प्रथमोपचार आणि अग्नीशमन विशेषांकाविषयी…
नैसर्गिक आणि मानव-निर्मित आपत्ती
सध्याच्या धकाधकी आणि गतीमान जीवनात कोणती परिस्थिती कुणावर केव्हा होईल ? याची शाश्वती देता येत नाही. किरकोळ दुखापत असो वा जीवघेणी परिस्थिती, त्या प्रसंगात सतर्क राहून योग्य कृती करणे अत्यंत आवश्यक असते. अशा प्रसंगांत प्रामुख्याने २ कौशल्ये आत्मसात असणे आवश्यक आहेत, ती म्हणजे प्रथमोपचार आणि अग्नीशमन !
प्रथमोपचारामध्ये जखमी किंवा अचानक आजारी पडलेल्या व्यक्तीची तिला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत काळजी घेणे समाविष्ट असते. घटना घडल्यानंतर आरंभीच योग्य काळजी घेतल्यास गंभीर जीवघेणे परिणाम टाळता येऊ शकतात. लहानसा घाव, भाजणे यांपासून ते हृदयाचा झटका येणे, गुदमरणे आदी घटनांमध्ये प्रथमोपचार जीवदान देणारे ठरू शकतात.
दुसरीकडे अग्नीशमन प्रशिक्षण हे आग विझवणे आणि आगीच्या घटनांमध्ये लोकांचे अन् मालमत्तेचे रक्षण करणे असे धाडसी कौशल्य आहे. अग्नीशमन प्रशिक्षणामध्ये आग विझवण्यासह अग्नीशमन उपकरणांचा योग्य प्रकारे वापर करणे आदी कृती समाविष्ट असतात.
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कधी भीषण स्वरूप धारण करतील, ती वेळ सांगून येत नाही. एखाद्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती असो कि देशभरात दंगलींच्या माध्यमातून वारंवार उसळणारा हिंसाचार असो, अशा आपत्तींमध्ये मनुष्यहानी न्यूनतम व्हावी, यासाठी सदैव सिद्ध रहाणे, हे शासन आणि प्रशासन यांच्यासह नागरिकांचेही उत्तरदायित्व ठरते. नैसर्गिक, मानवनिर्मित आणि युद्धासारख्या राष्ट्रीय आपत्ती यांत मनुष्यहानी अधिक होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक बंधुत्व, युद्धकाळात राष्ट्रबंधुत्व आणि दंगलीच्या काळात धर्मबंधुत्व प्रत्येकाला दाखवावे लागते. अशा प्रसंगी बहुसंख्य समाज प्रथमोपचार प्रशिक्षित असेल, तर मनुष्यहानीत घट करणे शक्य होते.
आपत्तीच्या प्रसंगी कुटुंबातील एकाने तरी प्रथमोपचार आणि अग्नीशमन प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक असते. हे लक्षात घेता वाचकांसाठी प्रथमोपचार आणि अग्नीशमन प्रशिक्षणाच्या संदर्भातील थोडक्यात माहिती या विशेषांकात घेतली आहे.
असंवेदनशीलतेला संवेदना देऊया !
आजच्या माहितीच्या युगातील माहिती मिळण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे भ्रमणभाष ! २४ घंटे, ७ दिवस, प्रत्येक मिनिटाला ‘अपडेट्स’ देणार्या या साधनाचा माहितीसाठी उपयोग होतो, तसा हरवत चाललेल्या संवेदनशीलतेसाठी त्याला उत्तरदायी ठरवल्यास कुणाची हरकत नसावी. सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित करून ‘लाईक्स’ मिळवण्याच्या काळात समोर अपघात घडला, तरी त्याचा ‘व्हिडिओ’ बनवून ‘शेअर’ केला जाईल; पण साहाय्याला कुणी जाणार नाही, इतकी समाजाची संवेदनशीलता आणि नीतीमत्ता खालावली आहे. त्याला निमित्त देहलीतील घटनेचे.
नवी देहलीत अपघातग्रस्त युवकाला कुणी साहाय्य केले नाही; म्हणून त्याचा जीव गेला. का ? तर बघे प्रेक्षक व्हिडिओ काढण्यात गुंतलेले. लोक ‘व्हिडिओ’ प्रसारित करून ‘इन्फ्लूएन्झर’ (प्रभावशाली व्यक्ती) बनू पहातात; पण प्रत्यक्ष कृती कुणीच करत नाही, हे या घटनेतून दिसून आले. ‘कुटुंबभावना, शेजारधर्म, समाजाप्रती कर्तव्यभावना, माणुसकी या गोष्टी रसातळाला पोचल्या आहेत’, असेच आता म्हणावे लागेल. ही स्थिती समाज आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच आहेत.
मी काय करू शकतो ?
त्यामुळेच तुम्हा-आम्हाला आता ठरवावे लागेल की, माझ्यासमोर अपघात झाला, तर मी काय करीन ? अपघाताचा व्हिडिओ बनवून प्रसारित करेन, भीती वाटल्यामुळे उभा राहीन, अस्थिर होईन कि अपघातग्रस्ताला साहाय्य करीन ? देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिकांप्रमाणे सीमेवर लढण्याची क्षमता आपल्यात नाही, तर देशवासियांना साहाय्य करण्याची कृती तरी किमान आपण करू शकतोच. त्यामुळे आजूबाजूला घडणार्या घटनांकडे सजगतेने पाहून तत्परतेने योग्य कृती करणे आवश्यक आहे.
अपघात घडल्यानंतर स्थिर रहा आणि तत्परतेने रुग्णवाहिका अन् पोलीस यांना संपर्क करून परिस्थितीची कल्पना द्या. रुग्णाला साहाय्य करण्यापूर्वी अपघातस्थळाचा परिसर प्रथमोपचार करण्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री करून प्रथमोपचार करा. स्वतःला स्थिर रहाता येण्यासाठी नामजप अवश्य करा.
सिद्धता आतापासूनच !
बहुतांश मध्यमवर्गीय समाज सुरक्षित वातावरणात वाढलेला आहे. दैनंदिन जीवनातील छोटे-मोठे अपघात वगळता, सामान्य व्यक्ती आतंकवादी आक्रमण वा नैसर्गिक आपत्ती आदी मोठ्या संकटांची कल्पनाही करत नाही. प्रतिदिन पैसा मिळवण्याची धडपड चालू असते. त्यामुळे ‘पुढचे पुढे बघू’, अशी मानसिकता असते; परंतु आता आपत्कालीन प्रसंगात काय करावे ? हे प्रत्येकानेच समजून आणि शिकून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारतातील अंतर्गत-सीमाबाह्य परिस्थिती, काही देशांमध्ये होत असलेली युद्धे पहाता भारतियांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच याची सिद्धता आतापासूनच करणे उपयुक्त ठरेल.