सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (वय ८१ वर्षे) यांच्‍याविषयी सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांचा भाव आणि प्रीती दर्शवणारे काही भावस्‍पर्शी क्षण !

आश्‍विन कृष्‍ण चतुर्थी (१.११.२०२३) या दिवशी सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (पू. कर्वेमामा) यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांचा त्‍यांच्‍याविषयीचा भाव आणि प्रीती दर्शवणारे काही प्रसंग पुढे दिले आहेत.

पू. विनायक रघुनाथ कर्वे

पू. विनायक रघुनाथ कर्वे यांना सनातन परिवाराकडून ८१ व्‍या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

पू. भार्गवराम भरत प्रभु

‘सर्व संत माझ्‍या हृदयात असून त्‍यांची आठवण येताच ते सूक्ष्मातून माझ्‍या समोर येतात’, असे पू. भार्गवराम यांनी सांगणे ‘पू. भार्गवराम म्‍हणतात, ‘‘गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), पू. मामा (सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे (वय ८१ वर्षे)), पू. अण्‍णा (पू. रमानंद गौडा, सनातनचे ७५ वे संत), पू. अजम्‍मा (पू. (श्रीमती) राधा प्रभु (पू. भार्गवराम यांच्‍या पणजी), सनातनच्‍या ४४ व्‍या संत, वय ८६ वर्षे), हे सर्वच माझ्‍या हृदयात आहेत. मला त्‍यांची आठवण येताच ते सूक्ष्मातून माझ्‍या समोर येतात. संतांना सर्वच समजते.’’ – सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), (११.१०.२०२३)      

सौ. भवानी भरत प्रभु

१. पू. भार्गवराम यांची पू. कर्वेमामा यांच्‍याविषयीची प्रीती !

‘एकदा आम्‍ही (मी आणि पू. भार्गवराम) आंब्‍यांची पेटी खरेदी करण्‍यासाठी दुकानात गेलो होतो. त्‍या वेळी पू. भार्गवराम म्‍हणाले, ‘‘आई, हे आंबे घेऊया. पू. मामा आणि मी प्रतिदिन आंबे खाऊ. पू. मामांना आंबे पुष्‍कळ आवडतात.’’(पू. भार्गवराम पू. कर्वेमामांना ‘पू. मामा’, असे संबोधतात.) पू. भार्गवराम यांनी ‘पू. मामांना आंबे पुष्‍कळ आवडतात’, हे लक्षात ठेवल्‍याचे पाहून मला आश्‍चर्य वाटले आणि मला एका संतांची दुसर्‍या संतांविषयीची प्रीती अनुभवायला मिळाली.

२. पू. भार्गवराम यांचा पू. कर्वेमामा यांच्‍याप्रतीचा भाव !

२ अ. ‘पू. कर्वेमामा तुळशीविवाहाची पूजा करत असतांना त्‍यांनी आवाहन केल्‍यावर सर्व देवता येतात’, असे पू. भार्गवराम यांनी सांगणे : पू. कर्वेमामा आमच्‍या घरी प्रतिवर्षी तुळशीविवाहाची पूजा करतात. एकदा पूजेच्‍या वेळी त्‍यांनी गणपति आणि श्रीकृष्‍ण यांना आवाहन केल्‍यावर पू. भार्गवराम म्‍हणाले, ‘‘पू. मामांनी आवाहन केल्‍यावर सर्व देवता येतात.’’ त्‍यानंतर ते मला म्‍हणाले, ‘‘आई, बघ ! आता गणपति आणि श्रीकृष्‍ण येथे येतील. तुला श्रीकृष्‍ण आलेला दिसतो का ?’’

२ आ. पू. मामांनी केलेली भावपूर्ण प्रार्थना ऐकल्‍यावर पू. भार्गवराम यांनी काढलेले उद़्‍गार ! : ‘युगादी’च्‍या (टीप), म्‍हणजे गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी पू. मामांनी ध्‍वजाचे पूजन केले आणि हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी अत्‍यंत भावपूर्ण प्रार्थना केली. पू. मामांनी केलेली प्रार्थना ऐकल्‍यावर पू. भार्गवराम अत्‍यंत आनंदाने म्‍हणाले, ‘‘पू. मामांनी किती भावपूर्ण प्रार्थना केली ! सर्व साधकांची भावजागृती झाली. हिंदु राष्‍ट्र लवकरच येईल. त्‍यांची प्रार्थना ऐकून माझीही भावजागृती झाली. पू. मामांचा किती भाव आहे ना !’’

(टीप – दक्षिण भारतात नववर्षदिनाला ‘युगादी’, असे म्‍हणतात.)

२ इ. पू. कर्वेमामांना प्रवेशद्वार उघडावे लागू नये; म्‍हणून पू. भार्गवराम यांनी चारचाकी गाडीतून थोडे आधी उतरून प्रवेशद्वार उघडणे : पू. मामा स्‍वागतकक्षात सेवा करतात. आम्‍ही चारचाकी गाडीने स्‍वागतकक्षाच्‍या प्रवेशद्वाराजवळ आलो की, ते लगेच प्रवेशद्वार उघडतात. हे पाहून पू. भार्गवराम म्‍हणाले, ‘‘यापुढे पू. मामांना प्रवेशद्वार उघडावे लागू नये. मला लाज वाटते. आपली चूक होत आहे. आपण काहीतरी युक्‍ती योजूया. चारचाकी गाडी थोडी आधी थांबवूया. मीच जाऊन प्रवेशद्वार उघडतो.’’ त्‍यानंतर पू. भार्गवराम प्रतिदिन शाळेत जाण्‍यापूर्वी पुढे जाऊन दार उघडतात.

२ ई. पू. भार्गवराम म्‍हणतात, ‘‘पू. मामा माझ्‍याकडे पाहून हसले, तरी ‘त्‍यांनी पुष्‍कळ प्रेम दिले’, असे मला वाटते. त्‍यांच्‍या दृष्‍टीतच पुष्‍कळ प्रेम आणि काळजी असते.’’

२ उ. ‘पू. कर्वेमामा यांनी डबीत भरलेल्‍या कुंकवाला सुगंध येत आहे, तसेच त्‍यात चैतन्‍य असल्‍याने ‘ते देहाला लावावे’, असे वाटते’, असे पू. भार्गवराम यांनी सांगणे : पू. भार्गवराम यांनी पू. मामांसह ‘डब्‍यांमध्‍ये कुंकू भरणे आणि त्‍या डब्‍या खोक्‍यात ‘पॅक’ करून अन्‍य ठिकाणी पाठवणे’, या सेवा केल्‍या. त्‍यानंतर ते मला म्‍हणाले, ‘‘आई, पू. मामा मला पुष्‍कळ चांगल्‍या प्रकारे सेवा समजावून सांगतात.’’ पू. भार्गवराम यांनी हातात थोडे कुंकू आणले होते. ते म्‍हणाले, ‘‘या कुंकवाचा सुगंध घे. किती सुगंध आहे ना ! हे कुंकू पू. मामा ‘पॅक’ करतात; म्‍हणून साधकांना त्‍यातून पुष्‍कळ चैतन्‍य मिळते. ‘हे कुंकू संपूर्ण देहाला लावून घ्‍यावे’, असे मला वाटत आहे.’’

३. एकदा पू. भार्गवराम म्‍हणाले, ‘‘पू. मामा अखंड जप करतात. मलाही सतत नामजप करायचा आहे. पू. मामांना संपूर्ण दिवस नामजप करणे साध्‍य होते; कारण परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांना पुष्‍कळ शक्‍ती आणि चैतन्‍य देतात.’’

‘संतांची प्रत्‍येक कृती आणि विचार आध्‍यात्‍मिक स्‍तरावर असतो’, हे अनुभवण्‍याची मला संधी मिळाली’, याबद्दल मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते. ‘पू. भार्गवराम यांच्‍यात असलेली प्रीती, भाव आणि श्रद्धा माझ्‍यातही येऊ दे’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’

– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू (११.१०.२०२३)