Love Jihad : लव्ह जिहाद कायद्याविषयी शासन गंभीर; लवकरच निर्णय कळेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

  • विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बैठक !

  • शासनाने ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याची ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ची आग्रहाची मागणी !

नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) : महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात पुष्कळ घटना घडत असतांनाही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात शासनाकडून कायदा केला जात नाही. त्यामुळे हा कायदा तात्काळ करावा, अशी आग्रहाची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘लव्ह जिहाद’ कायदा लवकर करण्याविषयी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देतांना हिंदु संघटनांचे प्रतिनिधी

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याविषयी शासन गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्यशासनाने बर्‍याच गोष्टी केलेल्या आहेत. या संदर्भात लवकरच तुम्हाला निर्णय कळेल’, असे स्पष्ट आश्वासन दिले.

नागपूर येथील विधान भवनातील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लव्ह जिहाद कायदा लवकर करण्याची आग्रहाची मागणी करतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

१४ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता नागपूर विधान भवनाच्या प्रांगणात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या विविध हिंदु जनआक्रोश मोर्चाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक पार पडली. या वेळी शासनाच्या वतीने राज्याचे ग्रामविकासमंत्री श्री. गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री. संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार श्री. भरतशेठ गोगावले आणि आमदार श्री. प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

नागपूर विधान भवनाच्या बाहेर जमलेले समस्त हिंदु संघटनांचे प्रतिनिधी !

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ

हिंदु संघटनांच्या वतीने शिष्टमंडळामध्ये ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’, ‘सकल हिंदु समाज’, ‘विश्व हिंदु परिषद’, ‘बजरंग दल’, ‘हिंदु विधीज्ञ परिषद’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘सनातन संस्था’, ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियान’, ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’, ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’, ‘सर्वभाषिक ब्राह्मण महासंघ’, ‘चित्पावन ब्राह्मण महासंघ’ आदी विविध संघटनांचे राज्यभरातील मान्यवर सहभागी झाले होते.

यात प्रामुख्याने अधिवक्ता वैशाली परांजपे, स्नेहल जोशी, सर्वश्री सुनील घनवट, शंकर देशमुख, पराग फडणीस, नितीन वाटकर, धनंजय गायकवाड, कमलेश कटारिया, कैलाश देशमुख, सागर देशमुख, आशिष सुंठवाल, गौरव बैताडे, रवी ग्यानचंदानी, उमाकांतजी रानडे, राहुल पांडे, श्रीकांत पिसोळकर, अभिजीत पोलके आणि करण थोटे यांचा समावेश होता.

समस्त हिंदु संघटनांनी दिलेले निवेदन –

इतर राज्यांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात त्वरित कायदा करावा !

बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतांना हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरे लाखोंच्या संख्येने ५० हून अधिक हिंदु जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते; मात्र आज १ वर्ष उलटून गेले आहे, तरी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा झालेला नाही; मात्र देशातील उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी अनेक राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात तात्काळ कायदा केलेला आहे.’’

‘लव्ह जिहाद’चा कायदा करण्याविषयी शासनाच्या हालचाली चालू ! – मुख्यमंत्री

या वेळी शासनाची भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘सरकार कोणत्या विचारांचे आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’संदर्भात राज्य सरकारने एक एक करून निर्णय घ्यायला प्रारंभ केला आहे. शासनाची भूमिका काय आहे, हे आम्ही प्रतापगडावरील कृतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे शासन तुमच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. कायद्याविषयी शासनाने नेमके काय केले, यासाठी मुंबई येथे ठराविक लोकांची बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जाईल. तुम्हाला अपेक्षित असा निर्णय लवकर घेतला जाईल.’’

इतर हिंदुत्वनिष्ठांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागण्या…

१. श्री. अनुप जयस्वाल, अध्यक्ष, देवस्थान समिती, विदर्भ – राज्यशासनाने अंदाजपत्रकांमध्ये निधीचे प्रावधान करून महाराष्ट्रातील पौराणिक मंदिरांचा जीर्णोद्धार करावा.

२. श्री. रवी ग्यानचंदानी, विहिंप, पुसद (जिल्हा यवतमाळ) – महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ या नावाने अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये ‘लव्ह’जिहाद विरोधी, धर्मांतरविरोधी कायदा करावा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि गोहत्या बंदी कायदा हिंदु अस्मितेचा विचार करून त्वरित करावेत. या सर्व कायद्यांची काटेकोरपणे कार्यवाही व्हावी.



३. श्री. कमलेश कटारिया, अध्यक्ष, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या २४ दिवसांत ६ मुली हरवल्या. तेथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यातील ३ मुली फुलंब्री (छित्रपती संभाजीनगर) येथील आहेत. या संदर्भात आम्ही समिती नेमली आहे.

४. श्री. धनंजय गायकवाड, बजरंग दल, पुणे – पुणे येथे लव्ह जिहादाच्या संदर्भात ४ घटना घडल्या आहेत. त्यातील २ मुलींना वाचवण्यात यश आले.

५. श्री. पराग फडणीस, जिल्हा संयोजक, बजरंग दल, कोल्हापूर – गेल्या वर्षी आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भात शासनाने नियम प्रसारित केले होते. त्यानुसार ज्या महिला विवाहित आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. जी राज्यस्तरीय समिती नेमली आहे, ती जिल्हा स्तरावर नेमली जावी. त्यामुळे लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा बसेल. हे लोक देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सैनिकांच्या पत्नींना लक्ष्य करत आहेत. अशा २ घटना पुणे येथे घडल्या.

६. सौ. स्नेहल जोशी, पत्रकार, सुदर्शन वृत्तवाहिनी – अल्पवयीन मुलींना मशिदीत नेऊन ‘कबूल है कबूल है’ असे वदवून घेतात आणि ‘मुलीच्या सहमतीने धर्मांतर केले जात आहे’, असे खोटे सांगितले जाते. आता विवाहाआधीच धर्मांतर केले जाते. नंतर हेच लोक पोलिसांकडे जाऊन संरक्षण मागतात. ‘विवाहासाठी धर्मांतर आणि धर्मांतरासाठी विवाह’ हे गणित आहे.