फर्रखाबाद (उत्तरप्रदेश) येथील रशीद मिया मकबर्‍याच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयाला होणार सादर !

मकबरा प्राचीन शिवमंदिर असल्याचे हिंदूंचे मत !

(मकबरा म्हणजे कबरीवरील मोठे बांधकाम)

रशिदाबादमध्ये ‘रशीद मिया मकबरा’

फर्रखाबाद (उत्तरप्रदेश) – येथील रशिदाबादमध्ये ‘रशीद मिया मकबरा’ हे एक शिवमंदिर आहे, असा दावा न्यायालयात याचिका प्रविष्ट करून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने या जागेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. आता या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. हा मकबरा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे.

१. येथील हिंदु जागरण मंचचे कार्यकर्ते प्रदीप सक्सेना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांना नोटीस देऊन ‘रशीद मकबरा’ शिवमंदिर असल्याचे सांगितले आहे. तसेच मकबरा येथे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. ‘हे शिवमंदिर होते आणि मोगल आक्रमकांनी ते पाडून येथे मकबरा बांधला’, असे सक्सेना यांनी म्हटले आहे.

२. प्रदीप सक्सेना यांनी सांगितले की, हा मकबरा प्राचीन काळातील गंगेश्‍वरनाथ शिवमंदिर होते. वर्ष १६०७ मध्ये मोगलांनी ते पाडले होते. या ठिकाणी नवाब रशीद खान (रशीद मिया) याचा मकबरा बांधण्यात आला. तेव्हापासून याला ‘रशीद मिया मकबरा’ म्हटले जाते. जुन्या शिवमंदिराची मूळ रचना पालटलेली नाही. याउलट मंदिरात ज्या ठिकाणी शिवलिंग होते, ते बाजूला करून त्याच ठिकाणी मकबरा बनवण्यात आला. येथे सर्व प्रकारची हिंदूंची धार्मिक चिन्हे आढळून येतात. ती पहायला मिळू शकतात.