Jaishankar On Canada : कॅनडाच्या राजकारणात खलिस्तान्यांचा सुळसुळाट !

  • भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती !

  • भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडण्यास खलिस्तानीच कारणीभूत !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – कॅनडाच्या राजकारणात खलिस्तानी घटकांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे. या घटकांना पुष्कळ प्रमाणात मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे ते अशा कृती करत आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. मला वाटते हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.

पाकशी त्याच्या अटींच्या आधारे चर्चा करणार नाही !

पाकिस्तानच्या संदर्भात डॉ. जयशंकर म्हणाले की, भारतावर चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सीमापार आतंकवादाचा वापर करत आहे. आम्ही आमच्या शेजार्‍याशी चर्चा करणार नाही, असे नाही; परंतु पाकिस्तानने ज्या अटी घातल्या आहेत त्याआधारे आम्ही चर्चा करणार नाही. आम्हाला ठाऊक आहे की, एक शेजारी दुसर्‍या शेजार्‍याच्या साहाय्याला येतो; पण आम्ही पाकच्या अटींवर चर्चा करणार नाही.

चीनशी सरदार पटेल यांच्या धोरणानुसार व्यवहार करत आहोत !

चीनविषयी डॉ. जयशंकर म्हणाले की, नेहरूंनी ‘चीन फर्स्ट’ या धोरणावर काम केले. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात आधीपासूनच ‘चीनला प्रत्युत्तर कसे द्यायचे ?’, यावर मतभेद होते. सरदार पटेल यांनी चीनशी व्यवहार करतांना चालू केलेल्या वास्तववादाच्या प्रवाहानुसार मोदी सरकार काम करत आहे. परस्पर संबंधांवर आधारित अशा संबंधांना मान्यता मिळत नाही, तोपर्यंत असे संबंध पुढे जाणे कठीण आहे.

जगातील अनेक देशांच्या नेत्यांना भारतात यायचे आहे !

‘भारत स्वतःचे विचार जगावर लादत आहे का ?’, या प्रश्‍नाला उत्तर देतांना परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर म्हणाले की, आम्ही आमची मते कुणावर लादत आहोत, असे मला वाटत नाही. भारताकडे अधिक समर्पक दृष्टीने पाहिले जाते. अनेक देशांच्या नेत्यांना भारतात यायचे आहे. ‘पंतप्रधान प्रतिवर्षी जगातील प्रत्येक देशाला का भेट देऊ शकत नाहीत ?’, हे त्या संबंधित देशांना स्पष्ट करून सांगणे, हे परराष्ट्रमंत्री या नात्याने माझ्यासमोरील एक मोठे आव्हान आहे. प्रत्येकाला वाटते की, मोदी यांनी त्यांच्या देशाला भेट द्यावी.