‘रथनिर्मितीच्या निमित्ताने पू. कवटेकरगुरुजी यांच्याशी भेट होणे’, ही ईश्वरी इच्छा !‘साधकांची पू. कवटेकरगुरुजी यांच्याशी भेट होणे आणि त्यांनी साधकांकडून सेवा करून घेणे’, ही सर्व ईश्वरी इच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले. त्यांनी साधकांना काहीच ‘रेडिमेड’ (तयार) दिले नाही. गुरु जसे असायला हवेत, तसेच ते आहेत. साधक कागदावर रथाची प्रतिकृती रेखाटत होते. तेव्हा ते साधकांना म्हणाले, ‘‘तुम्हाला असे कसे येणार ? मोठ्या खोलीच्या भिंतीवर रथाच्या मापांनुसार चित्र काढा, तेव्हा तुम्हाला ते अधिक स्पष्ट होईल.’’ ‘पुढे भगवंत साधकांना एकेक कला कशी शिकवील !’, ते या उदाहरणातून माझ्या लक्षात आले.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२४.५.२०२३) |
सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या साधकांनी शिवमोग्गा (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी (वय ८५ वर्षे) यांच्या मार्गदर्शनाखाली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी काष्ठरथ बनवला. साधकांना ‘रथ कसा बनवतात ?, याविषयी काही माहिती नव्हती. पू. कवटेकरगुरुजी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे हा रथ साकार होऊ शकला. ‘पू. गुरुजींची साधकांशी झालेली भेट, त्यांनी रथनिर्मितीच्या सेवेत केलेले मार्गदर्शन आणि साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये’ पुढे दिली आहेत.
१. पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांची झालेली भेट आणि त्यांनी रथ बनवण्याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन !
१ अ. पू. कवटेकरगुरुजी यांना भेटल्यावर त्यांनी साधकांना रथ बनवण्याविषयी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करतांना साधकांना रथ बनवण्याविषयी आत्मविश्वास वाटू लागणे : ‘रथाच्या संदर्भात आम्हाला कोण साहाय्य करू शकते ? रथ कोण बनवून देऊ शकते किंवा त्यासाठी कोण योग्य मार्गदर्शन करू शकते ?’, हे आम्ही शोधत होतो. या कालावधीत पू. रमानंदअण्णा (सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा) यांनी या संदर्भात प्रयत्न केले. तेव्हा पू. अण्णांना ‘शिवमोग्गा (कर्नाटक) येथील पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी पंचशिल्पकार असून रथही बनवतात’, असे कळले. पू. अण्णा प्रथम पू. गुरुजींशी बोलले आणि नंतर त्यांनी आम्हाला पू. गुरुजींना भेटून यायला सांगितले.
साधारण १०.९.२०२२ या दिवशी आम्ही पू. कवटेकरगुरुजींकडे गेलो आणि त्यांना भेटून आमची संकल्पना अन् रथाचा काढलेला नकाशा दाखवला. नकाशा बघून त्यांनी ‘रथाच्या मजबुतीच्या दृष्टीने आणि अधिक चांगले दिसण्यासाठी काय पालट करायचे ?’, ते आम्हाला सुचवले. तेथे २ दिवस त्यांनी स्वतः बनवलेला रथ आम्हाला दाखवला आणि ‘रथ कसा असावा ?’, याविषयी आमच्याकडून अभ्यास करून घेतला. पू. गुरुजींनी आम्हाला रथाची उंची, रुंदी आणि मापे यांविषयी शिकवले. ‘रथाचे लाकडी जोड एकमेकांत कसे गुंततील ?’, तेही त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांनी आम्हाला रथाचे आराखडे काढून शिकवले.
पू. कवटेकरगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतांना साधकांना ‘रथ आपणच बनवू शकतो’, असा आत्मविश्वास वाटू लागला. तोपर्यंत ‘आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर एखाद्या चांगल्या रथशिल्पींकडून आपण रथ बनवून घेऊ’, असा विचार अधिक होता; पण पू. कवटेकरगुरुजींनीही साधकांना सांगितले, ‘‘या माध्यमातून तुम्ही तुमची कला श्री गुरूंच्या चरणी अर्पण करा !’’
१ आ. पू. कवटेकरगुरुजींनी साधकांना रथाचे रेखाचित्र काढून ठेवायला सांगणे आणि साधकांनी काढलेले रेखाचित्र त्यांना आवडणे : पू. कवटेकरगुरुजी जेवल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतात. त्यांनी विश्रांतीसाठी जातांना आम्हाला सांगितले, ‘‘रथाचे रेखाचित्र काढून ठेवा.’’ आम्ही जेवण करून लगेच रेखाचित्र काढायला आरंभ केला. ‘ते उठण्याआधी आपले रेखाचित्र काढून व्हायला हवे. त्यांचा वेळ जायला नको’, असा विचार करून आम्ही रेखाचित्र काढायचा प्रयत्न केला. पू. गुरुजी उठल्यावर आम्ही त्यांना ते लगेच दाखवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता बरोबर आहे. ‘तुम्ही काय करता ?’, हेच मी पहात होतो.’’ तेव्हा ‘संत कशी परीक्षा घेतात ?’, हे आमच्या लक्षात आले. ते रेखाचित्र त्यांना आवडले.
१ इ. पू. कवटेकरगुरुजी यांनी ‘सेवा करतांना देवाचे साहाय्य घेऊन नामजपासह सेवा केल्यावर देव साहाय्य करतो’, याविषयी सांगितलेली अनुभूती ! : पू. कवटेकरगुरुजींनी या रथाच्या संदर्भात मार्गदर्शन करतांना आम्हाला त्यांची एक अनुभूती सांगितली. ते म्हणाले, ‘‘मी एका मंदिराची एक सेवा घेतली होती. तेव्हा त्या सेवेसाठी माझ्या साहाय्याला दोनच कामगार होते अन् ती सेवा ठराविक वेळेत पूर्ण करायची होती. अकस्मात् दोन्ही कामगार काम सोडून गेले. तेव्हा मी ‘आता कसे करायचे ?’, असा विचार करत देवाला प्रार्थना करून सेवा चालू केली. सेवा करतांना प्रत्येक वेळी मी ‘शिवाय शिवाय शिवाय ।’, असा नामजप करत होतो. माझी सेवा २० फूट उंचीवर चालू होती, तरीही मी घाबरलो नाही. मी एकटाच साहित्य खालून वर घेऊन जाऊन सेवा करत होतो. (पू. गुरुजींचे वय ८५ वर्षे आहे.) या सेवेत देवाने मला साहाय्य केल्यामुळे १५ दिवसांची सेवा ८ दिवसांत पूर्ण झाली.’’ ते ऐकून आम्हाला शिकायला मिळाले, ‘प्रत्येक सेवा नामजपासह केली, तर देव साहाय्य करणारच आहे.’ त्यामुळे आम्ही तसे प्रयत्न करणे चालू केले.
१ ई. पू. गुरुजींकडे केलेल्या अभ्यासाच्या आधारे सौ. जान्हवी शिंदे यांनी प.पू. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करून श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट करणारा रथाचा प्राथमिक आराखडा सिद्ध करणे : ‘रथ कुणाकडून बनवून घेऊ शकतो ?’, याचा अभ्यास करतांना शेवटी ‘साधकांनीच रथ बनवायचा’, असे ठरले. आम्ही रामनाथी आश्रमात परत आल्यावर पू. कवटेकरगुरुजींकडे केलेल्या अभ्यासाच्या आधारे सौ. जान्हवी रमेश शिंदे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करून श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट करणारा रथाचा प्राथमिक आराखडा सिद्ध केला.
१ उ. पू. गुरुजींनी रामनाथी आश्रमात येऊन साधकांना रथाविषयी मार्गदर्शन करणे : पू. कवटेकरगुरुजींचे वय ८५ वर्षे आहे, तरीही त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही रामनाथी आश्रमातच रथ बनवा. मी मध्ये मध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतो.’’ आम्ही त्यांना जेव्हा बोलावले, तेव्हा प्रत्येक वेळी आश्रमात येऊन ते आम्हाला मार्गदर्शन करत असत. गुरुदेवांच्या कृपेमुळे पू. गुरुजींनी आम्हाला पूर्ण समजेपर्यंत पुनःपुन्हा मार्गदर्शन केले.’
– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ ऊ. श्री विष्णुतत्त्वाच्या आकाराच्या रथात पू. कवटेकरगुरुजी यांनी सांगितलेली सर्व प्रायोगिक सूत्रे लक्षात घेऊन पालट करणे : ‘रथाचे हे चित्र आम्ही पू. कवटेकरगुरुजींना दाखवले. पू. कवटेकरगुरुजी यांनी सांगितलेल्या सुधारणा अगदी प्रायोगिक तत्त्वावर होत्या. रथशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. ‘निव्वळ चित्राकडे पाहूनच ते प्रत्यक्ष रथ बांधणी झाल्यावर काय अडचणी येऊ शकतील ?’, हे सांगत असत.
श्रीविष्णुतत्त्वाच्या आकाराच्या रथात पू. कवटेकरगुरुजी यांनी सांगितलेली सूत्रे लक्षात घेऊन पालट केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ही दोन्ही चित्रे पू. गुरुजींना पहाण्यासाठी ठेवायला सांगितली. गुरुजींनी ‘तो शहरातील अरुंद रस्त्यावरून जाणार असल्याने त्याची रुंदी किती असावी ? त्या रुंदीला अनुसरून लांबी किती असल्यास चांगले दिसेल ? लांबी आणि रुंदी यांच्या तुलनेत उंची किती असावी ? रथ वळणावर सहज आणि सुरक्षित वळेल अन् साधकांना सहज ओढता येईल’, असा आकार सांगितला. त्यांच्या अनुभवावरून सिद्ध झालेल्या रथाचे अनेक बारकावे त्यांनी आम्हाला शिकवले.’
– सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा.
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)
पू. कवटेकरगुरुजी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. प्रेमभाव
‘आम्ही उक्कडगात्री (कर्नाटक) येथे गेल्यावर त्यांनी आम्हाला निवासासाठी तेथील ‘भक्त निवास’मध्ये खोल्या दिल्या होता. ‘आम्हाला तेथील जेवणात अडचण नाही ना ?’, हेही ते बघायचे. ते आमच्यासाठी वेळोवेळी चहा आणि अल्पाहार स्वतःहून घेऊन जायचे. ‘श्री. रामानंददादांना (श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)) यांना आध्यात्मिक त्रास आहे’, हे ठाऊक असल्याने पू. गुरुजींनी दादांना तेथील संगमावर अंघोळ करून देवतेचे दर्शन घेण्यास सांगितले. ‘उक्कडगात्री’ या तीर्थक्षेत्री बसववाप्पा स्वामी यांचे समाधीमंदिर आहे. ‘आम्हा सर्वांना तीर्थक्षेत्राचा लाभ व्हावा’, यासाठी ते स्वतःच्या ओळखीने आम्हाला मंदिराच्या आतपर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी ‘साधकांना चांगले दर्शन मिळेल’, असे पाहिले.
२. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता
‘गुरुतत्त्व कसे कार्यरत असते ?’, हे पू. गुरुजींच्या उदाहरणातून आम्हाला शिकता आले. आम्ही उक्कडगात्री येथे गेलो असतांना पू. गुरुजींनी आम्हाला रथाचा आराखडा कागदावर काढण्यास सांगितला होता. त्या कालावधीत पू. गुरुजी विश्रांती घेत होते. विश्रांती घेत असतांना ते मध्येच उठून आले आणि रथाच्या आराखड्यात चुका असल्याचे त्यांनी आमच्या लक्षात आणून दिले. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुमचे चुकत आहे’, असा विचार देवानेच मला दिला.’’
३. ‘साधक साधनेत कुठे न्यून पडतात ?’, हे सांगून साधनेत साहाय्य करणे
आम्ही ५ साधक त्यांच्याकडे गेलो होतो. ‘आम्ही साधनेत कुठे न्यून पडतो ? साधना म्हणून आम्ही काय करायला हवे ?’, हेही त्यांच्या पहिल्याच भेटीतच त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांनी जान्हवीताईला (सौ. जान्हवी रमेश शिंदे यांना) उतावीळपणा आणि मनात गोंधळ असल्याची जाणीव करून दिली. ‘मी (श्री. प्रकाश सुतार) बोलत नाही’, याची जाणीव मला करून दिली. एखादे सूत्र समजावून सांगितल्यावर ते मला बोलण्यास उद्युक्त करण्यासाठी मलाच परत प्रश्न विचारायचे. अन्य कुणी उत्तर देत असल्यास त्यांना थांबवायचे. रामनाथी येथे आल्यानंतरही ‘मी बोलतो कि नाही ?’, याचा पाठपुरावा ते घेत होते. ‘साधकांची साधना व्हावी’, ही त्यांची तळमळ आमच्या लक्षात आली. जसे प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘आमची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्नरत असतात. तसे ते आमची साधना होण्यासाठी प्रयत्न करत होते.’
– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
पू. गुरुजींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव !‘पू. कवटेकरगुरुजी संत असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या आकारात सात्त्विकता होतीच; पण ‘त्यात श्रीविष्णुतत्त्व कसे आणायचे ?’, याचे प्रयोग करून चित्र पूर्ण केले. गुरुजींकडून प्रायोगिक भाग शिकतांना मला त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भावही शिकायला मिळाला. पू. गुरुजींनी सांगितले, ‘‘गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) रथात बसल्यावर त्यांचे चरण आपल्या डोळ्यांच्या समोरच (स्तरावर) यायला हवेत. प्रत्येक भक्ताला गुरूंचे चरण दिसायला हवेत.’’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथात चढणे आणि बसणे’, याविषयी पू. कवटेकरगुरुजींनी सांगितलेली सूत्रे ऐकून त्यांचा गुरुदेवांप्रतीचा भाव स्पष्ट होत असे. रथाचे शास्त्र शिकवतांना ते बर्याचदा आम्हाला सांगत, ‘‘तुम्ही हे प.पू. गुरुदेवांना विचारून घ्या. ते म्हणतील तसेच आपण करूया.’’ त्यांना इतके ज्ञान असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित तत्त्व रथात येण्यासाठी रथाच्या चित्रात पालट केल्यास ते स्वीकारत असत.’ – सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा. |
पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांच्या प्रती कृतज्ञता !‘पू. कवटेकरगुरुजी यांचे मोलाचे मार्गदर्शन, त्यांनी साधकांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास, रथाचे बारकावे समजावून सांगणे, त्यासाठी स्वतः कृती करून दाखवणे, साधकांना त्यांच्या साधनेतील अडथळे लक्षात आणून देऊन साधनेच्या स्तरावरही साहाय्य करणे’, या सर्वांमुळेच आम्ही रथनिर्मितीची सेवा पूर्ण करू शकलो’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – रथनिर्मितीच्या सेवेतील सर्व साधक (१६.५.२०२३) |
|