विदेशातही चालते मोदींची गॅरंटी (हमी) ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

नवी देहली – मोदींची गॅरंटी (हमी) देशात, तसेच विदेशातही चालते. लोकांचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. देशाविषयी अभिमानाची भावना पूर्वीपेक्षा अधिक आहे आणि लोकांचा विश्‍वासही वाढला आहे, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री डॉ. एस्.जयशंकर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘जेव्हा मी बाहेर (विदेशात) जातो आणि परराष्ट्र धोरण स्पष्ट करतो, तेव्हा मला कळते की, पंतप्रधान मोदी भारताप्रमाणेच विदेशातही काम करण्याची हमी देतात. मोदी यांची गॅरंटी भारतात जितकी वैध आहे, तितकीच परदेशातही वैध आहे’, असेही परराष्ट्रमंत्री म्हणाले.

या वेळी जयशंकर म्हणाले की, मोदी यांच्या गॅरंटीमध्ये राजकीय दबावाला बळी न पडता पेट्रोलचे वाजवी दर राखण्याचाही समावेश आहे. पाणी, वीज आणि आरोग्य सेवा या मूलभूत आवश्यकता पुरवल्या जातील, असा विश्‍वास आता लोकांना वाटत आहे.  पंतप्रधानांच्या गॅरंटीमुळे परराष्ट्र धोरणात अनेक पालट झाले आहेत. आतंकवाद रोखणे हेच आमचे ध्येय आहे. आपल्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश भारताच्या हिताचे रक्षण करणे हा आहे. त्यामुळे इतर देशांशी सहमत होऊन त्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक नाही.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जयशंकर म्हणाले की, हे ऐतिहासिक परिस्थिती सुधारण्याचे सूत्र आहे. भारताच्या फाळणीमुळे बाधित झालेल्यांप्रती न्यायपूर्ण आणि निष्पक्षपाती असणे महत्त्वाचे आहे. त्यांना कोणताही देश नव्हता आणि यामध्ये त्यांचा कोणताही दोष नव्हता.