‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव पहाण्याची मला सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी मला आलेले काही अनुभव आणि अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ‘या घोर कलियुगात जन्म घेऊन आम्हा सर्व साधकांना साक्षात् देवाला पहाता आले’, या विचाराने कृतज्ञता व्यक्त होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील रथयात्रेत नृत्य करणारे साधक आणि साधिका टाळ वाजवत जात असतांना अकस्मात् माझ्या डोळ्यांत भावाश्रू यायला लागले. ‘माझ्या जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये गुरुदेवांनी मला तारले आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्या कृपेने साधना करत आहोत. माझ्या मनात ‘अशा या गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव पहाण्याची मला संधी मिळाली’, असा विचार आला. ‘गुरुदेवांची कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करावी’, तेच मला कळत नव्हते. ‘सर्व साधकांनी अनेक वेळा गुरुदेवांची लीला अनुभवलेली आहे. आज केवळ अन् केवळ गुरुदेवांना पहाण्यासाठी सर्व साधक एवढा लांबचा प्रवास करून आले आहेत. त्या सर्वांना आज गुरुदेव प्रत्यक्ष दर्शन देत आहेत. ‘या घोर कलियुगात जन्म घेऊन आम्हा सर्व साधकांना साक्षात् देवाला पहाता आले’, या विचाराने माझ्या मनात कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पहाण्यासाठी धडपडत असतांना ‘अगं, मी तुझ्या हृदयातच आहे’, असे त्यांनी सांगणे
जसजशी कार्यक्रम संपण्याची वेळ जवळ येत होती, तसतसे ‘तो कार्यक्रम संपूच नये आणि आपण गुरुदेवांना पहातच रहावे’, असे मला वाटत होते. मी जेथे बसले होते, तेथून मला गुरुदेव व्यवस्थित दिसत नव्हते. ‘ते मला कुठून दिसतील ?’, या विचाराने मी सारखे वाकून इकडे-तिकडे पहात होते. त्यांना पहाण्यासाठी मी धडपडत होते. तेव्हा गुरुदेव मला आतून म्हणाले, ‘अगं, मी तुझ्या हृदयातच आहे. ते अनुभव.’ त्यानंतर मी गुरुदेवांना मध्ये मध्ये माझ्या हृदयातच अनुभवले. ‘आपला प्रत्येक विचार त्या देवापर्यंत (गुरुदेवांपर्यंत) किती लवकर पोचतो’, याचे मला आश्चर्य वाटले.
३. ब्रह्मोत्सवाच्या वेळी रथयात्रेला आरंभ झाल्यावर ‘निसर्ग स्तब्ध झाला असून तोही गुरुदेवांना पहाण्यात मग्न झाला आहे’, असे जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि चित्शक्ति अंजली गाडगीळ यांना पहातांना साधकांना स्वतःचा विसर पडणे
ब्रह्मोत्सवाच्या वेळी रथयात्रेला आरंभ झाल्यावर ‘निसर्ग अगदी स्तब्ध झाला आहे आणि तोही गुरुदेवांना पहाण्यात मग्न झाला आहे’, असे मला जाणवले. सहस्रो साधकांची उपस्थिती असली, तरी वातावरण एकदम शांत होते. त्या वेळी सर्व साधक केवळ तिन्ही गुरूंना, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि चित्शक्ति अंजली गाडगीळ यांना डोळे भरून पहात होते. ‘तिन्ही गुरूंना पाहून साधक स्वतःला विसरले आहेत’, असे मला वाटले.
४. ब्रह्मोत्सवाचे स्थळ पहातांना ‘स्वभावदोष आणि अहं यांपासून मुक्त करून गुरुदेव साधकांना त्या रथात घेऊन जाणार आहेत’, असे वाटणे
ब्रह्मोत्सवाचे स्थळ पहातांना ‘आम्ही सर्व साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या रणभूमीत असून त्यांच्याशी लढत आहोत’, असे वाटले. त्यानंतर ‘गुरुदेव आम्हाला गीता सांगत असून ते स्वभावदोष आणि अहं यांपासून आम्हाला मुक्त करत आहेत, तसेच ते आम्हा सर्व साधकांना त्या रथयात्रेत घेऊन जाणार आहेत’, असे मला वाटले.
५. ‘निर्जीव वस्तूंनाही आनंद होत आहे’, हे अनुभवायला मिळणे
‘ड्रोन’च्या माध्यमातून पुष्पवृष्टी करतांना तो ‘ड्रोन’ही अगदी आनंदाने गुरुदेवांच्या जवळ जात होता. ‘ड्रोन’ गुरुदेवांच्या जवळ येतांना आनंदाने नृत्य करत येत आहे’, असे मला दिसले. ‘गुरुदेवांच्या दर्शनाने निर्जीव वस्तूंनाही किती आनंद होत आहे’, हे मला अनुभवायला मिळाले.
६. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, ब्रह्मोत्सव ‘न भूतो न भविष्यति ।’, असाच आहे. आजपर्यंत अशा प्रकारचे दृश्य पाहिले नव्हते आणि या पुढेही पहायला मिळणार नाही. ब्रह्मोत्सव दाखवल्याबद्दल आणि या सामान्य जिवालाही त्यात सहभागी करून घेतल्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, फोंडा, गोवा. (१२.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |