केवळ दर्शनाने सर्व भक्तांचे त्रिविध ताप दूर करणारे श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
रथारूढ भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासहित श्रीविष्णूचे दर्शन घेतल्याने सर्व भक्तांचे ताप, दैन्य, पीडा, भूत-पिशाचबाधा, दारिद्र्य, रोग, दुःख आणि ग्रहबाधा दूर होणार आहे. गेली अनेक वर्षे साधकांनी वाईट शक्तींचे नाना प्रकारचे त्रास सहन केले आहेत. ते त्रास दूर करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी गुरुदेव रथावर विराजमान होऊन साधकांना दर्शन देणार आहेत. सर्व साधकांनी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्या समवेत श्रीविष्णूचे डोळे भरून भावपूर्ण दर्शन घेतल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे. – सप्तर्षी (नाडीवाचन क्रमांक २२२, २३.२.२०२३)
सर्वत्रच्या भक्तांना भेटण्यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने रथारूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
पालखी उत्सव किंवा रथोत्सवाच्या निमित्ताने भगवंत वर्षातून एकदा भक्तांना भेटण्यासाठी स्वतः बाहेर पडतो. त्याप्रमाणेच सर्वत्रच्या साधकांना दर्शन देण्यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रथारूढ झाले. त्यांच्या त्या श्रीविष्णुअवतारी रूपाचे दर्शन घेणे हे साधकांचे परमभाग्य आहे. त्यांच्या कृपावत्सल रूपाकडे पहात रहावे, हृदयमंदिरात साठवावे आणि त्यांचे स्मरण करून कृतार्थ व्हावे, असेच सर्वांना वाटते ! त्यांची प्रसन्न मुद्रा पाहून वाटते,
तुज पहाता सामोरी दृष्टी फिरे न माघारी ।
माझे चित्त तुझ्या पाया । श्रीमन्नारायणा ।।
कृपावात्सल्य गुरुमाऊलीचे !
श्रीगुरूंचा दिव्य रथ जसजसा पुढे येत होता, तसे साधकांना भावाश्रू अनावर होत होते ! सनातनच्या दिव्य अवतारी गुरुपरंपरेचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेणे हा प्रत्येक साधकाच्या जीवनातील भाग्याचा क्षण होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही साधकांना पाहून भावजागृती झाली.
गुरूंच्या दर्शनासाठी दूरदूरहून आलेल्या साधकांना पाहून कधी त्यांच्या नेत्रांत भावाश्रू तरळले, तर कधी मुखावर अपार प्रीती दिसत होती ! त्यांच्या केवळ दृष्टीक्षेपानेही अनेक साधकांनी कृतार्थता आणि कृतज्ञता अनुभवली !