वर्ष २०२२ च्या रथोत्सवाच्या वेळी रथ निवडतांना साधिकेने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी !

वर्ष २०२३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी रथ बनवण्यामागील पूर्वपीठिका !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. अंजली क्षीरसागर

१. मायेतील कार्यक्रमांसाठी वापरलेले रथ प.पू. गुरुदेवांच्या रथोत्सवासाठी वापरणे अयोग्य वाटणे आणि ‘आपणच रथ बनवूया का ?’, असे त्यांना विचारल्यावर त्यांनी नकार देणे

‘वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी रथांचा अभ्यास करतांना आम्ही ‘सनातनच्या तिन्ही गुरूंना बसता येईल’, असे महाराष्ट्रातील काही रथ अभ्यासले. ते सर्वसाधारण जीपरथ होते. अशा प्रकारच्या रथांमध्ये जुन्या झालेल्या जीपचा सांगाडा वापरून त्यावर आकर्षक आसने सिद्ध केली जातात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विवाहानंतर वधू-वर यांची काढली जाणारी वरात किंवा अन्य कार्यक्रम यांसाठी ते वापरले जातात. ते रथ पाहून आम्हाला वाटले, ‘मायेतील कार्यक्रमांसाठी वापरलेले रथ गुरुदेवांच्या जन्मोत्सवासाठी कसे वापरणार ?’; म्हणून आम्ही गुरुदेवांना ३ वेळा विचारले, ‘‘आपणच आपला (सनातन संस्थेचा) एक रथ बनवून घेऊया का ?’’ तेव्हा तिन्ही वेळा ते म्हणाले, ‘‘आपल्याकडे अनेक सेवा प्रलंबित आहेत. त्यामुळे आता एवढा वेळ आणि पैसा व्यय करायला नको. जे उपलब्ध आहेत, त्यांतील एखादा सात्त्विक रथ वापरूया.’’

२. वर्ष २०२३ च्या जन्मोत्सवासाठी महर्षींनी रथ बनवण्याची आज्ञा केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दूरदृष्टी लक्षात येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आपला रथ बनवायला नको’, असे सांगितल्यामुळे वर्ष २०२२ च्या रथोत्सवासाठी आम्ही त्यातल्या त्यात सात्त्विक रथ पाहून तो वापरला होता. तेव्हा सर्वत्रचे जीपरथ पाहून ‘आपलीच एखादी गाडी वापरून तसाच जीपरथ बनवूया’, असा विचार आमच्या मनात आला; पण तेव्हा शास्त्रशुद्ध रथाचा विचारही आमच्या मनात आला नव्हता. या वर्षी आपला अत्यंत सात्त्विक आणि दिव्य रथ बनणार असल्यामुळेच मागच्या वर्षी गुरुदेवांनी रथ बनवायला नकार दिला असावा. यंदाच्या ब्रह्मोत्सवासाठी सप्तर्षींनी काष्ठरथ (लाकडाचा रथ) बनवण्याची आज्ञा केल्यावर ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

या प्रसंगातून गुरुदेवांची दूरदृष्टी दिसून आली. आम्ही तात्कालिक विचार करत होतो; परंतु काळाच्या पलीकडे लीलया पाहू शकणार्‍या गुरुदेवांनी आम्हाला योग्य दृष्टीकोन दिल्यामुळेच यंदा आपण हा दिव्य रथ पाहू शकलो !’

– सुश्री (कु.) अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२३)