#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू होता. यास्तव दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली होती. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्याचा प्रयत्न केला गेला. आज या वृत्तमालिकेचा अंतिम भाग येथे प्रसारित करत आहोत.

शतपैलू सावरकर

२८ मे, बेंगळुरू (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तीमत्व महान आहे. त्यांचे जीवन आणि कर्तृत्व स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील असून ते इतिहासकारही आहेत. भारतावर परकियांनी अनेक वेळा आक्रमण केले. आक्रमणकर्त्यांचा काळ अत्यंत क्रूर होता. ते रानटी होते. भारतियांना आक्रमकांच्या हातून पुष्कळ त्रास सहन करावा लागला. आक्रमणकर्त्यांनीही इतिहास लिहिला. जेव्हा ते इतिहास लिहितात, तेव्हा स्वाभाविकपणे ते त्यांच्या दृष्टीकोनातून लिहितात; पण केवळ सावरकरांनीच इतिहास हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे. सावरकरांच्या पुस्तकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही, असे मत संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका आणि कर्नाटक येथील विधान परिषदेच्या माजी सदस्या डॉ. एस्.आर्. लीला यांनी व्यक्त केले. दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने ‘सावरकरांचे हिंदुत्व आणि राष्ट्राविषयीचे विचार विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवायला हवेत ?’ या विचारलेल्या प्रश्‍नावर त्या बोलत होत्या.

डॉ. एस्.आर्. लीला

डॉ. एस्.आर्. लीला पुढे म्हणाल्या की, सावरकरांनी इतिहासावर ३ ग्रंथ लिहिले आहेत. एक म्हणजे ‘भारतीय इतिहासातील सहा गौरवशाली युगे’, दुसरे म्हणजे ‘मराठा चळवळ : हिंदूपदपादशाही’ आणि तिसरा हा ‘शिखांचा इतिहास’ आहे. दुर्दैवाने ‘शिखांचा इतिहास’ हे तिसरे पुस्तक उपलब्ध नाही; पण सावरकरांनी त्यांच्या अन्य २ कामांमध्ये शीख गुरूंनी दिलेल्या योगदानाचा आणि सर्वोच्च बलीदानाचा अत्यंत आदरपूर्वक अन् कृतज्ञतेने उल्लेख केला आहे.

‘भारतीय इतिहासातील सहा गौरवशाली युगे’ हे पुस्तक भारतियांनी कसा संघर्ष केला आणि त्यांच्या धर्माचे, त्यांच्या भारतियतेचे सार कसे टिकवून ठेवले ?, याचा सुंदर चित्र उभे करते. त्यांच्या दुसर्‍या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाजीराव पेशवा जिंकेपर्यंत एक गौरवशाली युग होऊन गेले. त्या वेळच्या सर्वांत क्रूर सैन्याने भारतावर आक्रमण केले होते. त्या वेळी शूरवीर आणि धाडसी मराठ्यांनी मोगल साम्राज्याचा पाडाव केला आणि त्यांनी हिंदूपदपादशाहीची स्थापना केली.