वैशाख शुक्ल दशमी (१८.५.२०२४) या दिवशी सनातनचे पहिले संत पू. भार्गवराम प्रभु यांचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पणजी पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना जाणवलेली त्यांची यज्ञाविषयी जिज्ञासा आणि जाण येथे देत आहोत.
पू. भार्गवराम प्रभु यांच्या चरणी त्यांच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. आम्ही (मी आणि पू. भार्गवराम) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अल्पाहार घेण्यासाठी गेल्यावर पू. भार्गवराम ‘अन्नपूर्णे सदा पूर्णे…’ हा श्लोक म्हणत होतो. त्यानंतर महाप्रसाद ग्रहण करण्याच्या वेळी ध्वनीक्षेपकावर लावलेला पुढील श्लोक ऐकला.
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक २४
अर्थ : ज्या यज्ञात हवी अर्पण करण्यासाठी लागणारी स्रुवा (लाकडी पळी) आदी साधनेही ब्रह्म आहेत आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मात स्थित असणार्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.
हा मंत्र पू. भार्गवराम यांना ठाऊक नव्हता. मी पू. भार्गवराम यांना सांगितले, ‘‘आजपासून हे दोन्ही मंत्र म्हणून जेवायला प्रारंभ करायचा.’’ मी त्यांना हा मंत्र ४ वेळा सांगितल्यावर त्यांचा हा मंत्र मुखोद्गत झाला. त्या संदर्भात आमच्यात झालेले संभाषण येथे दिले आहे.
२. पू. भार्गवराम यांनी यज्ञाविषयी जाणून घेणे
२ अ. ‘यज्ञ करतांना भात, तूप, समिधा आदी वस्तू ज्यात घालतो, तो अग्नी’, असे पू. राधा प्रभु यांनी सांगणे
पू. भार्गवराम : अग्नी म्हणजे काय ?
मी : यज्ञ करतांना भात, तूप, समिधा इत्यादी वस्तू ज्यात घालतो, तो अग्नी.
पू. भार्गवराम : अग्नी ते खातो का ?
मी : हो.
२ आ. पू. राधा प्रभु यांनी ‘आहार घेणे’, हा यज्ञच आहे’, असे सांगणे
मी : आपण आहार घेतो, तो एक प्रकारचा देवाचा यज्ञच आहे. तुम्ही देवस्थानात, रामनाथी आश्रमात पाहिले आहे. यज्ञात अग्नी असतो !
पू. भार्गवराम : अरे बापरे ! पण आपल्या पोटाला लागत नाही ना, अज्जम्मा (पणजी).
मी : पोटातील अग्नी आपण खाल्लेले अन्न पचवतो. तो अग्नी आपल्या डोळ्यांना दिसत नाही.
२ इ. पू. भार्गवराम यांनी ‘यज्ञ करतांना मंत्र म्हणतात’, असे सांगणे
पू. भार्गवराम : आपण बागेतील कचरा गोळा करून जाळतो ना ? तो यज्ञ आहे का ?
मी : नाही.
पू. भार्गवराम : आपण बागेत अग्नी पेटवतांना मंत्र म्हणत नाही; म्हणून त्याला ‘यज्ञ’ म्हणत नाही. योग्य आहे ना, अज्जम्मा ? बागेत करतो, तो केवळ अग्नी, त्या वेळी मंत्र म्हणत नाहीत. देवस्थानात, रामनाथी आश्रमात करतो तो यज्ञ. तेव्हा मंत्र म्हणतात. आहार घेणे हा यज्ञ; परंतु तो अग्नी दिसत नाही. तो अन्नाचे पचन करतो.
३. पाच वर्षांच्या बालकाने दिलेले हे स्पष्टीकरण ऐकून मला अतिशय आनंद झाला. माझी भावजागृती झाली. मी पू. भार्गवराम यांना विचारले, ‘‘तुला इतके सगळे विषय कसे समजतात ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ते तुमच्यामुळे आणि प.पू. गुरुदेवांमुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे) समजतात, अज्जम्मा.’’
– पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या संत आणि पू. भार्गवराम यांच्या पणजी), मंगळुरू (१०.४.२०२३)
पू. भार्गवराम प्रभु यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याची पुष्कळ ओढ असणे
पू. भार्गवराम प्रभु यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायला पुष्कळ आवडते. त्याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. पू. भार्गवराम त्यांची आई सौ. भवानी यांना पुनःपुन्हा विचारत असतात, ‘‘आई, आमची परीक्षा केव्हा संपेल ? आपण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात केव्हा जाणार ?’’
२. आम्ही आश्रमात जायच्या दिवशी ते स्वतःहून सकाळी उठतात. ते अंघोळ किंवा अल्पाहार करण्यासाठी हट्ट करत नाहीत.
३. आम्ही चारचाकीने मंगळुरू या आमच्या गावाहून निघून अनुमाने १० कि.मी. अंतर पार केल्यावर पू. भार्गवराम ‘‘रामनाथी आले का ?’’, असे ८ ते १० वेळा तरी विचारतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, ‘‘रामनाथी अजून दूर आहे. तुम्ही झोपा. तुम्ही झोपून उठेपर्यंत आपण आश्रमाच्या जवळ पोचू.’’ तेव्हा ते आम्हाला विचारतात, ‘‘नक्की उठवाल ना ?’’ एकदा आम्ही मार्गात भोजन करण्यासाठी थांबलो होतो. त्या वेळी पू. भार्गवराम यांनी ५ मिनिटांतच भोजन केले आणि आम्हाला सांगितले, ‘‘आपण लवकर निघूया. आपल्याला पुढे जायला उशीर होत आहे.’’
४. आम्ही गोवा राज्यात प्रवेश केल्यावर पू. भार्गवराम यांनी त्याविषयी ओळखून ते ‘‘आता आपण रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या जवळ आलो आहोत’’, असे म्हणून नाचू लागले.
५. आम्ही त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला आश्रमात जायला का आवडते ?’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तेथे प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु गाडगीळकाका (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) आहेत. ते सर्व जण माझ्यावर पुष्कळ प्रेम करतात.’’
– पू. (श्रीमती) राधा प्रभु, मंगळुरू (१०.४.२०२३)