विजयादशमी

इतिहास आणि धार्मिक कृतींचे शास्त्र

विजयादशमी म्हणजेच दसरा ! या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराशी चाललेले ९ दिवसांचे युद्ध संपवून त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला. आज आपण दसरा कसा साजरा करायचा ? दसर्‍याच्या दिवशी केली जाणारी धार्मिक कृत्ये, तसेच त्याविषयी उपस्थित केलेले आक्षेप आणि त्यांचे खंडण या लेखातून जाणून घेऊया.

१. दसरा म्हणजे काय ?

‘आश्विन शुक्ल दशमी’, म्हणजेच विजयादशमी ! दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती ‘दशहरा’ अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या ९ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या आणि नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. हा दिवस ‘विजयादशमी’ म्हणजे तो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. नवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात. या दिवशी सरस्वतीतत्त्व सगुणाच्या आधिक्य भावाच्या निर्मितीतून बीजरूपी अप्रकटावस्था धारण करते; म्हणून या दिवशी तिचे क्रियात्मक पूजन आणि विसर्जन केले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या या दिवशी केलेले कोणतेही कर्म हे शुभफलदायी असते.

२. विजयादशमी मागील इतिहास

२ अ. कुबेराकडून आपटा आणि शमी वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव : विजयादशमीच्या दिवशी प्रभु रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. त्या वेळी कुबेर आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव करतो. कौत्स केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. उर्वरित सुवर्णमुद्रा प्रजाजन नेतात. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदु विजयादशमी महोत्सव साजरा करतात आणि दसर्‍याच्या दिवशी लोक एकमेकांना सुवर्णरूपात आपट्याची पाने (अश्मंतकाची पाने) देतात.

२ आ. प्रभु श्रीरामाचा रावणावर विजय : त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हटले जाते.

२ इ. पांडवांचा विराटावरील विजय : पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरील स्वत:ची शस्त्रे पुन्हा घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.

२ ई. मराठ्यांनी शत्रू प्रदेशातून सोनेनाणे आणण्याच्या घटनेचे प्रतीक : दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश जिंकल्यावर सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळत असे. मग ते परमुलुखातून आणलेल्या संपत्तीतील एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात ठेवत असत. घरात गेल्यावर आणलेली संपत्ती देवापुढे ठेवत. नंतर देवाला आणि थोरामाेठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शेष उरली आहे.

श्री. रमेश शिंदे

२ उ. कृषीविषयक लोकोत्सव : हा सण एक ‘कृषीविषयक लोकोत्सव’ म्हणूनही साजरा होत असे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या मृत्तिकेवर ९ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातील भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते.

३. सण साजरे करण्याचे स्वरूप

या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही ४ कृत्ये करायची असतात. अपराण्हकाली (दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.

यानंतर ‘शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर’, अशी शमीची प्रार्थना करतात.

४. आपट्याची पूजा

जर शमी वृक्ष उपलब्ध नसेल, तर आपट्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. ही पूजा करतांना पुढील मंत्र म्हणतात –

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.         नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (ते नसल्यास तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

५. आपट्याची पाने सोने म्हणून देणे

सोने देणे

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वहातात आणि इष्ट मित्रांना देतात. ‘सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते’, असा संकेत आहे.

६. शस्त्रे आणि उपकरणे यांच्या पूजेमागील शास्त्र

शस्त्रपूजन

या दिवशी राजे, सामंत आणि सरदार हे वीर स्वत:ची उपकरणे अन् शस्त्रे यांचे पूजन करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे स्वत:ची अवजारे अन् हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पहाणे, म्हणजेच ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे !

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.


दसर्‍याच्या दिवशी केलेले रावणदहन योग्य कि अयोग्य ?

प्रभु श्रीरामाने त्रेतायुगात अन्यायी आणि अधर्मी राजा रावण याचा वध केला. या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा मिळावी, तसेच दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतिवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे; मात्र सध्या काही संघटना ‘रावणदहन करणे चुकीचे आहे आणि त्याच्यावर बंदी घालायला हवी’, यासाठी आंदोलन करणे, निवेदन देणे आदींसह ‘रावणदहन होऊ देणार नाही’, अशा आक्रमक भूमिकाही घेतांना दिसत आहेत. साम्यवादी विचारसरणीमुळे अयोग्य विचारधारा असलेले हे अज्ञानी लोक म्हणतात, ‘‘रावण हा स्थानिक आदिवासी गोंड समाजाचा राजा होता अन् रावणदहन ही परंपरा परदेशी मूळ असलेल्या आर्यांची म्हणजेच हिंदूंची आहे.’’ खरे तर संस्कृतमध्ये ‘आदिवासी’ हा शब्द नाही, भारतात वनात रहाणारे हे ‘वनवासी’ या नावाने ओळखले जात असत. आदिवासी हा शब्द वर्ष १९३० नंतर ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी पसरवला होता. इतिहासाच्या दृष्टीकोनातून रावण हा पुलस्त्य ऋषींचा नातू, तसेच विश्रवा आणि कैकसी यांचा पुत्र आहे. मुळातच ब्राह्मण कुटुंबातील रावण हा अतिशय विद्वान आणि वेदविद्यासंपन्न होता. त्याने कठोर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते; मात्र राक्षसांवर विजय म्हणून हिंदू ज्या रावणाचे दहन करतात, तो रावण गोंड समाजाचा राजा नक्कीच नाही.

सीताहरणाच्या व्यतिरिक्त रावण अत्यंत धार्मिक होता का ?

प्रभु श्रीरामाची धर्मपत्नी सीतामातेचे रावणाने हरण केले होते. एखाद्याच्या पत्नीला बळजोरीने फसवून पळवून नेणे, हे दंडनीयच आहे, तरी या अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करणारी विधाने रावणदहनाला विरोध करणारी मंडळी करत आहेत. राज्यघटनेनुसार जरी या प्रसंगाचा विचार केला, तरी परस्त्रीचे अपहरण करणे, फसवणूक करणे, डांबून ठेवणे आदी गंभीर गुन्ह्यांनुसार कठोर शिक्षा रावणाला मिळाली असती. अशा गंभीर अपराधाचे समर्थन कसे करता येईल ? हिंदूंच्या महान धर्मग्रंथांपैकी एक असलेल्या रामायणात उल्लेख केल्यानुसार रावणाने अनेक ऋषीमुनींची हत्या केली, यज्ञ उद्ध्वस्त केले, अनेक स्त्रियांवर अत्याचार केले आदी अनेक महापापे केली आहेत.

गोंड राजा रावण महात्मा असल्याचे कोणतेही संदर्भ आज उपलब्ध नाहीत; मात्र लंकाधिपती रावण अन्यायी आणि क्रूर होता, याचे अनेक संदर्भ आज उपलब्ध आहेत. त्यामुळे अत्याचारी, हत्या करणारा, विध्वंस करणारा रावण महात्मा कसा असू शकतो ? त्यामुळे अन्यायी राजा रावणाच्या दहनाची परंपरा आणि सध्या काही संघटना करत असलेला गोंड राजा म्हणून रावणाचे उदात्तीकरण यांमध्ये काहीही साम्य किंवा तथ्य नाही. म्हणून रावणदहनाच्या कार्यक्रमांना होणारा विरोध हा अनाठायी आणि अयोग्य आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या साम्यवादी विचारधारेने हिंदु समाजात फूट पाडण्याच्या हेतूने रावण, महिषासुर इत्यादी असुरांना षड्यंत्रपूर्वक ‘वनवासी जातीचे राजे’ म्हणून प्रस्तुत केले; पण हे सत्य नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि आपल्या परंपरेचे पालन केले पाहिजे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

दुर्जन प्रवृत्तीचा वध करण्याचे प्रतीक म्हणून रावणदहनाची परंपरा

रावण हा अतिशय विद्वान असूनही त्याचा वध का केला ? आणि त्याच्या दहनाचा उत्सव का साजरा केला जातो ? याचे कारण समजून घेतले पाहिजे. हिंदु धर्माचे महत्त्व येथे लक्षात येऊ शकते. व्यक्ती कितीही उच्चविद्याविभूषित असो, सामर्थ्यवान असो, राजघराण्यातील असो; पण जर ती व्यक्ती जनतेवर अन्याय करणारी असेल, ऋषीमुनींची हत्या करणारी असेल, यज्ञयागांचा विध्वंस करणारी असेल, तर ती अधर्मीच असून दंडास पात्र आहे. प्रभु श्रीरामाने अशा रावणाचा वध करून दुर्जन प्रवृत्तीचाच वध केला, याचे प्रतिक म्हणून रावणदहनाची परंपरा चालू आहे.