Patanjali Case : विज्ञापनाच्या आकाराएवढे क्षमापत्र छापले का ? – सर्वोच्च न्यायालय

कथित अयोग्य विज्ञापन प्रसारित करणार्‍या ‘पतंजलि’च्या विरोधातील याचिका !

योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी एक आठवड्याच्या आत जनतेची विनाअट क्षमा मागावी, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर ‘पतंजलि’ने काही वर्तमानपत्रांत क्षमापत्र प्रसिद्ध केले आहे. असे असले, तरी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेतला. दोघांनी दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केल्याप्रकरणी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी न्यायप्रविष्ट आहे. २२ एप्रिल या दिवशी पतंजलिने अनेक वर्तमानपत्रांत क्षमापत्र प्रसिद्ध केले. दिशाभूल करणारे विज्ञापन प्रसिद्ध करणे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाही पत्रकार परिषद घेण,े यांप्रकरणी हे क्षमापत्र प्रकाशित करण्यात आले होते.

या क्षमापत्राविषयी पतंजलिचे अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला  सांगितले की, या विज्ञापनांसाठी १० लाख रुपयांचा खर्च आला असून ६७ वर्तमानपत्रांत हे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, तुम्ही केलेल्या विज्ञापनाच्या आकाराएवढे हे क्षमापत्र आहे का ? पुढील सुनावणी आता ३० एप्रिलला होणार असून प्रसिद्ध झालेल्या क्षमापत्रांची कात्रणे त्या वेळी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘भारतीय वैद्यकीय संस्थे’ने पतंजलिवर दिशाभूल करणारे विज्ञापन प्रसारित केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सुनावणी चालू आहे.