हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु धर्माची शकले पाडणार्‍यांचे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता !’, या विषयावर केलेले उद्बोधन

जिथे राज्य आहे, तिथे ते बळकावण्यासाठी युद्ध हे असणारच ! भारतासारख्या जागतिक स्तरावरील प्राचीन आणि प्रचंड साधनसंपन्न देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी, राज्य करण्यासाठी सहस्रो वर्षे प्रयत्न चालू आहेत. त्यात ‘इस्लामी क्रूर आक्रमणे, इंग्रज-पोर्तुगीज आदी ख्रिस्त्यांनी व्यापाराच्या नावे मिळवलेले राज्यनियंत्रण’ यांचा अनुभव आपण घेतला आहेच. ‘साम-दाम-दंड-भेद’, या नीतीचा वापर करून भारताला गुलाम बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यात साम्यवाद्यांचाही समावेश केला पाहिजे; कारण चीनमधील साम्यवादी (कम्युनिस्ट) सत्ता भारताच्या विरोधात प्रचंड शक्तीचा वापर करत आहे. जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे. विद्यापिठांतील विद्यार्थ्यांच्या मनात विविध प्रकारे राष्ट्र, धर्म आणि राज्यव्यवस्था यांच्या संदर्भात अन्यायाची भावना निर्माण करून त्यांनाच देशाच्या विरोधात उभे केले जात आहे. पुन्हा एकदा जातीव्यवस्थेला खतपाणी घातले जात आहे. हिंदु धर्माची शक्ती क्षीण करण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ या तत्त्वाचा उपयोग केला जात आहे. शत्रू बाहेरचा असल्यास त्याच्याशी लढण्यास सेना सक्षम आहे; मात्र येथे आपल्याच घरातील सदस्याला शत्रू बनवले जात असेल, तर याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

१. शैक्षणिक संस्थांमध्ये दलितांवरील अत्याचारांच्या नावे हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य !

भारतात गेली ७५ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या आधारे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राज्यव्यवस्था चालू आहे. त्यात धर्म, जात यांच्या आधारे भेदभाव करणे गुन्हा मानलेले आहे; मात्र तरीही ‘जणू काही मनुस्मृतीच्या आधारे राज्य चालू आहे आणि त्यातून दलितांवर अत्याचार केले जात आहेत’, असे चित्र उभे केले जात आहे. या प्रचारासाठी विद्यापिठांतून ‘आंबेडकर-पेरीयार स्टडी सर्कल’ निर्माण करून त्यातून केवळ हिंदु धर्माच्या विरोधात द्वेष निर्माण केला जात आहे आणि त्याचा प्रचार केला जात आहे. केवळ हिंदुत्वाला विरोध करण्यासाठीच देहलीतील जे.एन्.यू. (जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय), वाराणसीतील बी.एच्.यू. (बनारस हिंदु विश्वविद्यालय), देहली विश्वविद्यालय, जामिया मिलीया इस्लामिया, अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय, कोलकात्यामधील जादवपूर विश्वविद्यालय, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, आय्.आय्.टी., आय्.आय्.एम्., अशा प्रतिष्ठित संस्थांचा वापर करून त्यांतून हिंदु धर्मविरोधी, तसेच भारतविरोधी प्रचार केला जात आहे.

पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी स्थापन केलेल्या जे.एन्.यू.मधील ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा, आतंकवादी महंमद अफझलला समर्थन, नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यानंतर विजयोत्सव साजरा करणे, तसेच हिंदु धर्माला विरोध करण्यासाठी रावण, महिषासुर आदी राक्षस दलित असल्यामुळे त्यांची उच्च वर्णियांनी हत्या केल्याच्या निषेधार्थ रावण-महिषासुर यांची पूजा किंवा उत्सव साजरे करणे, या काही प्रत्यक्ष उघडकीस आलेल्या घटना आहेत. दुर्दैव असे की, ही विश्वविद्यालये जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून देशाच्या भावी पिढीलाच भारतविरोधी, राष्ट्र आणि धर्म द्रोही बनवण्याचे कार्य करत आहेत. साम्यवाद्यांच्या या अपप्रचारात अनेक विद्यार्थी फसत असून ते हिंदु धर्माच्या आणि भारतीय राज्यव्यवस्थेच्या विरोधात उभे रहात आहेत. भारताच्या आतच शत्रू-निर्मितीची प्रक्रिया चालू असणे, हे भविष्याच्या दृष्टीने भयंकर आहे.

श्री. रमेश शिंदे

१ अ. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाला ‘दलित अत्याचारा’चे नाव देणे : १७ जानेवारी २०१६ या दिवशी हैद्राबाद विश्वविद्यालयामध्ये रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’चा सदस्य असलेल्या रोहित वेमुलाने आत्महत्या केल्यानंतर अवघ्या काही घंट्यांतच देशभरातील विद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. याच ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’ने आतंकवादी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. रोहित वेमुलाने आत्महत्या कशामुळे केली ? हे समोर यायच्या आधीच या आत्महत्येच्या आडून हिंदु विचारसरणीला ‘दलितविरोधी’ ठरवून लक्ष्य केले गेले. प्रत्यक्षात रोहित वेमुला आणि त्याचे ४ मित्र यांना जातीभेदामुळे नाही, तर त्यांचे विद्यापिठातील वर्तन योग्य नसल्याने, तसेच त्यांच्यावर एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप असल्याने विद्यापीठ प्रशासनाने त्यांना वसतीगृहातून काढले होते आणि त्यांचे २५ सहस्र रुपये मासिक विद्यावेतन बंद केले होते. याविषयी देशभरात साम्यवादी संघटनांच्या विद्यार्थ्यांची प्रखर निदर्शने चालू झाल्यामुळे केंद्र सरकारला याची नोंद घ्यावी लागली. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती रूपनवाल यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय समिती नेमली.

अन्वेषणाच्या अंती असे लक्षात आले की, मुळात रोहित वेमुला हा दलित विद्यार्थी नव्हताच, तर तो ओबीसी गटातील होता. तसेच त्याने वैयक्तिक कारणांनी आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केली होती. रोहित वेमुलाने आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने ‘माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी मानू नये’, असे स्पष्ट लिहिले होते. इतके सर्व झाल्यावरही विद्यार्थ्यांनी आंदोलन चालूच ठेवल्यामुळे तत्कालीन केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या पत्रामुळे रोहित वेमुलावर कारवाई झाल्याने बंडारू दत्तात्रेय यांच्या विरोधात ‘अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रोसिटी) कायद्या’च्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला गेला.

या आंदोलनाचा मूळ गाभाच चुकीचा होता; मात्र केवळ ‘हिंदु विचारसरणी दलितांना न्यून लेखते आणि हिंदूंकडून आजही दलितांचा छळ केला जातो’, असा अपप्रचार करून दलितांना हिंदु धर्मापासून तोडण्यासाठीचे ते षड्यंत्र होते. प्रत्यक्षात भारताच्या इतिहासात हिंदु धर्माने कधीही कुणावरही अन्याय-अत्याचार करण्याची, गुलाम बनवण्याची शिकवण दिलेली नाही. ‘दलित’ या शब्दाला संस्कृतमध्ये पर्यायी शब्दही नाही. त्यामुळे ‘चातुर्वर्ण्याच्या माध्यमातून शूद्रांवर अन्याय केला जातो’, या अपप्रचाराचे वैचारिक खंडण होणे आवश्यक आहे.

१ आ. दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणाचा जातीय द्वेष पसरवण्यासाठी वापर ! : फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘आय्.आय्.टी. मुंबई’ येथील दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले. दर्शन सोलंकी याने आत्महत्या केल्यानंतर ‘त्याला जातीय भेदभावाची वागणूक मिळत असल्यानेच त्याने आत्महत्या केली’, असा आरोप करणे चालू झाले. लगेचच ‘आंबेडकर-पेरीयार-फुले स्टडी सर्कल’ने ‘कँडल मार्च’ (मेणबत्ती मोर्चा) काढून त्याचा निषेध केला. तसेच आय्.आय्.टी.च्या विद्यार्थ्यांची बैठक घेऊन प्रभु श्रीरामाच्या संदर्भात घाणेरडी वक्तव्ये करण्यात आली. कोणतेही पुरावे नसतांनाही ‘ब्राह्मणांनीच दर्शन सोलंकी याला आत्महत्येला प्रवृत्त केले’, असा सामाजिक माध्यमांवरून अपप्रचार करण्यात आला. त्याला बाहेरून काँग्रेसचे आमदार खतपाणी घालत होते.

प्रत्यक्षात या प्रकरणाच्या चौकशीत विशेष अन्वेषण पथकाच्या पोलिसांना असे आढळून आले की, दर्शनने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘अरमानने माझी हत्या केली’, असा उल्लेख होता. त्यावरून अन्वेषण केल्यावर पोलिसांना समजले की, दर्शन सोलंकीने सांप्रदायिक टिप्पणी केल्यामुळे त्याचा अरमान इकबाल खत्री नावाचा एक मुसलमान वर्गमित्र त्याला धमकावत होता. दर्शनने त्याची अनेकदा क्षमा मागूनही तो त्याला ‘कटर’ने मारण्याची धमकी देत होता.

यावरून पोलिसांनी अरमान खत्रीला अटक केल्यावर मात्र ‘आंबेडकरवादी-पेरीयार-फुले वादी सर्कल’ तात्काळ ‘सायलेंट मोड’वर (शांत झाले.) गेले. त्यांनी इस्लामच्या संदर्भात, त्यांच्या धमकावण्याच्या संदर्भात बैठका-प्रचार काहीही केले नाही. दर्शन सोलंकी याने आत्महत्या करण्यामागील खरे कारण समोर येण्यापूर्वीच आय्.आय्.टी.ला उच्च वर्णियांच्या नियंत्रणात असल्याचे घोषित करून ब्राह्मणविरोधी-हिंदुविरोधी प्रचार करण्यात आला. त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचे काम पद्धतशीरपणे केले.

तात्पर्य, अशा घटना घडताक्षणीच हिंदु विरोधकांकडून केल्या जाणार्‍या चुकीच्या प्रचाराचा प्रतिकारही तेवढ्याच शक्तीने व्हायला हवा. कालमहिम्यानुसार आता हिंदूंमध्ये जागृती होत आहे. ही जागृती अधिक व्यापक स्तरावर आणि प्रभावीपणे होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये भारताच्या संदर्भात ज्या विदेशी विद्वानांनी, तसेच प्रवाशांनी जे लिखाण केले आहे, त्यांपैकी मेगास्थनीस, ह्यू एन सांग, अल बरूनी, इब्न बतूता यांपासून १७ व्या शतकातील चार्ल्स बर्नियरपर्यंत २ सहस्र वर्षांतील भारतीय जीवनपटाचे वर्णन पाहिले, तर त्यांनी ब्राह्मण आणि हिंदु समाजाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; परंतु इथे कुणीही कुठेही स्पर्शास्पर्श (स्पृश्य-अस्पृश्य) भाग बघितला नाही, हे दिसून येते. आज मात्र जातीभेदाचे विष पेरून हिंदु समाजाचे तुकडे करण्याचे षड्यंत्र केवळ राजकीय, सामाजिक स्तरावरच नाही, तर शैक्षणिक संस्थांमधूनही मोठ्या प्रमाणात चालू आहे. नुकतेच जवाहरलाल नेहरू विद्यापिठात ‘ब्राह्मण भारत छोडो’च्या घोषणा विद्यापिठाच्या भिंतींवर लिहिल्या होत्या. याच विद्यापिठात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला गेला आहे. शैक्षणिक संस्थांना भारताच्या विभाजनाची केंद्रे बनण्यापासून थांबवायला हवे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (१.६.२०२३)

भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/701865.html