवश्यक आहे. तसे न झाल्यास ‘एआय’ प्रणालीला जो भेदभावयुक्त ‘डेटा’ पुरवला जात आहे, त्यामध्ये सुधारणा होणार नाही आणि त्यातून या माहितीचे मोठ्या प्रमाणात राक्षसीकरण होईल.

पोर्तुगीज आणि ब्रिटीश इतिहासकारांनी समकालीन तंत्रज्ञानाचा वापर करून चुकीची माहिती संग्रहित केली आणि त्याआधारे भारत देश अन् भारतीय यांना अपकीर्त केले. ब्रिटीशांनी याच माहितीच्या आधारे भारतात ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचा वापर केला. त्या काळी भारतियांविषयी खोटी कथानके सिद्ध केली गेली. भारतीय समाज हा पूर्वीपासून आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत असल्याने भारतात बौद्धिक स्तरावरील सर्व ठिकाणी बाह्यशक्तींनी नियंत्रण मिळवले आहे. बाह्यशक्ती भारताविषयी मोठ्या प्रमाणात माहिती एकत्र करतात आणि नंतर ती त्यांच्या कलाने मांडतात.

‘एआय’ प्रणाली कुठलीही संकल्पना मांडण्यासाठी ‘व्हेक्टर’चा (गणितीय पद्धतीने माहिती संरक्षित करणे) वापर करते. अधिकाधिक ‘डेटा’ गोळा करून ‘व्हेक्टर’ची व्याप्ती वाढवली जाते. ही प्रक्रिया वेळकाढू आणि महाग आहे. ‘एआय’ हा सध्याचा मोठा खेळगडी आहे; कारण तो पुष्कळ मोठी माहिती कुशलतेने हाताळत आहे. त्यामुळे     ‘एआय’ला योग्य माहिती पुरवली जाणे आवश्यक आहे.