१. वैश्विक हिंदु अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मनात पुष्कळ भाव दाटून येणे
‘वैश्विक हिंदु अधिवेशनाच्या सेवेसाठी गुरुदेवांच्या कृपेने गुरुदेवांनीच मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी येण्याची सुबुद्धी दिली. मी पहिल्यांदाच सेवेसाठी आले होते. आश्रमात येताक्षणी माझ्या मनात पुष्कळ भाव दाटून आला. आश्रम पाहून मला गुरुदेवांबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
२. निवासासाठी पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या घरी जाताक्षणी पुष्कळ चैतन्य अनुभवणे
आश्रमात आल्यानंतर ‘आम्हाला निवासासाठी पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या घरी (खालच्या मजल्यावर) जायचे आहे’, हे कळताक्षणी मला ‘दुधात साखर’ असेच झाले. आम्हाला पू. वामनदादांच्या निवासाजवळ जाताक्षणी पुष्कळ चैतन्य अनुभवता येऊ लागले. निवासासाठी पू. दादांचे निवास मिळाले; म्हणून आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली.
३. पू. वामन यांच्या अनुभवलेल्या बाललीला !
३ अ. वीज गेल्यामुळे साधकांना उकाड्याचा त्रास होऊ नये; म्हणून पू. वामन यांनी पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करणे आणि त्यामुळे साधकांना उकाड्याचा त्रास न होणे : आम्ही निवासाला गेल्यानंतर २ दिवसांनी वीज सारखी खंडित होत होती. उकाडाही जाणवत होता. पू. दादा त्यांच्या आईला म्हणाले, ‘‘आता वीज खंडित झाल्यावर साधकांना उकाड्याचा किती त्रास होईल ? मी पावसाला सांगतो ‘तू अगोदर पडून जा’, म्हणजे थोडा थंडावा येईल. वीज नसल्यास साधकांना उकाड्याचा अधिक त्रास होणार नाही.’’ (पू. वामन यांच्या आई सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर [आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे]) त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडले. २ – ४ दिवस वीज खंडित होत होती; पण त्रास होत नव्हता. शांत झोप लागत होती. तेव्हा ‘देवाला किती काळजी आहे ?’, हे लक्षात आले.
३ आ. पू. वामन यांच्या खेळ खेळण्यातून पुढे घडणार्या घटनांची पूर्वसूचना मिळणे : पू. वामन यांच्याकडे निवासाला राहिल्यामुळे ‘बालसंत कसे असतात ?’, ते अनुभवता आले. त्यांचे घर पहाण्यासाठी त्यांच्या घरी आम्हाला बोलावले. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांची खेळणी पाहिली. तेव्हा ‘त्या खेळण्यांतून त्यांना सूक्ष्मातील कसे कळते ?’, हे लक्षात आले. सध्या ते श्रीराम मंदिर बांधण्याचा खेळ आहेत. त्यांच्या आईशी बोलत असतांना त्या म्हणाल्या, ‘‘पाणी नाही. पाण्याचे टँकर बोलवायचे’, असे खेळ पू. वामन खेळत आहेत.’’ नंतर आम्हाला कळले कुठेतरी पाणी संपल्याने टँकरने पाठीपुरवठा केला जातो. नंतर ते गाड्या घेऊन खेळत होते.
संतांची वाणी आणि त्यांचे बालपण, हे सर्व अनुभवता आले. देवाला प्रार्थना होत होती. ‘हे भगवंता, पू. वामनदादांचे चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे.’ परतीचे वेळी पू. वामनदादांचे निवास सोडतांना पुष्कळ भरून येत होते. आश्रमात गेल्यावर सारखे भावाश्रू येत होते. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– गुरुसेवक,
सौ. मेघा सुनीलराव वट्टमवार (वय ५७ वर्षे), अंबाजोगाई, बीड.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |