डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात श्री. विक्रम भावे यांना २५ मे २०१९ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केली. दाभोलकर यांच्या मारेकर्यांना रस्ता दाखवण्याचा फुकाचा आरोप सीबीआयने केला होता. कोणताही पुरावा नसतांना केवळ सूड घेण्यासाठी सीबीआयच्या अधिकार्यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना या प्रकरणात गोवले. अधिकार्याने विक्रम भावे यांचा कशा प्रकारे मानसिक छळ केला, तसेच गाव गुंडांप्रमाणे त्यांना कशा प्रकारे धमक्या दिल्या, याविषयीचे अनुभव श्री. विक्रम भावे यांनी मांडले आहेत.
गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !
(हा लेख वाचकांसाठी पुनर्प्रसिद्ध करत आहोत. – संपादक)
खोटी साक्ष देण्यास नकार दिल्याने भावे यांना अटक
१. सीबीआयने अधिवक्ता पुनाळेकर यांच्या विरोधात खोटी साक्ष न दिल्यास अटक करणार असल्याचे धमकावणे
२४ मे २०१९ या दिवशी मी माझ्या रत्नागिरी येथील घरी असतांना मला निरोप मिळाला की, मला आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. मी तातडीने निघालो आणि रात्री उशिरा पनवेल येथे पोचलो. दुसर्या दिवशी म्हणजे २५ मे २०१९ या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मी आणि अधिवक्ता पुनाळेकर सीबीआयच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात पोचलो. तेथे पोचताच मला आणि अधिवक्ता पुनाळेकर यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवले गेले. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयच्या एका अधिकार्याने मला त्याच्या कार्यालयीन कक्षात बोलावले आणि सांगितले, ‘‘आम्ही तुमच्या वकिलांना म्हणजे अधिवक्ता पुनाळेकरांना अटक केली आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात साक्ष देत असाल, तर तुम्हाला सोडतो अन्यथा तुम्हालाही अटक करू.’’
२. अधिकार्याचा ‘प्रस्ताव’ न स्वीकारल्याने भावे यांना अटक !
त्यावर मी संबंधित अधिकार्याला म्हणालो, ‘‘मी पुनाळेकरांच्याच विरोधात काय, अन्य कुणाच्याही विरोधात खोटी साक्ष देणार नाही; कारण तसे करून मी इथल्या न्यायालयातून मुक्त होईन; पण वरच्या (ईश्वराच्या) न्यायालयात मला क्षमा केली जाणार नाही. त्यामुळे मी कुणाच्याही विरोधात खोटी साक्ष देण्याचा प्रश्नच येत नाही.’’ मी हे उत्तर दिल्यावर त्या अधिकार्यांनी २ साक्षीदारांना बोलावून त्यांच्या समक्ष माझ्या अटकेचे सोपस्कार पूर्ण केले आणि मी दाभोलकर हत्या प्रकरणातील एक आरोपी बनलो.
राज्यघटनेचा खून करणारे सीबीआयचे अधिकारी !
डॉ. दाभोलकर हत्येच्या तपासाच्या नावाखाली व्यक्तीगत सूडाने पेटेलेल्या अधिकार्याने जे काही उद्योग केले, त्यामुळे सीबीआय या अन्वेषण यंत्रणेचे हसे झाले आहे. सीबीआयमध्ये कित्येक अधिकारी आणि कर्मचारी सचोटीने काम करणारे आहेत; मात्र त्यांची ती सचोटी या अधिकार्यांसारख्या कूपमंडूक वृत्तीच्या अधिकार्यांमुळे कलंकित होते आहे. असे अधिकारी खड्यासारखे बाजूला काढून सगळ्याच अन्वेषण यंत्रणांमधील प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना न्याय दिला पाहिजे. दाभोलकर हत्या प्रकरणात अन्वेषण अधिकाऱ्यांनी जे काही केले, त्याला केवळ आणि केवळ ‘राज्यघटनेची हत्या’ असेच म्हणावे लागेल. देशातील अन्वेषण यंत्रणा, प्रशासन, न्यायालये, सरकारे इत्यादी सगळ्यांनी या अधिकार्यांच्या दुष्कृत्यांची नोंद घेतली नाही, तरी ईश्वराच्या न्यायालयात त्याची नोंद झालीच आहे. ईश्वर योग्य वेळी न्याय करील !
– श्री. विक्रम भावे
निरपराध्यांना फासावर चढवू पहाणारे असे पोलीस म्हणजे ‘खाकी वर्दीतील गुंड’ असे कुणी म्हटल्यास आश्चर्य ते काय ?
सनातनविषयी मन कलुषित करण्याचा सीबीआय अधिकार्याचा कट भावे यांनी उधळला !
१. सनातनने भावे यांच्या जेवणात विष कालवून त्यांना ठार मारल्याचा कट रचल्याचे अधिकार्यांनी त्यांना सांगणे
अटकेनंतर २ दिवसांनी अन्वेषण अधिकारी माझ्याकडे येऊन मला म्हणाले, ‘‘आम्ही तुमच्या आश्रमातील व्यवस्थापकांचे फोन ‘टॅप’ केले. तेव्हा त्यांचे असे संभाषण ऐकायला आले की, विक्रम भावे याने यापूर्वी संस्थेसाठी ५ वर्षे कारावास भोगला आहे. आता परत त्याला कारागृहात जावे लागणार आहे. तेव्हा या वेळी सुटून आल्यावर विक्रम भावे संस्थेत एखादे मोठे पद मागेल आणि आपल्याला ‘नाही’ म्हणता येणार नाही. तेव्हा आताच त्याच्या जेवणात विष कालवून त्याला मारून टाकूया. अशा प्रकारे तुमच्या संस्थेचे लोकच तुम्हाला मारायला टपलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल, तर मी तुमच्यासाठी बाहेरून किंवा आश्रमातून येणारे जेवण बंद करून माझ्या घरून तुमच्यासाठी जेवण आणत जाईन.’’
२. आश्रमातील विषही प्रसाद म्हणून ग्रहण करण्यास सिद्ध असल्याचे सांगितल्यावर अधिकारी रागाने निघून जाणे
माझे मन कलुषित करण्यासाठी तपास अधिकारी वापरत असलेली ही एक युक्ती होती. मी त्यांना म्हणालो, ‘‘मी निरपराध असतांनाही तुम्ही मला अटक केली आहे. त्यामुळे तुमच्या घरचे पाणी पिणेही मी पाप समजतो. आश्रमाविषयी म्हणाल, तर आश्रमातील विषसुद्धा माझ्यासाठी प्रसाद असेल आणि ते खाऊन मेलो, तरी मला मुक्ती मिळेल. त्यामुळे तुमच्या घरच्या अन्नापेक्षा मी आश्रमातील विष खाणेच अधिक पसंत करीन.’’ माझ्या या उत्तरामुळे संबंधित अधिकारी वरमले अन् रागारागाने निघून गेले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शिवीगाळ करणारे सीबीआयचे अधिकारी !
एकदा अन्वेषण अधिकारी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘यार भावे, तुम्हारा वो बुढ्ढा गुरु डॉ. आठवले कहता है कि २०२५ मे हिन्दु राष्ट्र आएगा। मै दूर दूर तक देखता हूं मुझे कही हिन्दु राष्ट्र दिखाई नही देता, कैसे आएगा यार हिन्दु राष्ट्र ? यह सब तुम लोगों को (शिवी दिली) बनानेका का धंदा है। असल में तुम्हारा वो गुरु खुद (शिवी दिली) है।’’
माझ्या गुरूंविषयी असे उद्गार काढल्यावर मला प्रचंड राग आला. ‘मी रागाच्या भरात काहीतरी चूक करावी’, हाच त्याचा हेतू दिसत होता. त्यामुळे मी राग आवरून त्याला म्हणालो, ‘‘इस पाप का फल आपको इसी जनम में और वह भी आने वाले कुछ ही सालोमें मिलेगा। परंतु उस समय परिस्थिती ऐसी होगी कि, आप पश्चात्ताप भी नही कर पाएंगे। आप हिंदू है या नही, यह शंका आप के इस वक्तव्य से आपने उपस्थित की है।’’ हे ऐकल्यावर ते अधिकारी स्वत:च चिडून निघून गेले..
– श्री. विक्रम भावे
अधिवक्ता पुनाळेकर आणि भावे यांचा मानभंग करण्याचा सीबीआयचा अश्लाघ्य प्रयत्न फसला !
१. अटकेचा भावे यांच्यावर परिणाम न झाल्याचे पाहून सीबीआय अचंबित !
मला आणि अधिवक्ता पुनाळेकर यांना सर्वप्रथम न्यायालयात नेतांना आम्ही म्हणजे कुणी भयंकर आतंकवादी वगैरे असल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न सीबीआयच्या अधिकार्यांनी चालवला होता. आम्हाला न्यायालयापुढे नेण्यासाठी सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर काढत असतांना त्या अधिकार्यांनी आधीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून ठेवले होते. ‘आम्हाला अटक झाल्याचे वृत्त अधिकाधिक ठिकाणी झळकावे आणि प्रसारमाध्यमांचे इतक्या संख्येने आलेले प्रतिनिधी पाहून आमचे मनोधैर्य खच्ची व्हावे’, हाच त्याचा असे करण्यामागील उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र माझ्यावर दडपण आले किंवा माझे मनोधैर्य खच्ची झाले यांपैकी काहीही झाले नव्हते. ‘मी निरपराध आहे’, हे पोलिसांना ठाऊक असूनही मी खोटी साक्ष देण्यास नकार दिल्याने मला अटक केली’, या गोष्टीची मात्र मला प्रचंड चीड आली होती. माझ्या वागण्यातून ती व्यक्त होत होती. सीबीआयचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ती लक्षात येत होती. त्यांच्यापैकी एक जणांनी मला विचारले, ‘तुम्हाला दाभोलकरांच्या हत्येच्या प्रकरणात अटक झाली आहे आणि त्याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही ?’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘दाभोलकर म्हणजे कुणी लोकमान्य टिळक नव्हते. दाभोलकरांच्या खुनाला माझ्या लेखी काहीच महत्त्व नाही. त्यामुळे दाभोलकर किंवा त्यांचे खरे मारेकरी यांच्यापैकी कुणाशीही माझे काहीही देणे-घेणे नाही; मात्र मी निरपराध असतांनाही मला विनाकारण त्या प्रकरणात गोवले जात आहे, याची मला चीड आहे आणि ती कायम रहाणार.’’
२. भावे यांच्या परखड उत्तरामुळे अधिकारी अवाक् !
यावर ते अधिकारी म्हणाले, ‘‘आमच्या वरिष्ठांनी तुम्हाला अटक केली, याचा अर्थ तुमचा काहीतरी संबंध असणारच.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘तुमच्या अधिकार्यांनाही दाभोलकर आणि त्यांचे मारेकरी यांच्याशी काही देणे-घेणे नाही. त्यांनी त्यांचा व्यक्तीगत राग काढण्यासाठी अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक केली आहे आणि मी पुनाळेकरांच्या विरोधात साक्ष देत नाही म्हणून मला अटक केली आहे. माझ्यावर असा आरोप ठेवला आहे की, मी दाभोलकरांच्या मारेकर्यांना पुण्यातील रस्ते दाखवण्यासाठी म्हणजे रेकी करण्यासाठी साहाय्य केले; पण आज माझे तुम्हाला आणि तुमच्या वरिष्ठ अधिकार्यांना आव्हान आहे. माझ्यावर केलेल्या आरोपात कणभर जरी तथ्य असेल, तर माझ्या एकुलत्या एक मुलीचे शव खांद्यावरून स्मशानात नेण्याची वेळ देव माझ्यावर आणेल आणि जर हा आरोप खोटा असेल, तर तुम्हा सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर ती वेळ येईल.’’ मी असे म्हटल्यावर तो कर्मचारी अवाक् झाला आणि म्हणाला, ‘‘एकुलत्या एक मुलीची खोटी शपथ कुणी घेणार नाही. त्यामुळे तुम्ही निरपराध आहात, हे मला पटले. माझ्याकडून तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. उलटपक्षी माझ्याकडून होईल तेवढे साहाय्यच मी तुम्हाला करीन. मी देवाला प्रार्थना करीन की, माझ्या वरिष्ठांच्या पापात मी सहभागी नाही. त्यांचे पाप तेच भोगतील.’’
– श्री. विक्रम विनय भावे, मुंबई.