Forest Fire Reaches Temple: अल्मोडा (उत्तराखंड) जंगलातील आग मंदिरापर्यंत : भाविकांमध्ये चेंगराचेंगरी

डेहराडून – उत्तराखंडमधील जंगलातील आग भीतीदायक बनत चालली आहे. ५ मे या दिवशी अल्मोडा येथील जंगलातील आगीचा कहर दूनागिरी मंदिरापर्यंत पोचला. जंगलातील आगीने तेथील एका मंदिराला चारही बाजूंनी घेरले. आग दिसताच जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे धावू लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून भाविक सुखरूप आहेत. यंदा जंगलाला आग लागण्याच्या ८८६ हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण घायाळ झाले आहेत.
राज्य सरकारने जंगलांमधील आगीच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी हवाईदल आणि ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे साहाय्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार, वनविभागाने जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनात असलेल्या अग्निशमन दलाचे जवान आणि दैनंदिन कामगार यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.