पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी !

आंदोलन करतांना योग वेदांत सेवा समितीचे साधक आणि कार्यकर्ते

नवी मुंबई – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू हे मागील १० वर्षांपासून कारागृहात आहेत. आजारामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली असल्याने त्यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी श्री योग वेदांत समितीच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित एका आंदोलनात केली. या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.

श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. गोपाळ पुरोहित यांनी या वेळी सूत्रसंचालन केले. गोरेगाव आश्रमातून पुरोहित यांनी ही चळवळ चालू केली आहे. बापूजींना त्वरित आयुर्वेदिक उपचार मिळावेत, सत्य पडताळणी करून त्यांची सुटका करावी, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

या वेळी श्री योग वेदांत सेवा समितीच्या भगिनी करुणा निरवाने म्हणाल्या की, बापूजींनी सामाजिक उन्नतीसाठी आणि राष्ट्र प्रगतीसाठी पुष्कळ कार्य केले आहे. आयुर्वेदाचा प्रचार करून आदर्श जीवनपद्धतीचा मार्ग दाखवल्याने बहुराष्ट्रीय आस्थापनांची हानी झाली. तसेच ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारी धर्मांतरे बापूजींनी थांबवली. त्यानंतर बापूजींवर खोटे गुन्हे नोंद करण्याचे षड्यंत्र चालू झाले. आता बापूजींची स्थिती गंभीर असूनही त्यांना एक दिवसाचा जामीन किंवा पॅरोलही दिला जात नाही, हे त्यांच्या मानवी हक्कांचे हनन आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी म्हणाले की,  पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना विविध गंभीर आजार आहेत. असे असतांना त्यांच्या इच्छेनुसार योग्य उपचार मिळण्यापासून त्यांना वंचित का ठेवले जात आहे ? बापूजींना वैद्यकीय उपचार तातडीने न मिळाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करावे लागेल. बलात्कार, हत्या, बाँबस्फोट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांनाही दिलासा दिला जातो; पण पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना दिलासा दिला जात नाही, ही गंभीर गोष्ट आहे.

मुंबई युवा सेवा संघाचे संजय पाल म्हणाले की, धर्म जिवंत ठेवायचा असेल, तर मंदिराच्या स्थापनेसह संतांचीही आवश्यकता आहे. बापूजींनी रामायण, भागवत यांचा प्रचार केला, तरुणांना योग्य दिशा दाखवली आहे. अनंत सातपुते म्हणाले की, धर्मांतरितांची ‘घरवापसी’ केल्याने त्यांच्याविषयी षड्यंत्र रचले जात आहे.