खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर सुराज्‍य अभियानाची परिवहन आयुक्‍तांकडे मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – गणेशोत्‍सवाच्‍या काळात खासगी ट्रॅव्‍हल्‍सकडून भरमसाठ तिकीटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लूटमार केली जाते. या विरोधात तक्रार करण्‍यासाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा आणि याविषयी राज्‍यभरात जागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या सुराज्‍य अभियानाकडून करण्‍यात आली आहे. याविषयी सुराज्‍य अभियानाकडून ६ सप्‍टेंबर या दिवशी परिवहन आयुक्‍तांना निवेदन देण्‍यात आले.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गणेशोत्‍सवाच्‍या काळात अतिरिक्‍त तिकिटाविषयीच्‍या तक्रारीसाठी ८८५०७८३६४३ हा स्‍वतंत्र ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ क्रमांक दिला आहे. ‘अशा पद्धतीने राज्‍यभरात कार्यवाही व्‍हावी. बसस्‍थानके, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्‍यात यावा. ‘ट्‍विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्‍यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

‘डमी’ प्रवासी पाठवून कारवाई करावी !

‘खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या संकेतस्‍थळांवर शासनमान्‍य दरापेक्षा भरमसाठ दर उघडपणे देण्‍यात येत आहेत. तिकिटांची विक्रीही त्‍याच दराने होते का ? हे पडताळण्‍यासाठी ‘डमी’ प्रवासी पाठवून अधिक दर आकारणार्‍यांवर स्‍वत:हून (सुमोटो) कारवाई करावी आणि संबंधितांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्‍हा नोंदवावा’, अशी मागणी सुराज्‍य अभियानाकडून करण्‍यात आली आहे.