वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन – द्वितीय दिवस (२५ जून) : विविध राज्‍यांमधील हिंदूंची दुर्दशा

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशीचे पहिले सत्र

हिंदूंनी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेण्‍यासमवेतच उपासनाही केली पाहिजे ! – स्‍वामी साधनानंद महाराज, मुख्‍य संयोजक, भारत सेवाश्रम संघ (पूर्वोत्तर क्षेत्र)

स्‍वामी साधनानंद महाराज

रामनाथ सभागृह – हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांचे रक्षण करणे आपले कर्तव्‍य आहे. हिंदु धर्म हा दुर्बलांचा नाही. हिंदूंनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्‍ण यांच्‍याप्रमाणे अन्‍यायाच्‍या विरोधात लढले पाहिजे. त्‍यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेण्‍यासमवेतच उपासनाही केली पाहिजे, असे मार्गदर्शन भारत सेवाश्रम संघ (पूर्वोत्तर क्षेत्र) चे मुख्‍य संयोजक स्‍वामी साधनानंद महाराज यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या दुसर्‍या दिवशी केले.

स्‍वामी साधनानंद महाराज म्‍हणाले,

१. हिंदु धर्मजागृती हे मानवी उत्‍थानाचे कार्य आहे. त्‍यामुळे हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांचा अधिकाधिक प्रसार केला पाहिजे. हिंदु धर्म टिकला, तर आपण सुरक्षित रहाणार आहोत.

२. आम्‍ही सर्व धर्माचा आदर करतो; परंतु जे हिंदु धर्माचा आदर करत नाहीत, त्‍यांना कायद्याने शिक्षा करावीच लागते. अन्‍यायाच्‍या विरोधात लढणे, हे आपले कर्तव्‍य आहे.

३. सध्‍या हिंदू संघटित नाहीत. त्‍यामुळे ते असुक्षित आहेत. जेव्‍हा हिंदू संघटित होतील, तेव्‍हाच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईल आणि हिंदूंची दुर्गती थांबेल.

४. भारत सेवाश्रम संघाचे संस्‍थापक स्‍वामी प्रणवानंद म्‍हणाले होते, ‘हिंदूंच्‍या सर्व देवतांच्‍या हातांमध्‍ये शस्‍त्रे आहेत. त्‍यामुळे हिंदूंनीही दुर्बल न रहाता बलशाली झाले पाहिजे.’ हे जाणून घेऊन भारत सेवाश्रम संघाच्‍या वतीने हिंदूंना संरक्षण प्रशिक्षण दिले जाते.

५. हिंदूंवर लव्‍ह जिहाद, धर्मांतर असे विविध आघात होत आहेत. त्‍याविरोधात सेवाश्रम संघ वैध मार्गाने लढतो. सेवाश्रम संघ धर्मांतर थांबवण्‍यासमवेत धर्मांतरित झालेल्‍या लोकांना परत हिंदु धर्मात घेण्‍याचे कार्य करतो. यासमवेतच गरिबांसाठी शाळा, रुग्‍णालये, वसतीगृहे चालवणे, असे विविध कार्य करतो.

भारतीय संस्कृतीचे उगमस्थान काश्मीर असल्याने तेथून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी ! – विठ्ठल चौधरी, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर, देहली

श्री.विठ्ठल चौधरी

रामनाथ देवस्‍थान – काश्मीर हे भारतीय संस्कृतीचे उगमस्थान आहे. काश्मीरचा इतिहास गौरवशाली आहे. अनेक थोर ऋषिमुनी, वीरपुरुष काश्मीरमध्ये होऊन गेले; परंतु ओजस्वी इतिहास असलेल्या काश्मीरमध्ये सद्य:स्थितीत हिंदूंची दुरवस्था झाली आहे. काश्मीरमध्ये सनातन धर्माचा प्रसार होईल, तेव्हाच भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. आक्रमकांनी काश्मीरला हिंदूंपासून हिरावून घेतले आहे.

वामन अवतारामध्ये भगवान विष्णूने पहिल्या पावलात बळीराजाकडून भूमी घेतली. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठीचे पहिले पाऊल काश्मीरमध्ये टाकायला हवे. हिंदु राष्ट्राची स्थापना काश्मीरमधून व्हावी. १५ व्या शतकापासून काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंचे विस्थापन चालू आहे. वर्ष १९९० मध्ये झालेले काश्मिरी हिंदूंचे ७ वे विस्थापन आहे. मागील १०० वर्षांत काश्मिरी हिंदूंचे ४ वेळा विस्थापन झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे भारतियांना काश्मीरमधील स्थिती कळली; परंतु तोपर्यंत हिंदूंना याची माहिती नव्हती, हे आमचे दुर्दैव आहे. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या १४.१ टक्के होती. सद्य:स्थितीत काश्मिरी हिंदूंची संख्या ०.००१ टक्के इतकी आहे. काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ‘एक भारत अभियान’ राबवण्यात आले. यासाठी भारतात विविध ठिकाणी २० मोर्चे काढण्यात आले, १०० सभा घेण्यात आल्या. याला २५० हून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला. आता पुन्हा या अभियानाचा दुसरा टप्पा राबवण्याची आवश्यकता आहे, असे मत श्री. विठ्ठल चौधरी यांनी ‘काश्मिरी पुनर्वसन कसे होईल ?’, या विषयावर बोलतांना केले.

तमिळनाडूतील कन्याकुमारी आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये चर्चची सत्ता चालते ! – अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), तमिळनाडू

श्री.अर्जुन संपत

रामनाथी देवस्‍थान – तमिळनाडूमध्ये ‘सेक्युलॅरिजम’ शेष राहिलेले नाही. येथील हिंदूंना ‘ते हिंदु आहेत’, हेच ठाऊक नाही. त्यांना ते केवळ तमिळ असल्याचे ज्ञात आहे. तमिळनाडूत सध्या सत्तेवर असलेले भारतविरोधी, सनातनविरोधी आणि ब्राह्मणविरोधी आहेत. सत्ताधारी द्रमुकसारख्या द्रविडी पक्षाचे नेते सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करत आहेत. तमिळनाडूतील लोक हिंदु धर्माचे पालन करतात; मात्र निवडणुकीत द्रमुकला निवडून देतात. हिंदूंमध्ये जागृती होत असल्यामुळे तमिळनाडू ही पुढे सनातन भूमी होणार आहे. हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.

तमिळनाडूमध्ये हिंदु लोकसंख्या न्यून होत आहे आणि मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. ही सत्यस्थिती आहे. आता ते ‘व्होट जिहाद’चा (हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी पक्षांना एकगठ्ठा मतदान करणे) अवलंब करत आहेत. तमिळी ख्रिस्त्यांमध्ये केवळ बिशपची (चर्चमधील वरिष्ठ पाद्री) सत्ता चालते. तमिळनाडूतील कन्याकुमारी आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये चर्चची सत्ता चालते; कारण तिथे ख्रिस्ती बहुसंख्य आहेत. द्रमुक सरकार हे क्रिप्टो ख्रिस्ती (ख्रिस्तीहित समोर ठेवून चालवलेले) सरकार आहे. राज्यातील २०० पेक्षा अधिक मंदिरे द्रमुक सरकारने उद्ध्वस्त केली.

श्री. अर्जुन संपत पुढे म्‍हणाले की,

१. तमिळनाडूमध्‍ये हिंदु लोकसंख्‍या अल्‍प होत आहे आणि मुसलमानांची लोकसंख्‍या वाढत आहे. ही सत्‍यस्‍थिती आहे. आता ते ‘वोट जिहाद’चा (हिंदुविरोधी आणि राष्‍ट्रविरोधी पक्षांना एकगठ्ठा मतदान करणे) अवलंब करत आहेत.

२. तमिळी ख्रिस्‍त्‍यांमध्‍ये केवळ बिशपची (चर्चमधील वरिष्‍ठ पाद्री) सत्ता चालते. चर्चला देतात. तमिळनाडूतील कन्‍याकुमारी आणि इतर काही जिल्‍ह्यांमध्‍ये चर्चची सत्ता चालते; कारण तिथे ख्रिस्‍ती बहुसंख्‍य आहेत.

३. द्रमुक सरकार हे क्रिप्‍टो ख्रिस्‍ती (ख्रिस्‍तीहित समोर ठेवून चालवलेले) सरकार आहे. हिंदु मते विभागली गेली आहेत. राज्‍यातील २०० पेक्षा अधिक मंदिरे द्रमुक सरकारने उद़्‍ध्‍वस्‍त केली.

४. शहरी नक्षलवाद्यांच्‍या विरोधातील सर्व खटले द्रमुक सरकारने मागे घेतले आहेत. तमिळनाडूमध्‍ये १६० हिंदु कार्यकर्त्‍यांची जिहाद्यांनी हत्‍या केली आहे.


हिंदूंनी साधना आणि क्षात्रतेज त्‍यागल्‍याने लव्‍ह जिहादसारख्‍या घटनांमध्‍ये वाढ ! – यति मां चेतनानंद सरस्‍वती, महंत, डासना पीठ, गाजियाबाद, उत्तरप्रदेश

यति मां चेतनानंद सरस्‍वती

रामनाथी देवस्‍थान – स्‍वातंत्र्यप्राप्‍तीनंतर भारतातील काही हिंदु स्‍त्रिया स्‍वेच्‍छेने अधर्मीयांसमवेत जात आहेत. चित्रपटसृष्‍टीला होत असलेल्‍या इस्‍लामी अर्थपुरवठ्याद्वारे ‘लव्‍ह जिहाद’चे बीजारोपण केले जात आहे. चित्रपटसृष्‍टीद्वारे ‘लव्‍ह जिहाद’चे नरेटिव्‍ह (कथानक) सिद्ध करून हिंदु धर्मामध्‍ये स्‍त्रियांना दुय्‍यम लेखले जात असल्‍याचे सांगितले जात आहे. हिंदु धर्म मागास असल्‍याचेही दाखवण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय स्‍त्रियांचा इतिहास पहाता इतिहासात अनेक वीरांगना आणि विदुषी होऊन गेल्‍याचे आपल्‍याला आढळते. हिंदु युवतींना हिंदु धर्माचे शिक्षण दिले गेले असते, तर ‘लव्‍ह जिहाद’चे संकट ओढवले नसते. सद्य:स्‍थितीत केवळ हिंदु युवतीच नव्‍हे, तर विवाहित स्‍त्रियाही लव्‍ह जिहादला बळी पडत आहेत.

उत्तरप्रदेशमध्‍ये योगी आदित्‍यनाथ यांचे सरकार आल्‍यावर हिंदु युवतींच्‍या छेडछाडीच्‍या घटना नियंत्रणात आल्‍या आहेत; परंतु पूर्णपणे थांबलेल्‍या नाहीत. हिंदूंनी शत्रूबोध जाणून घेतला नाही, ही आपली सर्वांत मोठी चूक आहे. स्‍वत:च्‍या कुटुंबाला तरी हिंदूंनी शत्रूबोध करून द्यावा. हिंदूंनी साधना आणि क्षात्रतेज सोडून दिल्‍यामुळे लव्‍ह जिहादसारख्‍या घटना वाढल्‍या आहेत. सध्‍या लोकसभेच्‍या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ३७ खासदार निवडून आले. त्‍यामुळे पुढील वर्षे  संघर्षाचा काळ आहे. हिंदूंनी ही लढाई लढण्‍यासाठी सज्‍ज रहावे, असे आवाहन यति मां चेतनानंद सरस्‍वती यांनी केले. ‘उत्तरप्रदेशमधील लव्‍ह जिहादचे सत्‍य आणि त्‍यावरील उपाययोजना’ या विषयावर त्‍या बोलत होत्‍या.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवातून धर्मकार्यासाठी ऊर्जा मिळते ! 

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवातून धर्मकार्यासाठी ऊर्जा प्राप्‍त होते. या महोत्‍सवात मिळणार्‍या धर्मबोधामुळे येथून आपल्‍या क्षेत्रात गेल्‍यावर सक्षमपणे धर्मकार्य करता येते. या महोत्‍सवामुळे संस्‍कारांचे पूनर्जीवन होत आहे. हिंदूंनी या महोत्‍सवातून धर्मकार्यासाठी ऊर्जा प्राप्‍त करावी. ‘धर्मकार्यासाठी समर्पित होऊन कार्य कसे करावे ?’, याची शिकवण या महोत्‍सवात दिले जाते. जेव्‍हा समर्पित होऊन आपण धर्मकार्य करू, तेव्‍हा भारतच नव्‍हे, विश्‍वामध्‍ये हिंदु धर्माची स्‍थापना करता येईल, असे उद़्‍गार यति मां चेतनानंद सरस्‍वती यांनी काढले.

महिलांची ओळख सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित करू नका ! 

अनेक ठिकाणी हिंदु स्‍त्रिया स्‍वतःची माहिती सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित करतात. तसेच ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडलेल्‍या हिंदु युवतींची माहितीही प्रसारमाध्‍यमावरून प्रसारित केली जाते. यामुळे जिहादी आतंकवाद्यांपासून लव्‍ह जिहादला बळी पडलेल्‍या हिंदु युवतींच्‍या जिवाला धोका निर्माण होतो. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्‍थितीत हिंदु महिलांनी, तसेच अन्‍य कुणीही महिलांची ओळख सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करू नये, असे आवाहन यति मां चेतनानंद सरस्‍वती यांनी केले.


सर्व समस्‍यांच्‍या निवारणासाठी साधना करणे, हाच उपाय ! – स्‍वामी निर्गुणानंद पुरी, कोषाध्‍यक्ष आणि शाखा सचिव, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी, बंगाल

स्‍वामी निर्गुणानंद पुरी

रामनाथी देवस्‍थान – साम्‍यवाद्यांच्‍या राजवटीत बंगालमधील राजकीय स्‍थितीची अधोगती झाली. साम्‍यवादी सरकारने आपली परंपरा आणि संस्‍कृती यांची न भरून येणारी हानी केली. या कालावधीत हिंदु समाजाची स्‍थिती अतिशय वाईट झाली. हिंदूंनी मंदिरात जाणे बंद केले. आज बंगालमध्‍ये हिंदू गाव सोडून पलायन करत असल्‍याने तेथील गावे ओस पडली आहेत.

ही गावे मुसलमानांनी कह्यात घेतली आहेत. येथील आदिवासी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना हिंदु धर्मापासून दूर केले जात आहे. त्‍यांना ‘ते हिंदु नाहीत’, असे सांगितले जात आहे. खोटी कथानके रचून या लोकांना फसवले जात आहे. समाजात फूट पाडली जात आहे. सर्व समस्‍यांच्‍या निवारणासाठी साधना करणे, हाच उपाय आहे, असे उद़्‍गार बंगालचे स्‍वामी निर्गुणानंद पुरी यांनी काढले. ते ‘बंगालमध्‍ये हिंदूसंघटनाच्‍या समोरी आव्‍हाने आणि उपाय’ या विषयावर बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले की, समस्‍या वाढल्‍या कि शत्रू बलवान होतो. आपण आपल्‍या शत्रूला ओळखले पाहिजे आणि त्‍याच्‍यापासून दूर पळून न जाता त्‍याला धाडसाने सामोरे गेले पाहिजे. आपण कथानकांना सामोर जाण्‍यासाठी प्रतिकथानक सिद्ध केले पाहिजे.