सनातनच्‍या सेवाकेंद्रात वास्‍तव्‍याला गेल्‍यावर शारीरिक त्रास उणावल्‍याची केरळ येथील सौ. शालिनी सुरेश (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ५८ वर्षे) यांना आलेली अनुभूती !

‘वर्ष २००० पासून मी सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. मी आणि माझे यजमान आम्‍ही घरी असतो. यजमान मला घरातील कामे करायला साहाय्‍य करतात. मी व्‍यष्‍टी साधनेसमवेत अध्‍यात्‍म प्रसाराची सेवा करत आहे. माझे शारीरिक त्रास वाढल्‍यावर मला कोची येथील सेवाकेंद्रात रहायला मिळाले. तेव्‍हा मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सौ. शालिनी सुरेश

१. आमवाताचे त्रास वाढल्‍याने शारीरिक हालचाली करता न येणे आणि मनात निराशेचे विचार येणे 

काही वर्षांपासून मला आमवाताचा त्रास आहे. त्‍यावर मी औषधोपचार घेत आहे. मे २०२३ मध्‍ये औषधांमध्‍ये पालट झाल्‍याने माझे त्रास पुष्‍कळ वाढले. माझ्‍या शरिराला सूज येऊन गाठी झाल्‍या. मला चालता येत नव्‍हते, तसेच सकाळी उठायलाही पुष्‍कळ वेळ लागत असे. मला झोपलेल्‍या स्‍थितीत हलता येत नव्‍हते. मी मल्‍याळम् भाषेत असलेल्‍या भावसत्‍संगाचे काही भाग घेते. सत्‍संगाच्‍या दिवशी माझा त्रास वाढला. त्‍यानंतर माझ्‍या मनात ‘मला आता काहीच जमणार नाही. माझे शरीर आता पूर्णपणे क्षीण होऊन मला उरलेले आयुष्‍य पलंगावर झोपूनच काढावे लागेल. माझी साधना होणार नाही. मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात कधीही जाऊ शकणार नाही. मी गुरुदेवांना कधीही पाहू शकणार नाही’, असे निराशेचे विचार येऊ लागले.

२. साधकांनी कोची येथील सनातनच्‍या सेवाकेंद्रात आणणे

आमची आर्थिक स्‍थिती ठीक नाही. माझ्‍या शारीरिक स्‍थितीची तीव्रता वाढल्‍यावर माझे पती हतबल झाले. त्‍यांचे मन निराश झाले. तेव्‍हा साधकांनी मला सेवाकेंद्रात येण्‍यास सुचवले. एरव्‍ही माझ्‍या साधनेविषयी यजमान सकारात्‍मक नसतात; पण या वेळी ते माझ्‍या समवेत सेवाकेंद्रात येण्‍यास सिद्ध झाले, तसेच त्‍यांनी मला तिथे पूर्ण बरे होईपर्यंत रहाण्‍यास अनुमती दिली. त्‍यानंतर साधकांनी आम्‍हाला कोची येथील सनातनच्‍या सेवाकेंद्रात आणले.

३. सेवाकेंद्रात आणल्‍यावर झालेले पालट

मला सेवाकेंद्रात चाकांच्‍या आसंदीवर (‘व्‍हील चेअर’वर) बसवून आणले; परंतु तेथे पोचल्‍यावर काही मिनिटांतच मला चालता येऊ लागले. ‘माझी स्‍थिती सुधारेल’, असा माझ्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण झाला. मी ५ घंटे नामजप करू लागले. मला सेवा करायलाही जमू लागले. सेवाकेंद्रात ३ आठवडे राहिल्‍यावर मी आधुनिक वैद्यांना भेटले. तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍हाला काही विशेष त्रास नाही. केवळ ई.एस.आर. (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, म्‍हणजे रक्‍तातील एका घटकाचे प्रमाण) अधिक आहे. सध्‍या दिलेले औषध चालू ठेवा.’’

४. गुरुपौर्णिमेच्‍या अशक्‍य वाटणार्‍या सेवा करता येणे 

त्‍यानंतर मी घरी गेले. जून-जुलै मासात गुरुपौर्णिमेची सेवा चालू झाली. तेव्‍हा प्रतिदिन माझे सेवेसाठी घराबाहेर पडणे व्‍हायचे. मी ‘घरोघरी प्रसार करणे आणि कधीकधी बसमधून प्रवास करून दुसर्‍या ठिकाणी जाऊन तेथील साधिकांसमवेत सेवा करणे’, अशा सेवा करू लागले. श्री गुरूंच्‍या कृपेने मला अशक्‍य असलेल्‍या सेवा जमू लागल्‍या.

५. शारीरिक त्रास अल्‍प झाल्‍यामुळे रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील साधकत्‍ववृद्धी शिबिरात सहभागी होता येणे 

कोरोना महामारीच्‍या कालावधीपासून मी शारीरिक त्रास अनुभवत आहे. मी औषधोपचार, आध्‍यात्मिक उपाय आणि मंत्रजप करत होते. आता माझे सर्व त्रास गुरूंच्‍या कृपेने अल्‍प झाले आहेत. या वर्षी मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘साधकत्‍ववृद्धी’ शिबिराला जाण्‍याची संधी मिळाली. सर्व साधक, संत आणि सद़्‍गुरु यांचे दर्शन अन् त्‍यांचे मार्गदर्शन मिळाले.

गुरुदेवांच्‍या अपार कृपेने माझा पुनर्जन्‍म झाला आहे. आता मला ‘झोकून देऊन सेवा करावी’, असे वाटते. माझ्‍यात झालेल्‍या पालटांविषयी मी गुरुदेवांच्‍या चरणी अत्‍यंत कृतज्ञ आहे.’

– सौ. शालिनी सुरेश (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ५८ वर्षे), केरळ (१.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक