सिंधुदुर्ग : जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यात सरगवे, आयनोडे आणि पाल-पुनर्वसन या गावांत दुर्गामाता दौड काढण्यात आली. आयनोडे येथील श्री भूतनाथ मंदिरापासून दौडीचा प्रारंभ झाला, तर सरगवे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली. या ३ गावांतील घरांसमोर अंगणात, तसेच रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या दौडीमध्ये युवावर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने पारंपरिक वेषात सहभागी झाले होते.
बांदा शहरात आयोजित ‘दुर्गामाता दौडी’चा प्रारंभ
श्री भूमिकादेवीच्या मंदिरापासून करण्यात आला आणि निमजगावाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ येथे दौडीची सांगता करण्यात आली. कुडाळ शहरात २३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी श्री केळबाई देवीच्या मंदिरात ध्वजपूजन आणि आरती करून ‘दुर्गामाता दौडी’चा प्रारंभ करण्यात आला आणि राजमाता जिजामाता चौक येथे सांगता करण्यात आली. दौडीच्या मार्गातील विविध मंदिरांतील देवतांचे, तसेच नवरात्रोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गादेवीचे दर्शन घेण्यात आले आणि तेथे पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याग जाणून घेतला, तरच भविष्यकाळ उज्ज्वल असेल ! – मंगेश पाटील, जिल्हाप्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
कुडाळ येथे दौडीच्या सांगतेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री. मंगेश पाटील यांनी दुर्गामाता दौड आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट करतांना सांगितले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या देवीच्या उपासनेचे महत्त्व लक्षात यावे, सद्य:स्थितीत हिंदूंमध्ये जागृती व्हावी, त्यासाठी दुर्गामातेचे आशीर्वाद लाभावेत, यांसाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आपल्याला खरा इतिहास कुणीच शिकवला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी केलेला त्याग आपल्याला कुणी शिकवला नाही. तो जाणून घेतला, तरच आपला भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे.’’
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे, जे हिंदूंवरील आघात परखडपणे मांडते. खर्या इतिहासाची माहितीही ‘सनातन प्रभात’मधून दिली जाते. देशाचा जाज्वल्य इतिहास ‘सनातन प्रभात’मधून मांडला जातो. त्यामुळे सर्वांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला हवा, अशा शब्दांत श्री. पाटील यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व उपस्थितांना विशद केले.