श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये एकाच वेळी देवीस्वरूप अवतारत्वाची सर्व लक्षणे विद्यमान आहेत. त्या आपादमस्तक प्रकाशमान दिसतात. त्यांची कांती अत्यंत तेजस्वी आहे; कारण त्यात देवत्व आहे. त्वचा अत्यंत नितळ आणि मऊ आहे; कारण त्या देहात साधकांप्रती असलेली ईश्वरी प्रीती आणि करुणा दडलेली आहे. केसांचा स्पर्शही मऊ आहे; कारण त्यात ईश्वरी चैतन्याच्या प्रवाहाची धारा आहे. त्यांचे डोळे पाणीदार दिसतात; कारण त्यात वात्सल्याचा ओलावा आहे. त्यांच्या चरणांची, हातांची नखे तजेलदार आणि पिवळसर झाली आहेत; कारण त्यातून अव्याहतपणे समष्टीच्या कल्याणासाठी चैतन्याची गंगोत्री कार्यरत आहे. त्वचेचा पोतही पारदर्शक बनला आहे; कारण देहात आता मायेचा लेशमात्र उरलेला नाही. उरला आहे केवळ गुरुकृपेचा झरा. त्यांची वाणी अत्यंत मधाळ आणि एखाद्या बालिकेसारखी निरागस आहे; कारण त्या वाणीत केवळ ईश्वराप्रती असलेला भाव आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या मस्तकावरील ब्रह्मरंध्राचा बिंदू अगदी स्पष्टपणे उघड्या डोळ्यांनीही प्रकाशमान दिसतो. यातून पांढरा प्रकाश स्रवत असतो. याची अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. जेव्हा बुद्धी अत्यंत सात्त्विक होऊन निष्कामपणे कार्य करू लागते, त्या वेळी ब्रह्मरंध्र सततच्या प्रकाशाने दैदिप्यमान दिसू लागते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या जीवनातील प्रत्येक कर्म निष्काम आणि भक्तीमय झाले असल्याने त्यांचे जीवन सहजभावाने परिपूर्ण बनले आहे आणि म्हणूनच त्या सतत वर्तमानात वावरत असून मायेत असूनही नसल्यासारख्या आहेत. श्री गुरुदेव त्यांच्या जीवनाचा प्राण असल्याने त्यांना जीवनात स्वतःसाठी करण्यासारखे काहीच उरलेले नाही. हेच ते समर्पित जीवन ! श्री गुरुदेवांनी त्यांना साधक, संत, सद़्गुरु अशा टप्प्यांतून नेऊन अगदी देवीतत्त्वापर्यंत लीलया आणून सोडले आहे.
अध्यात्मात प्रगती करतांना एखाद्याच्या अंगी देवत्वाचे एखाददुसरे लक्षण दिसते; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंमध्ये देवत्वाचे सर्वच गुण विद्यमान असल्यानेच महर्षींनी त्यांना देवीस्वरूप अवताराच्या रूपात गौरवले आहे, यात शंका नाही.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (११.१०.२०२३)