होमिओपॅथी औषधांची काळजी घेण्‍याची पद्धत, उपचारपद्धतीच्‍या मर्यादा आणि बाराक्षर औषधे

‘घरच्‍या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक ७) !

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धत घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

१५ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘घरगुती वापरासाठी कोणती औषधे किती प्रमाणात ठेवावी ? आणि औषधाचा साठा कसा ठेवायचा ?’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

७ ई. साठ्यातील औषधांची काळजी कशी घ्‍यायची ? : आपल्‍या घरासाठी होमिओपॅथी औषधे विकत घेतांना बाटलीला ‘ड्रॉपर’ असल्‍याची खात्री करावी. औषध घेतांना एक १५ मिलीची हवाबंद बाटली (seal-pack) घ्‍यावी. बाटली उघडल्‍यावर तिचे झाकण नीट घट्ट लावणे आवश्‍यक असते; कारण होमिओपॅथी औषध उडून जाऊ शकते. त्‍यामुळे आपण औषधांचा साठा केल्‍यानंतर प्रत्‍येक ५-६ मासांनी त्‍या बाटल्‍यांतून औषध उडून तर गेले नाही ना, हे बाटली न उघडता पहायचे. जर औषध उडून जात असल्‍यामुळे न्‍यून होत आहे, असे आढळले आणि आजूबाजूला औषध उपलब्‍ध होऊ शकत नसेल, तर एका बाटलीला त्‍या औषधाचे ‘लेबल’ लावून त्‍या बाटलीत साखरेच्‍या गोळ्‍यांवर ते थेंब टाकून ‘लेबल’ लावलेल्‍या प्‍लास्‍टिकच्‍या पिशवीत ते घालून ठेवायचे. याचे कारण ‘सर्व होमिओपॅथी औषधे एकसारखी दिसतात. त्‍यांना एकच वास येतो. साखरेच्‍या गोळ्‍या एकसारख्‍याच असतात. त्‍यामुळे विशिष्‍ट औषध ओळखता येत नाही’, हे आहे.

डॉ. अजित भरमगुडे

८. होमिओपॅथी उपचारपद्धतीच्‍या मर्यादा

होमिओपॅथी उपचाराचे अनेक लाभ आपण ‘सूत्र क्र. ४’मध्‍ये (२५ ऑगस्‍ट या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये) विस्‍ताराने समजून घेतले आहेत. काही परिस्‍थितींमध्‍ये मात्र होमिओपॅथी उपचार करता येत नाहीत. उदाहरणादाखल काही परिस्‍थिती पुढे दिल्‍या आहेत.

अ. आणीबाणीच्‍या शारीरिक स्‍थिती, उदा. अपघात, गुदमरणे (suffocation), श्‍वासाविरोध (asphyxia), बुडणे (drowning), वीज अंगावर पडणे, गोठणे (freezing)

आ. शल्‍यकर्म करणे अनिवार्य असणे, उदा. रक्‍तवाहिन्‍या फुटणे (rupture of blood vessels), अवयव फुटणे (rupture of organs), उदा. आंत्रपुच्‍छ फुटणे (rupture of appendix), मुतखडा मूत्रपिंडाच्‍या नलिकेत अडकणे किंवा पित्ताचा खडा पित्ताशयाच्‍या नलिकेत अडकणे, अस्‍थिभंग होणे

इ. विषबाधा होणे

ई. कृत्रिम प्रदीर्घ आजार (artificial chronic disease), उदा. अ‍ॅलोपॅथी उपचारांमुळे निर्माण झालेल्‍या काही स्‍थिती, उदा.‘स्‍टिरॉईड’ प्रदीर्घ काळ घ्‍यावे लागल्‍यामुळे निर्माण होणारा ‘कुशिंग्‍स सिंड्रोम’

उ. शरीरविज्ञानशास्‍त्रविषयक (physiological) प्रक्रियांच्‍या विरोधात जाणे, उदा. गर्भपात, मासिक पाळी पुढे किंवामागे आणणे.

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

९. बाराक्षार औषधे

‘बाराक्षार चिकित्‍सा’, ही उपचारांची एक सुलभ पद्धत असून जर्मनीचे डॉ. शुझ्‍लर (Dr. Schuessler) यांनी ती विकसित केली आहे. ‘बायोकेमिक’ हे नाव जर्मन शब्‍द ‘बायोस’ (Bios) आणि ‘केमिस्‍ट्री’ (Chemistry) यांपासून बनलेला आहे. ‘बायोस’ म्‍हणजे जीवन आणि ‘केमिस्‍ट्री’ म्‍हणजे पदार्थांचे गुणधर्म अन् त्‍यांच्‍या क्रिया, प्रतिक्रिया यांच्‍याशी संबंधित असलेले शास्‍त्र, म्‍हणजेच ‘बायोकेमिस्‍ट्री’ हे जीवनाशी संबंधित असे रसायनशास्‍त्र, म्‍हणजेच जीवनरसायनशास्‍त्र.

९ अ. डॉ. शुझ्‍लर  यांचा बाराक्षार उपचारपद्धतीचा सिद्धांत (Theory of Biochemic System)

९ अ १. इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्‍ती ही शरिराला आवश्‍यक असणार्‍या काही घटकांच्‍या योग्‍य प्रमाणावर अवलंबून असते. हे घटक म्‍हणजे पेशीसंग्रहांमध्‍ये असलेले अजैविक (inorganic) पदार्थ होय. या अजैविक पदार्थांमुळे इंद्रियांचे कार्य आणि अखंडत्‍व योग्‍य प्रकारे संतुलित केले जाते.

९ अ २. मृत्‍यूनंतर मानवाचे दहन केले असता १२ खनिजे शेष उरतात. यांनाच डॉ. शुझ्‍लर यांनी ‘टिश्‍यू सॉल्‍टस्’ (Tissue salts) असे म्‍हटले आहे. यांच्‍यामुळेच शरिराचे जिवंतपण आणि नैसर्गिक संतुलन राखले जाते. शरिरामध्‍ये निरनिराळे अजैविक पदार्थ निरनिराळ्‍या प्रमाणांमध्‍ये असून प्रत्‍येकाचे एक विशिष्‍ट कार्य असते. यांतील कोणत्‍याही क्षाराचे प्रमाण न्‍यून झाले असता रोग उत्‍पन्‍न होतो आणि ते क्षार योग्‍य प्रमाणामध्‍ये दिले असता व्‍यक्‍तीचे स्‍वास्‍थ्‍य पूर्ववत् होते. या क्षारांच्‍या उणिवेमुळे उतींमधील (विशिष्‍ट प्रकारच्‍या पेशींच्‍या समुहामधील) क्षारांच्‍या रेणूंमधील हालचालींमध्‍ये (Molecular motion) बाधा उत्‍पन्‍न होते आणि परिणामस्‍वरूप रोग उत्‍पन्‍न होतो. हे क्षार योग्‍य प्रमाणामध्‍ये दिल्‍यानंतर क्षारांची रेणूंमधील हालचाल योग्‍य होऊन उतींचे आणि पर्यायाने इंद्रियाचे कार्य सुधारते.

डॉ. शुझ्‍लर यांनी या क्षारांचे सामर्थ्‍य वाढवून (Potentise करून) बाराक्षारांची निर्मिती केली.

हे झाडाच्‍या उदाहरणावरून समजावून घेऊ. शरिराला जशी रक्‍ताची आवश्‍यकता असते तशी झाडाला मातीमधून मिळणार्‍या पोषक घटकांची आवश्‍यकता असते. झाडाची वाढ चांगली होण्‍यासाठी त्‍याच्‍या मुळाजवळील मातीमध्‍ये चांगली पोषणमूल्‍ये योग्‍य प्रमाणामध्‍ये असणेे आवश्‍यक असते. मातीमध्‍ये एखादा घटक जर अल्‍प असेल, तर झाडाची वाढ चांगली होत नाही. तो घटक खताच्‍या माध्‍यमातून दिला असता झाडाची वाढ चांगली होते. त्‍याचप्रमाणे मानवाच्‍या रक्‍तामध्‍ये काही घटक न्‍यून झाले, तर त्‍यामुळे रोग उत्‍पन्‍न होतो आणि त्‍या व्‍यक्‍तीला योग्‍य ते क्षार योग्‍य त्‍या प्रमाणामध्‍ये दिले असता रक्‍तामधील ती उणीव भरून येऊन आजारी व्‍यक्‍ती निरोगी होते.

 ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. तरी स्‍वउपचार करण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक, वाचक, राष्‍ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत.