Farmers Protest : देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच !

अंबाला (हरियाणा) – किमान हमी भावासाठी पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकर्‍यांचे आंदोलन दुसर्‍या दिवशीही कायम होते; मात्र पहिल्या दिवशी प्रमाणे दुसर्‍या दिवशी येथे मोठा हिंसाचार झाला नसला, तरी शेतकर्‍यांनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. त्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

देहलीच्या वेगवेगळ्या सीमांवर हे शेतकरी पायी आणि वाहने यांद्वारे पोचले आहेत. त्यांना देहलीत प्रवेश करून आंदोलन करायचे आहे; मात्र देहली पोलिसांनी सीमांवर अडथळे लावून त्यांना सीमेवरच रोखून धरले आहे. १३ फेब्रुवारी या दिवशी आंदोलनकर्ते शेतकरी शंभू सीमेवरून देहलीत घुसण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा पोलिसांसमवेत संघर्ष झाला. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच रबरी गोळ्यांचा गोळीबार केला. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात काही शेतकरी घायाळही झाले, तर अनेक शेतकर्‍यांना अटक करण्यात आली. किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत देहलीत जाणार आहेत.

हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा येथे इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. या आंदोलनामुळे देहलीच्या सीमेवरील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

समस्या निर्माण करून नाही, तर संवादातूनच तोडगा निघेल ! – केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा

कृषिमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, शेतकर्‍यांनी समजून घेणे आवश्यक आहे की, ज्या कायद्यांविषयी बोलले जात आहे, त्याविषयीचे निर्णय इतक्या लवकर घेता येणार नाही. आपण त्याचे सर्व पैलू विचारात घेतले पाहिजेत. सामान्य जनजीवन विस्कळीत होणार नाही आणि लोकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, याचीही काळजी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. समस्या निर्माण करून तोडगा निघत नाही. संवादातूनच तोडगा निघेल.