Jaishankar Met Maldives FM : भारत आणि मालदीव यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली चर्चा !

  • भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण

  • मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याच्या सूत्रावर झाली चर्चा !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर व मालदीवचे परराष्ट्रमंत्री मोसा जमीर

कंपाला (युगांडा) – भारत आणि मालदीव यांच्यातील लक्षद्वीपच्या प्रकरणापासून तणाव निर्माण झाला असतांना भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्रमंत्री मोसा जमीर यांची येथे भेट घेतली. ‘नॉन-अलाईन्ड मूव्हमेंट’ शिखर परिषदेसाठी येथे गेले असतांना ही भेट झाली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर संबंध आणि भारतीय सैन्य मागे घेण्याच्या सूत्रावर चर्चा झाली. यासह मालदीवमध्ये चालू असलेले विकास प्रकल्प, ‘सार्क’ आणि ‘नाम’ या संघटनांमधील दोन्ही देशांचा सहभाग यावरही चर्चा केली. सध्या ८८ भारतीय सैनिक मालदीवमध्ये आहेत. सैन्य मागे घेण्याविषयी दोन्ही देशांमध्ये चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या भेटीनंतर मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सामाजिक माध्यमांत पोस्ट करून म्हटले की, आम्ही आमचे संबंध दृढ करण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत. मालदीव हा हिंद महासागरातील भारताच्या प्रमुख सागरी शेजारी देशांपैकी एक आहे.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक काय करत आहेत ?

भारताने वर्ष २०१० आणि २०१३ मध्ये मालदीवला २ हेलिकॉप्टर आणि वर्ष २०२० मध्ये एक लहान विमान भेट दिले होते. यावरून मालदीवमध्ये मोठा गदारोळ झाला होता. मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी तत्कालीन अध्यक्ष सोलिह यांच्यावर भारताला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप केला होता. भारताचे म्हणणे आहे की, भेटवस्तू दिलेल्या विमानाचा वापर शोध आणि बचाव कार्यासाठी अन् रुग्णांची वाहतूक करण्यासाठी केला जाणार होता. मालदीवच्या सैन्याने वर्ष २०२१ मध्ये सांगितले होते की, या विमानाचा वापर आणि दुरुस्ती यांसाठी ७० हून अधिक भारतीय सैनिक देशात आहेत. त्यानंतर मालदीवच्या विरोधी पक्षांनी ‘इंडिया आउट’ मोहीम चालू केली. भारतीय सैनिकांनी मालदीव सोडावे, अशी त्यांची मागणी होती.