पुणे येथे साखळी बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याचा आतंकवाद्यांचा कट !

आतंकवादी कारवायांचा डाव उधळल्‍याने ‘एन्.आय.ए.’च्‍या प्रमुखांकडून पुणे पोलिसांचे कौतुक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – देशभरात आतंकवादी कारवाया करण्‍याच्‍या सिद्धतेत असलेल्‍या आतंकवाद्यांना कोथरूड परिसरात दुचाकी चोरतांना पुणे पोलिसांनी पकडले होते. १० लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्‍या आतंकवाद्यांना पकडण्‍यात आल्‍यानंतर पुणे, मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्‍या शहरात घातपाती कारवाया करण्‍याचा डाव उधळला गेला आहे. पुणे येथे साखळी बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याचा आतंकवाद्यांचा कट होता. आतंकवाद्यांना सीरियामधून त्‍यासंदर्भात सूचना मिळत होत्‍या. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकत्‍याच पकडलेल्‍या आतंकवाद्यांकडून अन्‍वेषणात ही माहिती समोर आली आहे. ‘एन्.आय.ए.’चे महासंचालक दिनकर गुप्‍ता यांनी पुणे पोलीस आयुक्‍त रितेश कुमार आणि परिमंडळ तीनचे उपायुक्‍त सुहेल शर्मा यांचे कौतुक केले आहे. याविषयी त्‍यांनी पुणे पोलिसांना अभिनंदन पत्रही दिले आहे. पुणे पोलिसांच्‍या प्रशंसनीय कामगिरीमुळे आतंकवादी कारवाया रोखणे शक्‍य झाले असल्‍याचे गुप्‍ता यांनी पत्रात म्‍हटले आहे.

सीरियामधून मिळत होत्‍या सूचना !

कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरतांना तिघांना पकडले होते. त्‍यांची घरझडती घेण्‍यासाठी कोंढव्‍यात गेले असतांना साथीदार महंमद शाहनवाज आलम पसार झाला होता. युसूफ खान आणि महंमद युनूस साकी या दोघांकडे चौकशी केल्‍यावर त्‍यांना ‘एन्.आय.ए.’ने पसार घोषित केल्‍याचे समजले. त्‍यांना पकडण्‍यासाठी १० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. त्‍यानंतर ‘एन्.आय.ए.’ने या दोघांना कह्यात घेऊन चौकशी केली. पुणे, मुंबईसह देशातील विविध शहरांत असलेल्‍या ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेकडून आतंकवादी विचारधारेचा प्रसार करण्‍यात येत असून तरुणांना भडकवण्‍याचे काम केले जात असल्‍याचे अन्‍वेषणात उघड झाले. पुण्‍यातील डॉ. अदनान सरकार आतंकवादी विचारधारेचा प्रसार करण्‍यात सामील असल्‍याचे उघड झाले. डॉ. सरकारसह साथीदारांना अटक करण्‍यात आली होती. (अशा प्रकारे सर्वत्रच्‍या पोलिसांनी सतर्कता दाखवल्‍यास आतंकवाद समूळ नष्‍ट होण्‍यास वेळ लागणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

साखळी बाँबस्‍फोट घडवून देशात सातत्‍याने घातपाती कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांचे तळ नष्‍ट करणेच आवश्‍यक !