साधनेत विहंगम मार्गाने प्रगती करणार्‍या एकमेव श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या छायाचित्रांमधील पालटांद्वारे उलगडलेला त्‍यांचा दैवी प्रवास !

१. सध्‍या छोट्याशा कलियुगाच्‍या शेवटी बळावलेल्‍या अधर्माचा नाश करून धर्मराज्‍य (हिंदु राष्‍ट्र) स्‍थापन करण्‍यासाठी ईश्‍वराने सनातन संस्‍थेच्‍या ३ गुरूंच्‍या रूपात त्‍याचे अंशावतार जन्‍माला घातलेले असणे

धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यासाठी अवतारांचा जन्‍म होतो. त्रेतायुगाच्‍या शेवटी रामावतार झाला आणि द्वापरयुगाच्‍या शेवटी कृष्‍णावतार झाला. हे दोन्‍ही पूर्णावतार होते. एखाद्या युगाच्‍या शेवटी जेव्‍हा अधर्माचे टोक गाठले जाते, तेव्‍हा अधर्माचा नाश करून धर्मस्‍थापना करण्‍यासाठी प्रत्‍यक्ष अवतार जन्‍माला येतो. सध्‍या साधारण ४ लाख वर्षांच्‍या कलियुगाची ५ सहस्र वर्षेच झाली आहेत. त्‍यामुळे सध्‍या पूर्णावतार होणे शक्‍य नाही, तर अंशावतार होणे शक्‍य आहे. सध्‍या कलियुगाच्‍या अंतर्गत एक छोटेसे (काही सहस्र वर्षांचे) कलियुग संपून एक छोटेसे सत्‍ययुुग येण्‍याचा संक्रमण काळ चालू झाला असल्‍याने अंशावतार जन्‍माला येणे शक्‍य झाले आहे. ‘सध्‍या छोट्याशा कलियुगाच्‍या शेवटी बळावलेल्‍या अधर्माचा नाश करून धर्म (हिंदु राष्‍ट्र) स्‍थापन करण्‍यासाठी ईश्‍वराने सनातन संस्‍थेच्‍या ३ गुरूंच्‍या रूपात त्‍याचे अंशावतार जन्‍माला घातले आहेत’, असे सप्‍तर्षींच्‍या नाडीपट्ट्यांतून लक्षात आले. या ३ गुरूंचे समष्‍टी कार्यही अशा प्रकारेच चालू आहे.

२. पूर्णावतारी व्‍यक्‍तींचे गुण लहानपणापासूनच समाजासमोर येणे; पण अंशावतारी व्‍यक्‍तींच्‍या संदर्भात ईश्‍वराला त्‍यांच्‍याकडून कार्य करवून घ्‍यायची वेळ आल्‍यावरच त्‍यांच्‍यातील ईश्‍वरत्‍व प्रकट होऊ लागणे

राम आणि श्रीकृष्‍ण जन्‍माला आल्‍यावर ते अवतार असल्‍याचे सर्वसामान्‍य समाजाला ठाऊक नसले, तरी त्‍यांच्‍या बाललीला लहानपणापासूनच समाजाला अवगत होऊ लागल्‍या. त्‍यांनी लहानपणीच केलेला असुरांचा वध हा धर्मसंस्‍थापनेचाच भाग होता. याचा अर्थ त्‍यांचे गुण लहानपणापासूनच समाजासमोर येऊ लागले. याउलट अंशावतारामध्‍ये ईश्‍वराचे गुण असले, तरी ते त्‍यांच्‍या लहानपणापासून लोकांसमोर येत नाहीत. अंशावतारी व्‍यक्‍ती मोठ्या झाल्‍यावर आणि त्‍या समाजासमोर अवतरित व्‍हायची वेळ येते, तेव्‍हा त्‍या लोकांना कळू लागतात. याचा अर्थ ईश्‍वराला त्‍यांच्‍याकडून कार्य करवून घ्‍यायची वेळ आल्‍यावरच त्‍यांच्‍यातील ईश्‍वरत्‍व प्रकट होऊ लागते. त्‍यांचे गुण उजळू लागतात. तेव्‍हा काही वर्षांच्‍या कालावधीत त्‍या व्‍यक्‍तीच्‍या रूपामध्‍ये पालट झालेला सर्वांना ठळकपणे दिसून येतो, तसेच त्‍यांचे कार्यही लोकांसमोर येते.

अशाच प्रकारे या लेखामध्‍ये श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील छायाचित्रांमध्‍ये कसा पालट झाला आहे, ते दर्शवणारी छायाचित्रे, तसेच त्‍यांचे कोणते गुण कार्याद्वारे उजळून आले आहेत, हे दिले आहे.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यामधील साधनेतील घटकांमध्‍ये वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीत झालेले पालट

३ अ. भाव, अंतर्मनातील साधना, साधनेसाठीची तळमळ, अहं आणि वाईट शक्‍तींचा त्रास हे घटक : व्‍यक्‍तीमध्‍ये भाव, अंतर्मनातील साधना, साधनेसाठीची तळमळ आणि अहं या साधनेतील घटकांवरून तिच्‍या चालू असलेल्‍या साधनेची परीक्षा होते. साधना न करणार्‍या सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीमध्‍ये भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेसाठीची तळमळ हे घटक ० टक्‍के असतात, म्‍हणजे नसतातच, तसेच अहं अधिक, म्‍हणजे ३० टक्‍के असतो. सध्‍या कलियुगात साधना करणार्‍या व्‍यक्‍तीमधील भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेसाठीची तळमळ या घटकांचे प्रमाण अधिकाधिक ३० टक्‍के असू शकते. यावरून सामान्‍य व्‍यक्‍तीने साधना करून हे तीन घटक ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवणे आणि अहं ३० टक्‍क्‍यांवरून अल्‍प करत जाणे, हे साध्‍य करायचे असते. एखाद्या व्‍यक्‍तीला वाईट शक्‍तींचा जो त्रास असतो, तो प्रारब्‍धानुसार असतो. वाईट शक्‍तींचा त्रास अधिक असेल, तर आपली साधना तो त्रास दूर करण्‍यासाठी व्‍यय होते.

 

३ आ १. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची ६० टक्‍क्‍यांहून अल्‍प आध्‍यात्मिक पातळी असणे (वर्ष २००८ चे छायाचित्र) : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना त्‍या वेळी पुष्‍कळ प्रमाणात वाईट शक्‍तींचा त्रास होता. त्‍यामुळे त्‍यांच्‍या त्‍या छायाचित्राकडे अधिक वेळ बघता येत नाही.

 

३ आ २. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठणे (वर्ष २०११ चे छायाचित्र) : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पूर्वी अन्‍य सेवा करायच्‍या. पुढे त्‍या आश्रमातील साधकांच्‍या साधनेचे दायित्‍व घेऊ लागल्‍या. त्‍यामुळे त्‍या व्‍यष्‍टी स्‍तराच्‍या साधनेवरून समष्‍टी स्‍तराच्‍या साधनेकडे आल्‍या. त्‍या वेळी त्‍यांची २५ टक्‍के समष्‍टी साधना होऊ लागली. वरील सारणीवरून लक्षात येते की, तेव्‍हा त्‍यांच्‍यातील अहं अल्‍प झाला, तसेच त्‍यांना होणारा वाईट शक्‍तींचा त्रासही थोडा अल्‍प झाला. हे पालट त्‍यांच्‍या छायाचित्रावरून लक्षात येतात.

 

३ आ ३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी संतपद गाठणे (वर्ष २०१३ चे छायाचित्र) : पुढे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सर्वत्रच्‍या साधकांच्‍या साधनेचे दायित्‍व घेऊ लागल्‍या. त्‍या साधकांचे सत्‍संग घेऊ लागल्‍या. साधकांच्‍या साधनेतील अडचणी सोडवू लागल्‍या. आता त्‍यांची ५० टक्‍के समष्‍टी साधना होऊ लागली. त्‍यामुळे त्‍यांना संतपद प्राप्‍त झाले. त्‍या वेळी त्‍यांची अंतर्मनातील साधना, तसेच साधनेची तळमळ वाढली होती. साधना करतांना तळमळ असण्‍याला पुष्‍कळ महत्त्व आहे. संतपद प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांच्‍यातील आनंदात वाढ झाली, तसेच त्‍यांच्‍या चेहर्‍यावर तेज जाणवायला लागून त्‍यांची त्‍वचा पिवळसर झाल्‍याचे दिसून येते. संतपद प्राप्‍त केल्‍यावर त्‍यांना होत असलेल्‍या वाईट शक्‍तींच्‍या त्रासात पुष्‍कळ घट झाली, हेही वरील सारणीवरून, तसेच छायाचित्रातील डोळ्‍यांवरून लक्षात येते.

 

३ आ ४. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सद़्‍गुरुपद गाठणे (वर्ष २०१६ चे छायाचित्र) : पुढे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सर्वत्रच्‍या साधकांना साधनेत मार्गदर्शन करू लागल्‍याने त्‍या साधकांची साधनाही वाढू लागली, तसेच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असे अध्‍यात्‍मप्रसाराचे (हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे) कार्य भारतभरच नव्‍हे, तर जगभर होऊ लागले. अशा प्रकारे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची समष्‍टी साधना आणखी वाढून ती ७५ टक्‍के होऊ लागल्‍याने त्‍या सद़्‍गुरुपदी विराजमान झाल्‍या. त्‍या वेळी त्‍यांच्‍यातील साधनेची तळमळ आणखी वाढली, तसेच त्‍यांच्‍यातील अहंचे प्रमाण पुष्‍कळ अल्‍प झाले. त्‍या वेळच्‍या त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पाहिल्‍यास त्‍यांच्‍याकडून पुष्‍कळ प्रमाणात आनंद प्रक्षेपित होतांना जाणवतो, तसेच त्‍यांना वाईट शक्‍तींचा त्रास आता नसल्‍याचे लक्षात येते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या डोळ्‍यांत आता सहजतेने पहाता येते. त्‍यांचा चेहरा आणखी तेजस्‍वी झाल्‍याचेही लक्षात येते.

 

३ आ ५. सप्‍तर्षींनी ‘श्रीसत्‌शक्‍ति’ म्‍हणून घोषित करणे (वर्ष २०२२ चे छायाचित्र) : सप्‍तर्षींनी वर्ष २०१९ मध्‍ये श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘आध्‍यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित केले. त्‍यामुळे त्‍या दोघींना व्‍यष्‍टी साधना अशी काही उरलीच नसल्‍याने त्‍यांची १०० टक्‍के समष्‍टी साधना होऊ लागली. त्‍यानंतर  सप्‍तर्षींनी वर्ष २०२० मध्‍ये सौ. बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्‌शक्‍ति’ आणि सौ. अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्‌शक्‍ति’ ही उपाधी दिली. वर्ष २०२२ मधील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या छायाचित्राकडे पाहिल्‍यावर आपल्‍याला त्‍यांच्‍यामधील ‘श्रीसत्‌शक्‍ति’ या अवतारत्‍वाला साजेसे असे निखळ देवत्‍व सहजतेने लक्षात येते. त्‍या वेळी त्‍यांच्‍यामधील भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेसाठीची तळमळ या घटकांनी अत्‍युच्‍च पातळी गाठल्‍याचे सारणीतून लक्षात येते. हेच ते त्‍यांच्‍यातील देवत्‍व ! सप्‍तर्षी त्‍यांच्‍यातील श्री महालक्ष्मीदेवीच्‍या अंशाचा नेहमी उल्लेख करतात, तसेच त्‍यांच्‍या गुणवैशिष्‍ट्यांचे नेहमी कौतुक करतात.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या येथे दिलेल्‍या छायाचित्रांकडे ओळीने पहात गेल्‍यास आपल्‍याला त्‍यांच्‍या साधनेमध्‍ये झालेली वाढ आणि त्‍यांच्‍यामध्‍ये आलेले अवतारत्‍व सहजतेने लक्षात येते. अवतारत्‍व व्‍यक्‍त झालेल्‍या, तसेच विकसित झालेल्‍या त्‍यांच्‍या शेवटच्‍या छायाचित्राकडे आपण आकर्षित होतो आणि खिळले जातो. हेच ते देवत्‍वाचे लक्षण !

४. कृतज्ञता

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यासारख्‍या देवत्‍व असलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या छायाचित्रांची उकल होण्‍यासाठी शरणागतभावच हवा. यासाठी मी त्‍यांच्‍या छायाचित्रांचा सूक्ष्मातील अभ्‍यास करण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याही चरणी शरण गेलो; कारण ही सेवा करणे, हे सागराचा तळ शोधण्‍यासारखेच महा कठीण आहे. तरीही गुरुकृपेने ते मला शक्‍य झाले, यासाठी मी सनातनच्‍या तिन्‍ही गुरूंच्‍या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.१०.२०२३)

सप्‍तर्षींनी नाडीपट्ट्यांमध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे सनातन संस्‍थेचे ३ गुरु अवतारस्‍वरूप असल्‍याचा उलगडा करणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सप्‍तर्षींनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या सनातन संस्‍थेच्‍या ३ गुरूंची गुणवैशिष्‍ट्ये अन् त्‍यांचे हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या संदर्भातील कार्य यांचा उल्लेख अनेक नाडीपट्ट्यांमध्‍ये केला आहे. त्‍यामुळे ‘हे तिघे जण अवतारस्‍वरूप कसे आहेत’, याचा उलगडा सनातन संस्‍थेच्‍या आम्‍हा साधकांना झाला. या तिन्‍ही गुरूंना येथे दिलेल्‍या उपाध्‍या सप्‍तर्षींनीच दिल्‍या आहेत. त्‍यांवरून ‘डॉ. आठवले हे विष्‍णुस्‍वरूप आणि सौ. बिंदा सिंगबाळ अन् सौ. अंजली गाडगीळ या देवीस्‍वरूप आहेत’, हे लक्षात येते. तशा अनुभूतीही साधकांना येतात.