पू. भार्गवराम प्रभु ‘व्हिडिओ कॉल’द्वारे देहली सेवाकेंद्र पहात असतांना आणि सेवाकेंद्रातील साधकांशी संवाद साधतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. पू. भार्गवराम प्रभु यांच्यातील संतत्वाची आलेली प्रचीती 

‘२३.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु हे देहली सेवाकेंद्रातील सर्व साधकांशी ‘व्हिडिओ कॉल’वर बोलले. पू. भार्गवराम यांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे श्री गुरूंच्या पावन श्री चरणी अर्पण करते.

१ अ. पू. भार्गवराम यांच्या माध्यमातून देवाने वर्तमानकाळात रहायला शिकवणे : ‘पू. भार्गवराम यांना भ्रमणभाष करण्यापूर्वी आम्ही ‘प्रथम सर्व साधकांशी त्यांचा परिचय करून द्यायचा आणि नंतर संपूर्ण देहली सेवाकेंद्र दाखवायचे’, असे नियोजन केले होते. पू. भार्गवराम सद्गुरु पिंगळेकाका यांच्याशी बोलल्यानंतर त्वरित म्हणाले, ‘‘मला देहली सेवाकेंद्र पहायचे आहे.’’ परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेने नेहमी वर्तमानकाळात रहायला त्यांनीच शिकवले आहे.

१ आ. पू. भार्गवराम आणि त्यांच्या आई-वडिलांना सद्गुरु पिंगळेकाका यांच्या ठिकाणी साक्षात् परात्पर गुरुदेवांचे दर्शन होणे : आम्ही पू. भार्गवराम यांना प्रथम देहली सेवाकेंद्राच्या बाहेरील परिसर दाखवत होतो. त्याच वेळी सद्गुरु पिंगळेकाका सेवाकेंद्राच्या दारातून बाहेर आले. तेव्हा पू. भार्गवराम यांनी म्हटले, ‘‘काही क्षणांसाठी ‘व्हिडिओ’ पुसट झाला आणि सद्गुरु काका यांच्या ठिकाणी मला साक्षात् परात्पर गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) दिसले.’’ श्री. भरत प्रभु आणि सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांचे वडील आणि आई) यांनाही असेच जाणवले.

१ इ. ‘पू. भार्गवराम यांच्या दिव्य दृष्टीमुळे प्रत्येक खोलीतील अनिष्ट शक्तींचे आवरण दूर झाले आहे’, असे जाणवणे : आम्ही पू. भार्गवराम यांना सेवाकेंद्र दाखवत होतो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘प्रत्येक खोलीच्या आत जाऊन मला ती खोली दाखवा.’’ तेव्हा ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने पू. भार्गवराम यांच्या दिव्य दृष्टीमुळे प्रत्येक खोलीतील अनिष्ट शक्तींचे आवरण दूर झाले’, असे मला जाणवले.

१ ई. प्रसार करणार्‍या दोन साधिकांनी देहली सेवाकेंद्रात येणे, हे परात्पर गुरुदेवांचे नियोजन असल्याचे पू. भार्गवराम यांनी सांगणे : सर्व साधकांचा परिचय करून देण्यात येत होता. त्याच वेळी प्रसारातून दोन साधिका सेवा करण्यासाठी सेवाकेंद्रात आल्या होत्या. पू. भार्गवराम यांच्या दर्शनाचा त्यांना लाभ झाला, यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘आज तुमचे इथे येणे’, ही परात्पर गुरुदेवांचीच इच्छा आहे.’’

१ उ. पू. भार्गवराम यांना देहली सेवाकेंद्रातील खोल्या दाखवल्या जात होत्या. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ब्रह्मोत्सवानंतर सद्गुरु डॉ. पिंगळेकाका, परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र आणि संपूर्ण आश्रम पिवळ्या रंगाचे दिसत आहेत.’’ 

१ ऊ. ‘संतांचे सगळीकडे किती बारकाईने लक्ष असते’, हे शिकायला मिळणे : पू. भार्गवराम यांच्याशी बोलण्यासाठी सर्व साधक एका ठिकाणी एकत्र आले होते; परंतु महाप्रसाद बनवणारी साधिका येऊ शकली नव्हती. पू. भार्गवराम सेवाकेंद्र पहात असतांना म्हणाले, ‘‘जी साधिका स्वयंपाकघरात दिसत आहे. तिचा परिचय झाला नाही.’’ या प्रसंगामध्ये ‘संतांची कृपा कशी असते ? आणि त्यांचे लक्ष किती बारकाईने असते ?’, या गोष्टी परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून आमच्या लक्षात आणून दिल्या.

१ ए. ‘संत सूक्ष्मातून भ्रमण करतात’, याची प्रचीती येणे : पू. भार्गवराम यांना सेवाकेंद्राच्या गच्चीवरून मागचा परिसर दाखवत असतांना ते म्हणाले, ‘‘मी सर्वांत प्रथम येथेच आलो होतो.’’(‘प्रत्यक्षात पू. भार्गवराम कधीच देहलीला आले नाहीत’, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.) त्यांनी म्हटले, ‘‘आता वातावरणही पालटले आहे. आकाशातही पालट जाणवत आहेत.’’

१ ऐ. आकाशात गरुडाचे दर्शन झाल्यावर पू. भार्गवराम यांनी गरुड सेवाकेंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचे सांगणे : पू. भार्गवराम यांना सेवाकेंद्राच्या वरचा गच्चीचा भाग दाखवत असतांना आकाशाकडे छायाचित्रक (कॅमेरा) करताच, तेथे एक गरुडदेव आलेला दिसला. त्याला आम्ही याआधी कधीच पाहिले नव्हते आणि तो गरुड १५ सेकंदांनंतर पुन्हा कुठेतरी दूर निघून गेला. तेव्हा पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘गरुड सेवाकेंद्राला प्रदक्षिणा घालत आहे.’’

१ ओ. देहली सेवाकेंद्रात ठेवलेली सायकल पाहून पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘साधकांनी आपत्काळाची किती सिद्धता करून ठेवली आहे !’’

१ औ. पू. भार्गवराम यांना परात्पर गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटणे : देहली सेवाकेंद्र पाहून पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘परात्पर गुरुदेव साधकांवर किती प्रेम करतात ! परात्पर गुरुदेवांनी साधकांसाठी किती चांगल्या सुविधा दिल्या आहेत !’’ त्याविषयी त्यांना कृतज्ञता वाटली.

सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांचा पू. भार्गवराम यांच्याप्रती भाव (भक्ती) पाहून श्री गुरूंच्या पावन श्रीचरणी माझी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेवा, अशीच भावभक्ती आम्हा सर्व साधकांमध्ये निर्माण व्हावी’, अशी आपल्या श्रीचरणी प्रार्थना करतो.’

२. पू. भार्गवराम यांची आई सौ. भवानी प्रभु यांनी सांगितलेली इतर सूत्रे

२ अ. उत्तम निरीक्षणक्षमता : ‘देहली सेवाकेंद्राचे दर्शन झाल्यानंतर पू. भार्गवराम यांनी मंगळुरू (कर्नाटक) येथील बालसाधकांना आपल्या घरी बोलावून आणले आणि जसे श्री. श्रीराम लुकतुकेदादा यांनी त्यांना देहली सेवाकेंद्र दाखवले होते, हुबेहूब तसेच पू. भार्गवराम यांनी स्वतःचे घर सर्व बालसाधकांना दाखवले.

२ आ. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्याप्रती पू. भार्गवराम यांचा भाव : सद्गुरु काका ‘व्हिडियो कॉल’वर बोलणार आहेत, हे समजल्यावर पू. भार्गवराम यांनी ५ मिनिटांत अल्पाहार केला. नाहीतर प्रतिदिन त्यांना अल्पाहार करायला २० मिनिटे तरी लागतात.

२ इ. सद्गुरु काकांशी बोलल्यानंतर पू. भार्गवराम यांच्या चेहर्‍यावर ‘ॐ’ दिसत होता.

२ ई. प्रगती करण्याची तीव्र तळमळ : आम्ही आवरून खाली आलो. तेव्हा पू. भार्गवराम यांनी मला विचारले, ‘‘सद्गुरुचा अर्थ काय आहे ? आणि मला सद्गुरु व्हायचे असेल, तर काय करायला पाहिजे ? ‘पुढे कशी प्रगती करायची असते ?’, हे सर्व सद्गुरु मला शिकवतील का ?’’

यावर सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच तुम्हाला सद्गुरु बनवतील. तुम्ही रामनाथी आश्रमात गेलात की, सद्गुरु स्वाती खाडये किंवा अन्य सद्गुरूंचे जीवनपट दर्शवणार्‍या ध्वनीचित्रफिती (सी.डी.) आहेत, त्या पाहू शकता.’’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अपार कृपेने आम्ही सर्व साधक या अलौकिक संतभेटीचे (‘व्हिडिओ कॉल’द्वारे) साक्षीदार झालो. सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाला आनंदी ठेवणार्‍या आणि प्रत्येक कणाकणांत वास करणार्‍या प्राणप्रिय परात्पर गुरुदेवांच्या श्री चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. पूनम चौधरी , देहली सेवाकेंद्र, देहली. (५.८.२०२३)

पू. भार्गवराम प्रभु यांच्या भेटीच्या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त  पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांचा पू. भार्गवराम यांच्या प्रती पराकोटीचा भाव आणि पू. भार्गवराम यांचा सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या प्रती उच्च कोटीचा भाव !

‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाका स्वतः एकेक खोली उघडून पू. भार्गवराम यांना दाखवत होते. त्यावेळी सद्गुरु काका नेहमीपेक्षा अधिक झुकले होते. असे वाटत होते की, ते साक्षात् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनाही त्यावेळी सेवाकेंद्र दाखवत आहेत. पू.भार्गवराम हे ‘व्हिडिओ कॉल’वरून हे सर्व पहात होते. त्यांनी सद्गुरु काकांना म्हटले, ‘‘सद्गुरु काका,आपण एवढे फिरू नका. आपण एका जागी बसा.’’ सद्गुरु काका यांचा पू. भार्गवराम यांच्या प्रती पराकोटीचा भाव होता आणि पू. भार्गवराम यांचा सद्गुरु काका यांच्याप्रती असलेला उच्च कोटीचा भाव पाहून श्री गुरूंच्या पावन श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. आम्हाला गुरुदेवांनीच दोन संतांमधील हा अप्रतिम भाव पहाण्याचे साक्षीदार बनवले, यासाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

२.सद्गुरु डॉ. पिंगळेकाका पूर्वी रहात असणार्‍या खोली विषयी पू. भार्गवराम यांना माहिती नसूनही, तसेच त्या खोलीत इतर खोल्यांपेक्षा अल्प प्रकाश असूनही पू. भार्गवराम यांना ती खोली सर्वाधिक प्रकाशित वाटणे

सद्गुरु डॉ. पिंगळेकाका पूर्वी रहात असणारी खोली पहाताच पू. भार्गवराम यांनी म्हटले, ‘‘या खोलीत सर्वाधिक प्रकाश आहे.’’ (आता सद्गुरु डॉ. पिंगळेकाका दुसर्‍या खोलीत रहात आहेत.) त्यावेळी त्यांना ‘सद्गुरुकाका पूर्वी त्या खोलीमध्ये रहात होते’, हे सांगितले नव्हते. प्रत्यक्षात सर्व खोल्यांमध्ये आम्ही अधिक दिवे लावले होते आणि या खोलीत अल्प प्रकाश होता. आम्ही त्यांना सांगितले, ‘सद्गुरुकाका पूर्वी या खोलीत रहात होते. आता ते दुसर्‍या खोलीत रहात आहेत.’तेव्हा पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘मला पुन्हा एकदा सद्गुरुकाकांची खोली दाखवा.’’

हे सूत्र सद्गुरुकाकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘पूर्वीची खोली ईशान्य बाजूला होती. ईशान्य दिशेला देवतांचा वास असतो. तेथे साक्षात् परात्पर गुरुदेवांचा वास आहे.’’

३. स्वतःच्या प्रत्येक कृतीतून गुरुचरणी सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण देणारे सद्गुरु डॉ. पिंगळेकाका !

परात्पर गुरुदेवांचे सगुण रूप असलेल्या सद्गुरुकाका यांची प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार यांमध्ये आम्हा सर्व साधकांना ‘आपले सर्वस्व श्रीगुरूंचे आहे आणि ते त्यांनाच समर्पित करायचे असते’, ही शिकवण मिळते. ‘गुरुदेवा, आम्हा सर्व साधकांमध्ये हा दृष्टीकोन, हा भाव आणि अशी भक्ती निर्माण करा’, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना आहे.

४. छायाचित्रांमध्ये सद्गुरु डॉ. पिंगळेकाका हे पू. भार्गवराम यांच्यासारखेच लहान आणि पू.भार्गवराम सद्गुरुकाका यांच्यासारखे मोठे वाटणे

पू. भार्गवराम आणि सद्गुरु काका यांची ‘सेल्फी’ छायाचित्रे काढली. त्या दोन्ही छायाचित्रांमध्ये सद्गुरुकाका हे पू. भार्गवराम यांच्या सारखेच लहान आणि पू.भार्गवराम सद्गुरु काका यांच्या सारखे मोठे वाटत होते. सद्गुरुकाकांना पाहून ‘ते बालसंत आहेत’, असे वाटत होते. छायाचित्र दाखवल्यावर सद्गुरुकाकांना याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी तसे लिहायला सांगितले.

(‘सेल्फी’ छायाचित्र, म्हणजे भ्रमणभाषद्वारे स्वतःचे, तसेच स्वतःसह इतरांचे एकत्रित छायाचित्र स्वतःच काढणे.)

– कु.पूनम चौधरी