-
जेजुरी मंदिराच्या ५ विश्वस्तांना गावबंदीची चेतावणी !
-
ग्रामस्थांना विश्वासात न घेता विश्वस्तांची मंत्र्यांशी भेट
जेजुरी (जिल्हा पुणे) – ‘मल्हार सर्टिफिकेट’ला (मल्हार प्रमाणपत्राला) जेजुरी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ‘मल्हार सर्टिफिकेशन’चे नाव तात्काळ पालटावे, अशी मागणी जेजुरी ग्रामस्थांनी केली आहे. नीतेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणार्यांनी भूमिका पालटावी, अन्यथा त्यांना ‘गावबंदी’ करू, अशी चेतावणीही ग्रामस्थांनी दिली आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता जेजुरी मंदिराच्या ५ विश्वस्तांनी मुंबई येथे जाऊन नीतेश राणेंचा खंडोबा पगडी घालत सन्मान केला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी जेजुरी मंदिराच्या ५ विश्वस्तांना गावबंदीची चेतावणी दिली आहे.
मंत्री नीतेश राणे यांनी चिकन आणि मटण खरेदी करणार्यांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन’ नावाचा एक नवीन उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यातील सर्व झटका मटण दुकाने ‘मल्हार प्रमाणपत्र’ या नावाने नोंदणीकृत केली जातील. नोंदणी केल्यानंतर त्यांना मल्हार प्रमाणपत्र मिळेल; मात्र या नावावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले जेजुरीचे ग्रामस्थ ?मल्ल नावाच्या दैत्याचा संहार केल्यामुळे खंडोबाचे मल्हार हे नाव आहे. या नावाचा अपभ्रंश होता कामा नये. सर्टिफिकेट योजनेला मल्हार हे नाव देता कामा नये, अशी आमची शासनाला विनंती आहे. आज कुणी मटण खायला बसले, तर तो म्हणणार ‘मला मल्हार आण रे…’ हे कितपत योग्य आहे ? असे भविष्यात कुठेही होता कामा नये. |