‘सनातन आश्रम’ सकारात्मक ऊर्जा देणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ! – बैठकीतील हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय
‘१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील विद्याधिराज सभागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने ‘हिंदु जनजागृती समिती’द्वारा आयोजित दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले.
या अधिवेशनात उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथून अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथे असलेला सनातनचा चैतन्यमय आश्रम पाहिला. अधिवेशनानंतर उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठांसाठी एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जे अधिवेशनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि जे काही कारणास्तव सहभागी होऊ शकले नाहीत, अशा सर्व हिंदुत्वनिष्ठांना आमंत्रित केले होते. या बैठकीत एकूण ५४ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. त्यांपैकी काही जणांनी अधिवेशन आणि सनातन आश्रम या संदर्भात स्वतःचे अनुभवकथन केले. ते पुढे दिले आहेत.
१. हिंदु राष्ट्र अधिवेशनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय
१ अ. अधिवक्ता शेषनारायण पांडे, गोरखपूर, उत्तरप्रदेश.
‘अनेक संस्था राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करत आहेत; परंतु या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांना आंतरिक प्रेरणा मिळाली. मला असे वाटत होते की, जणू साक्षात् परमेश्वर स्वतःच येऊन अधिवेशनाचे संचालन करत आहे. तेथे मला ‘स्वयंशिस्त आणि धैर्याने आपले कार्य करत रहाणे’, अशी प्रेरणा मिळाली. मला आश्रमातील सर्व साधकांकडून साधेपणा, सहजता आणि शालीनता अनुभवायला मिळाली. आश्रमात प्रत्येक ठिकाणीच सात्त्विकता दिसून येत होती. मी या ईश्वरी राज्य स्थापनेच्या महान कार्यात सहभागी होऊ शकलो. त्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. मी हिंदु राष्ट्रासाठी माझ्या भागातील २० ते २५ लोकांना एकत्रित बोलावून साप्ताहिक बैठकीचे आयोजन करण्याचा निश्चय केला आहे.’
१ आ. अधिवक्ता कमलेश कुमार गुप्ता, गुवाहाटी, आसाम.
‘गोव्यामध्ये ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ एवढ्या व्यापक स्तरावर होईल’, अशी मी कधीही कल्पना केली नव्हती. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने हे भव्य आयोजन यशस्वी आणि सार्थक करणारे होते. ‘हिंदु जनजागृती समिती’ सर्व हिंदूंचे संघटन करण्याचे कार्य प्रत्यक्षरित्या करत आहे. अनेक प्रतिष्ठित अधिवक्ते, मोठमोठ्या हिंदु संघटना आणि संस्था यांनी या अधिवेशनामध्ये सहभाग घेतला होता. अधिवेशनातील सर्व सत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण होती. मी सर्व कार्यकर्त्यांचा सेवाभाव पाहून भारावून गेलो. मला हे अधिवेशन ‘विशेष ऊर्जेने ओतप्रोत भरलेले आणि दैवी शक्तीयुक्त आहे’, असे जाणवले. ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे एवढे परिश्रम घेऊन अत्यंत प्रशंसनीय प्रयत्न करत आहेत. येथे सर्व कार्यकर्त्यांचा ‘विनम्रतेने बोलणे’ हा गुण मी स्वतः अनुभवला. आयोजनात कसलीही त्रुटी नव्हती. सनातन आश्रम खरोखर अद्भुत आहे आणि ‘आश्रमात दैवी शक्तींचे अस्तित्व आहे’, हे मला तेथे प्रत्यक्ष गेल्यावरच लक्षात आले. आश्रम पाहून माझे मन आनंदी आणि शांत झाले. ‘मला येथील निर्मळ वातावरणात रहाण्यासाठी पुनःपुन्हा संधी मिळावी’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’
१ इ. श्रीमती बबिता महापात्रा, राऊरकेला, ओडिशा.
‘अधिवेशनाच्या काळात तेथील पाहुण्यांची व्यवस्था पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. कार्यकर्त्यांचे वागणे आणि सेवाभाव पुष्कळ चांगला होता. तेथून आल्यानंतर ‘नामजप आणि साधना करणे’, हा माझ्या दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला आहे. तेथून आल्यावर मला ‘स्वतःमध्ये पालट करणे महत्त्वाचे आहे’, याची जाणीव झाली. मी ‘सर्वांत प्रथम स्वतःमध्ये, नंतर शेजारीपाजारी आणि त्यानंतर गाव यांच्यामध्ये पालट करायचे आहेत’, असा दृढनिश्चय केला आहे. अधिवेशनामुळे ‘सर्व हिंदुत्वनिष्ठांचे हे एक मोठे कुटुंबच आहे’, असे मला जाणवले.’(क्रमशः)
– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उत्तरप्रदेश आणि बिहार. (२८.०७.२०२२)