परात्पर गुरु पांडे महाराज यांनी जेवणासाठी वापरलेले पटल सेवेसाठी मिळाल्यावर साधकाच्या मनात झालेली विचारप्रक्रिया

कै. (परात्‍पर गुरु) परशराम पांडे महाराज

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी जेवणासाठी वापरलेले पटल (टेबल) सेवेसाठी मिळाल्यामुळे ‘ते सतत समवेत आहेत’, याची जाणीव होऊ लागणे

‘मी सध्या देवद आश्रमातील धान्य विभागात सेवा करतो. याआधी काही वर्षे मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सेवेत होतो. मला सेवा करण्यासाठी धान्य विभागात एक पटल (टेबल) दिले गेले. ते पटल पहाताच माझा भाव जागृत झाला. हे पटल परात्पर गुरु पांडे महाराज प्रसाद/महाप्रसाद घेण्यासाठी वापरत असत. ‘प.पू. महाराज यांचे महानिर्वाण होऊन ३ वर्षे होऊन गेली. इतकी वर्षे होऊनही त्यांनी मला सोडलेले नाही. ते सतत माझ्या समवेत असतात आणि या पुढेही रहातील’, हे या पटलाच्या माध्यमातून सिद्ध होते. ‘माझ्यासारख्या असंख्य स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त पामराला ते आधार देत आहेत, यापेक्षा मोठे भाग्य कोणते ! ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’, या संत वचनाप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज माझ्या समवेत आहेत’, हे या प्रसंगातून मला अनुभवता आले.

श्री. सुरेश सावंत

२. ‘प.पू. पांडे महाराज हातात काठी घेऊन आहेत’, असे एका साधिकेने म्हटल्यावर ‘स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रसंगी ते शिक्षा करतील’, अशी जाणीव होणे

मला पटल सेवेसाठी मिळाले त्या वेळी तेथे उपस्थित असलेली एक साधिका सहज म्हणाली, ‘‘सावंतकाकांच्या समवेत प.पू. पांडे महाराज आहेतच ! एवढेच नव्हे, तर ते हातात काठी घेऊन आहेत.’’ म्हणजेच ‘ते केवळ माझ्या समवेत नसून माझ्यातील स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रसंगी काठीचा वापर करणार आहेत’, असा अर्थबोध होऊन मी भारावून गेलो.

३. प.पू. पांडे महाराजांनी वापरलेल्या पटलावर सेवेस प्रारंभ केल्यापासून झालेले पालट

या पटलावर सेवा चालू केल्यापासून माझ्या मनाची एकाग्रता वाढली आहे. माझ्यात काहीतरी आंतरिक पालट होत असल्याचे मला जाणवत आहे. त्या पटलावर सेवा करतांना गुरुचरणी सतत प्रार्थना होऊ लागली, ‘हे गुरुदेवा, माझे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होऊ दे. माझ्या हृदयात तुमच्या प्रतीची कृतज्ञता, शरणागत आणि समर्पण भाव सतत जागृत राहून ते अखंडपणे वाढू देत’, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना !’

– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वय ७० वर्षे) (२०.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक