औषधांच्‍या दुष्‍परिणामांचा बागुलबुवा !

‘‘रक्‍तस्राव थांबण्‍यासाठी गोळ्‍या लिहून देते आणि रक्‍तवाढीच्‍या गोळ्‍याही चालू करा… खरेतर रक्‍तवाढीसाठी इंजेक्‍शन्‍स घेतली, तर लगेच बरे वाटेल..’’

‘‘नको, नको डॉक्‍टर..इंजेक्‍शन नको आणि तुम्‍ही ‘हॉर्मोन्‍स’च्‍या (संप्रेरकाच्‍या) गोळ्‍या दिल्‍या आहेत, त्‍याने दुष्‍परिणाम (साईड इफेक्‍ट) होतील ना ? मला रक्‍तवाढीच्‍या गोळ्‍याही सहन होत नाहीत. खरेतर मला कुठल्‍याच गोळ्‍या सहन होत नाहीत…’’

आता मला सांगा, काहीच औषधे आणि गोळ्‍या घ्‍यायच्‍या नसतील, तर डॉक्‍टरांकडे जादूची कांडी आहे का ? की, ती रुग्‍णाच्‍या डोक्‍यावर फिरवली की झाले बरे ? आणि आता रक्‍तस्राव होऊन शरिरामध्‍ये निम्‍मेच रक्‍त उरले आहे, तेव्‍हा ‘गोळ्‍या घेऊन आपला जीव वाचणार आहे आणि नाहीच काही केले, तर अतीदक्षता विभागामध्‍ये भरती करून रक्‍त चढवावे लागेल’, असे रुग्‍णाला समजावून सांगायला लागते. मग ते रुग्‍ण म्‍हणतात, ‘डॉक्‍टर उगाच घाबरवतात !’

मुळात आपल्‍या समाजात लोकांनी औषधांच्‍या दुष्‍परिणामांचा इतका मोठा बागुलबुवा करून ठेवला आहे की, दशकानुदशके अनेक शास्‍त्रज्ञांनी कष्‍ट करून शोध लावलेल्‍या औषधांची परिणामकारकता आपण सोयीस्‍करपणे विसरून जातो. आज मानवाची वाढलेली आयुमर्यादा आणि जीवनाची सुधारलेली गुणवत्ता या सगळ्‍या औषधांमुळे आहे, हे विसरून कसे चालेल ? एखाद्याला विषमज्‍वर झाला असेल, तर त्‍याचा जीव प्रभावी प्रतिजैविकांमुळेच (‘अँटिबायोटिक्‍स’मुळेच) वाचतो. मग त्‍या प्रतिजैविकांमुळे जरा पित्त झाले, पोट बिघडले, तोंडाची चव गेली, अशा तक्रारी करणे, म्‍हणजे ‘आग विझवायला आलेल्‍या अग्‍नीशमन वाहनाचा आवाज फार अधिक होत आहे’, अशी तक्रार करण्‍यासारखे आहे. अशा वेडगळ समजुतीमुळे काही लोक मधुमेह आणि रक्‍तदाब यांवरची औषधे मनानेच बंद करतात अन् स्‍वतःच्‍या प्रकृतीची फार मोठी जोखीम पत्‍करतात. दुष्‍परिणामांच्‍या अनाठायी भीतीमुळे रक्‍तदाबाची औषधे बंद केली आणि अर्धांगवायूचा झटका येऊन जन्‍मभर अंथरुणाला खिळलेले रुग्‍ण आपण बघतो. मधुमेहाची औषधे मनानेच बंद केल्‍यामुळे ‘रक्‍तातील साखर’ वाढून कोमात गेलेले रुग्‍ण, पायाच्‍या जखम चिघळून पाय कापावा लागणारे रुग्‍ण बघणे, हे अतीदक्षता विभागामध्‍ये काम करणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी नित्‍याचेच आहे. दुसर्‍या बाजूला आधुनिक वैद्यांना न विचारता गुडघा दुखतो; म्‍हणून मनानेच ‘स्‍टिरॉइड्‌स’सारख्‍या अतीधोकादायक गोळ्‍या घेणारीही एक वेगळीच श्रेणी आहे.


१. औषधांच्‍या दुष्‍परिणामांपेक्षा त्‍याच्‍या परिणामांचा विचार करा !

    डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

मुळात जगातील कोणत्‍याही औषधांचे थोडेफार दुष्‍परिणाम असतातच. त्‍या औषधांचे उपयोग आणि परिणामकारकता लक्षात घेऊन त्‍याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. काही वेळा हे दुष्‍परिणाम अधिक हानीकारक आहेत, असे वाटले, तर अशी औषधे बाजारात येऊ दिली जात नाहीत किंवा आली असतील, तरी त्‍यावर बंदी घातली जाते.

तुम्‍ही अगदी ‘पॅरासिटामॉल’चेही परिणाम सोडून दुष्‍परिणामांकडेच लक्ष द्यायचे ठरवले, तर तुम्‍ही कधीच कुठलेही औषध घेऊ शकणार नाही. काही वेळा दुष्‍परिणाम मानसिकही असतात. रुग्‍णाच्‍या मनात औषधांविषयी आधीच पूर्वग्रह असेल, तर असतील नसतील ते सगळे दुष्‍परिणाम दिसून येतात. त्‍यामुळे आधुनिक वैद्य हे प्रत्‍येक औषध देतांना दुष्‍परिणामांविषयी समजावून सांगत नाहीत. ‘एखाद्या रुग्‍णाला अम्‍लपित्त होईल, असे सांगितले की, त्‍याला हमखास अम्‍लपित्त होतेच आणि त्‍याविषयी काही माहिती नसेल, तर काहीच होत नाही’, हे आम्‍ही पुष्‍कळ वेळा पहातो. प्रत्‍येक आधुनिक वैद्याला शेवटी रुग्‍णाची मानसिकता पाहूनच उपचार करावे लागतात.

२. औषधे घेतांना रुग्‍णांकडून होणार्‍या चुका !

अ. बर्‍याच वेळा रुग्‍ण कधीतरी दिलेली औषधांची चिठ्ठी वापरून आधुनिक वैद्यांच्‍या सल्‍ल्‍याविना पुन: पुन्‍हा ती औषधे घेत रहातो. साहजिकच त्‍याचे दुष्‍परिणाम दिसले की, त्‍याचे खापर औषधे आणि आधुनिक वैद्य यांच्‍या माथी मारून मोकळे होतात. औषधे घेतांना साध्‍या साध्‍या सूचनांचे पालन केले जात नाही. काही औषधे रिकाम्‍या पोटी, तर काही जेवण केल्‍यानंतर घ्‍यायची असतात. त्‍याचप्रमाणे काही औषधे एकत्र घ्‍यायची नसतात. या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केल्‍यास रुग्‍णांना त्रास होऊ शकतो. गोळ्‍या त्‍यांच्‍या वेष्‍टनांमधून काढून ठेवणेही चुकीचे आहे. त्‍यामुळे त्‍यांची परिणामकारकता अल्‍प होऊ शकते.

आ. अजून एक मजेदार गोष्‍ट, म्‍हणजे एकीकडे आधुनिक वैद्यांना औषधांच्‍या दुष्‍परिणामांविषयी विचारून भंडावून सोडणारे रुग्‍ण आहेत आणि दुसरीकडे काहीही वैद्यकीय शिक्षण नसलेल्‍या औषधी दुकानातील विक्रेत्‍या’कडून वेळप्रसंगी मासिक पाळी लांबवणे आणि गर्भनिरोधक न वापरल्‍यास ऐनवेळी घेण्‍याच्‍या गोळ्‍या घेणारेही आहेत. कधी कधी तर बेकायदेशीर असलेल्‍या गर्भपाताच्‍या गोळ्‍याही घ्‍यायला मागे न पहाणारे लोक आहेत. या गोळ्‍यांमुळे स्‍त्रियांच्‍या प्रजनन संस्‍थेला आणि जिवाला ही धोका होऊ शकतो, याची कोणतीही काळजी केली जात नाही.

३. बाळापेक्षा गर्भवतीचा जीव महत्त्वाचा !

आम्‍हा स्‍त्रीरोगतज्ञांना गर्भवतीला औषधे देतांना विशेष काळजी घ्‍यावी लागते. कोणतेही औषध देतांना बाळावर काय परिणाम होईल ? याचा काटेकोरपणे विचार करावा लागतो; परंतु आईच्‍या जिवाला धोका असेल, तर बाळाच्‍या आधी आम्‍ही कायम आईचा विचार करून औषधोपचार करतो. उदाहरणार्थ आईला मलेरिया, विषमज्‍वर, डेंग्‍यू यांसारखा आजार झाला असेल, तर बाळाचा फार विचार न करता औषधे दिली जातात. कर्करोगाच्‍या रुग्‍णांना उपचार करतांना दुष्‍परिणामांचा विचार करत बसलो, तर रुग्‍ण गमावून बसण्‍याचा धोका नाही का ?

४. गंभीर आजार टाळण्‍यासाठी कोणतेही आजार शरिरावर काढण्‍याची वृत्ती सोडा !

रुग्‍णांनी हे सगळे नीट समजून घ्‍यायची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे ‘या औषधांचे काय दुष्‍परिणाम होतील ?’, असे विचारल्‍यावर ‘तुमचा रुग्‍ण बहुतेक जिवंत राहील !’, अशा शब्‍दांमध्‍ये आधुनिक वैद्यांच्‍या मनातील उद्विग्‍नता बाहेर पडू शकते.

‘हॉर्मोन्‍स’ जणू काही विष आहे, अशी ठाम अंधश्रद्धा असलेल्‍या स्‍त्रिया ‘पॉलिसिस्‍टीक ओव्‍हरीयन डिसिज’सारखे मासिक पाळीचे आजार वर्षानुवर्षे अंगावर काढून स्‍वत:चे शरीर आणि मन यांचे हालहाल करून घेतात. तसेच वंध्‍यत्‍व, अतीलठ्ठपणा आणि शेवटी मधुमेह, क्‍वचित् कर्करोग यांसारखे आजार ओढवून घेतात. त्‍यामुळे कोणतेही औषध कुणी, केव्‍हा, कशासाठी आणि किती काळासाठी दिले आहे ? यावर त्‍या औषधाचे परिणाम अन् दुष्‍परिणाम ठरतात.

५. रुग्‍णांचा आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय शास्‍त्र यांवरील विश्‍वास महत्त्वाचा !

त्‍यामुळे पुढच्‍या वेळी आधुनिक वैद्यांनी औषधे लिहून दिल्‍यावर त्‍याचे दुष्‍परिणाम काय होतील ? हा विचार करण्‍यापेक्षा त्‍या औषधांनी तुम्‍हाला बरे वाटणार आहे, हा विचार करणे महत्त्वाचे आहे. शेवटी आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय शास्‍त्र यांवर मनापासून विश्‍वास नसेल, तर तुम्‍हाला व्‍याधीमुक्‍त करणे आम्‍हाला फार अवघड जाते, हेही लक्षात घ्‍यायला हवे. त्‍यासाठी तुमच्‍या मानगुटीवरचे दुष्‍परिणामांचे भूत उतरवून त्‍याला मुक्‍ती द्याल का एकदाच ? बघा पटत आहे का ?

– डॉ. शिल्‍पा चिटणीस-जोशी, स्‍त्रीरोग आणि वंध्‍यत्‍वतज्ञ, कोथरूड, पुणे.