Uttarakhand forest fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसत आहे !

वायूदलाच्या हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न

डेहराडून (उत्तराखंड) – गेल्या ४ दिवसांपासून उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. ही आग धुमसत असून ती आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, अग्नीशमन दल, पोलीस आणि सैनिकही प्रयत्न करत आहेत. वायूदलाच्या ‘एम्.आय.-१७’ हेलिकॉप्टर्समधून पाण्याची फवारणीही केली जात आहे.

सौजन्य The Economic Times

याआधीही वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये आग लागल्यावर‘ एम्.आय.-१७’ हेलिकॉप्टर्सचा वापर आगींवर नियंत्रणासाठी मिळवण्यासाठी करण्यात आला होता. आगीच्या धुरामुळे आसपासच्या लोकांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी जंगलात लागलेल्या आगीविषयी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

१. गढवाल विभागातील चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पौरी आणि टेहरी, डेहराडूनच्या जंगलात आग सतत नियंत्रणाबाहेर जात आहे. या भागात बहुतांशी पाइन झाडे असल्याने उष्णतेमुळे आग झपाट्याने पसरत आहे. अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी पाणी मिळत नाही.

२. कुमाऊं विभागातील नैनिताल, बागेश्‍वर, अल्मोडा आणि पिथौरागढ या भागांत जंगलाला आग लागून जंगले जळत आहेत. यासह वन्य प्राणीही ग्रामीण भागाकडे धाव घेत आहेत.

३. यावर्षी संपूर्ण उत्तराखंडमधील जंगलांमध्ये आगीच्या ५७५ घटनांची नोंद झाली आहे, ज्यांपैकी अनुमाने ६९० हेक्टर जंगल जळून राख झाले आहे. त्यामुळे अनुमाने १४ कोटी ४१ लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे.

आग लावणार्‍या ३ जणांना अटक !

रुद्रप्रयागच्या जंगलामध्ये आग लावत असतांना पोलिसांनी ३ जणांना अटक केली. नरेश भट्ट, हेमंत सिंह आणि भगवती लाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आतापर्यंत जाळपोळ प्रकरणी एकूण १९ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यांपैकी १६ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे.