
पिंपळे सौदागर (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी एकत्रित येऊन २३ मार्चला सकाळी ८ वाजता कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डनजवळ मानवी साखळी करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘नदीफ्रंट विकास प्रकल्पा’ला विरोध करत निदर्शने केली. पर्यावरण संवर्धनासाठी १०० हून अधिक नागरिकांनी ‘रिव्हर कन्झर्वेशन २.०’ या आंदोलनाचा भाग असलेल्या या आंदोलनातून नदी प्रदूषण आणि पुनरुज्जीवनाच्या आवश्यकतेविषयी जागृती केली, तसेच नदीकिनारी होणार्या अनावश्यक बांधकामांना विरोध केला. त्या ठिकाणी येणार्या जाणार्या नागरिकांची या प्रकल्पामुळे उद्भवणार्या धोक्यांविषयी जागृती करण्यात आली.
या वेळी ‘झाडांची कत्तल थांबवा !’, ‘नदी आधी स्वच्छ करा !’, अशा घोषणाही देण्यात आल्या. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी यात भाग घेतला. स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरण गट आणि नागरिक यांनी एकत्र येत पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांवर अनुमाने ३० लाख लोक अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचे नैसर्गिक स्वरूप जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृित्रम बंधारे आणि मनोरंजनासाठीची बांधकामे न करता, झाडे, ओसाड भूमी आणि जैवविविधतेच्या संवर्धनावर भर दिला जावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.