हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

बेंगळुरू बाँबस्फोटाचे छत्रपती संभाजीनगरपर्यंत धागेदोरे !

छत्रपती संभाजीनगर – काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) या तिघांची चौकशी करण्यात आली आहे. बेंगळुरू बाँबस्फोट प्रकरणातील फरार संशयित आतंकवादी अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब यांच्यासमवेत आभासी चलनाद्वारे (क्रिप्टोकरन्सी’द्वारे) व्यवहार केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला आहे. ज्यांची चौकशी करण्यात आली, त्या तिघांनीही शिक्षण अर्धवट सोडले आहे. तरीही ते लाखो रुपयांची कमाई करत असल्याने २ वर्षांपासून त्यांच्यावर अन्वेषण यंत्रणा पाळत ठेवून आहेत.

सौजन्य Lokshahi Marath

बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन ‘लॅपटॉप’, भ्रमणभाष यांसह ते वापरत असलेले अन्य ‘इलेक्ट्रॉनिक साहित्य’ जप्त करण्यात आले आहे. त्यात संशयित आतंकवाद्यांना ओळखत नसल्याचे त्या तरुणांनी सांगितले. जवळपास ८ घंट्याच्या चौकशीनंतर पथक मार्गस्थ झाले. त्यानंतर अधिक अन्वेषणासाठी त्या तरुणांना ए.टी.एस्.च्या (आतंकवादविरोधी पथकाच्या) कार्यालयात बोलावण्यात आले.

पसार आतंकवाद्यांवर १० लाख रुपयांचे बक्षीस !

अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणी पसार असलेल्या २ संशयित आतंकवाद्यांची नावेही उघड केली आहेत. अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब अशी त्यांची नावे आहेत. त्यांची माहिती देणार्‍यांना १० लाख रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले आहे. ते ‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये व्यवहार करत असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.