भारतीय सैनिकांच्या ताफ्यांवरील आक्रमणांचा सूत्रधार असणारा आतंकवादी हंजल याच्यावर कराचीत झाडण्यात आल्या गोळ्या !
कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये भारतात कारवाया करणार्या आणखी एका जिहादी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अदनान अहमद उपाख्य हंजला अदनान याची कराचीत अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ३ डिसेंबरला पहाटे अज्ञातांनी कडोकोट बंदोबस्त असतांनाही हंजल याच्या घराबाहेर त्याच्यावरगोळ्या झाडल्या. हंजला याला पाकिस्तानी सैन्याने गुपचूपपणे कराची येथील रुग्णालयात भरती केले होते. ५ डिसेंबरला हंजलाचा मृत्यू झाला. हंजला अदनान हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद याचा मर्जीतील होता.
१. वर्ष २०१६ मध्ये काश्मीरच्या पंपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) ताफ्यावर झालेल्या आक्रमणाचा हंजला हा मुख्य सूत्रधार होता. या आक्रमणात ८ सैनिकांना वीरगती मिळाली होती, तर २२ सैनिक घायाळ झाले होते.
२. वर्ष २०१५ मध्ये जम्मूतील उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या आक्रमणाचाही हंजला हाच मुख्य सूत्रधार होता. यात सीमा सुरक्षा दलाच्या २ सैनिकांना वीरगती मिळाली होती, तर १३ सैनिक घायाळ झाले होते. हंजला नव्याने भरती झालेल्या आतंकवाद्यांची माथी भडकावण्याचे काम करत होता, तो त्यांना प्रशिक्षण देत होता. तो पाकव्याप्त कश्मीरमध्ये असलेल्या आतंकवाद्यांच्या तळांवरही जाऊन प्रशिक्षण देत होता.