‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने आयोजित बैठकीत मंदिर विश्वस्तांचा निर्धार !
यावल (जिल्हा जळगाव) – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. बैठकीचे प्रास्ताविक सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिराचे सचिव, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. नीळकंठ चौधरी यांनी केले, तसेच ‘मंदिरात वस्त्रसंहितेची आवश्यकता’ या विषयावर सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी, तर ‘मंदिर संस्कृतीरक्षणाची आवश्यकता’ या विषयावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. वस्त्रसंहिता लागू करण्याच्या विषयानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या १४ मंदिरांच्या विश्वस्तांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय सांगितला. या बैठकीला तालुक्यातील ३५ हून अधिक मंदिरांचे मंदिर विश्वस्त उपस्थित होते.
महर्षि व्यास मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रमोद गडे आणि त्यांचे सर्व विश्वस्त सहकारी यांच्या साहाय्याने १८ ऑगस्ट या दिवशी मंदिराच्या सभागृहात यावल तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याला फैजपूर, हिंगोणा, हंबर्डी, बामणोद, चुंचाळे, दहिगाव, आमोदा आदी तालुक्यांतील विविध गावांतून मंदिर विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक मासाला अशी एकदा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्याचेही निश्चित करण्यात आले.