अल्प पटसंख्या असलेली कोणतीही शाळा बंद करणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

श्री. दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) : अल्प पटसंख्येची कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिले. राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी ११ डिसेंबर या दिवशी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले.

या वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘‘चालू शैक्षणिक वर्षांपासून राज्यांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करत आहोत. त्यामध्ये ज्युनिअर आणि सिनीयर के.जी. (शिशुगट लहान आणि मोठा) पासून शाळा चालू करत आहोत. राज्यांमध्ये ३० सहस्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे. राज्यात १७ ते ३१ ऑगस्ट या काळात ३ सहस्र २१४ शाळाबाह्य बालके आढळून आली. यामध्ये मुलांची संख्या १ सहस्र ६२४, तर मुलींची संख्या १ सहस्र ५९० आहे. शाळाबाह्य मुलांपैकी १ सहस्र ६४० जणांना पुन्हा शाळेत घेण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना शाळेत प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू आहे.’’