इस्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारताने २९ मे या दिवशी ‘एन्व्हीएस-०१’ हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला. येथील कॅप्टन सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून इस्रोने जी.एस्.एल्.व्ही. (जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल) एफ् १२ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अंतराळ प्रक्षेपित केला. एन्व्हीएस्-०१ हा उपग्रह आय.आर्.एन्.एस्.एस्.-१जी या उपग्रहाची जागा घेणार आहे. भारतीय उपखंडात संरक्षण क्षेत्र आणि नागरी वापराकरता दिशादर्शक म्हणून या उपग्रहाचा वापर होणार आहे. स्वदेशी बनावटीची ही दिशादर्शक प्रणाली अमेरिकेच्या जी.पी.एस्.प्रमाणे काम करणारी आहे. एन्व्हीएस-०१ प्रमाणे याआधीच ६ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी याविषयी सर्वांचे अभिनंदन केले. भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणारी महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ चाचणी मोहीमही लवकरच पार पाडणार आहे, असे सोमनाथ यांनी या वेळी सांगितले.

अमेरिकेने साहाय्य नाकारल्यामुळे भारताने बनवले उपग्रह !

वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी भारताच्या सीमेत घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेकडे साहाय्य मागितले होते; मात्र अमेरिकेने जी.पी.एस्. साहाय्य देण्यास नकार दिला. त्यानंतर भारत स्वतःची या संदर्भातील उपग्रह प्रणाली बनवण्यात गुंतला होता. भारताने ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’ (NavIC) नावाची प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली विकसित केली आहे.