परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे आंध्रप्रदेशात ९ विद्यार्थ्यांची आत्महत्या !

आत्महत्या करणार्‍यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश

भाग्यनगर – आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाकडून इयत्ता अकरावी आणि बारावीचा निकाल २६ एप्रिलला घोषित करण्यात आला. हा निकाल घोषित झाल्यानंतर अवघ्या ४८ घंट्यांत ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासह आणखी दोघा विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही उघड आले आहे.

आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाच्या वतीने अकरावीच्या परीक्षा १५ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत, तर बारावीच्या परीक्षा १६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेसाठी एकूण १० लाख ३ सहस्र ९९० विद्यार्थी बसले होते. यात अकरावीचा निकाल ६१ टक्क, तर बारावीचा निकाल ७२ टक्के लागला आहे. या परीक्षेत काही जण अनुत्तीर्ण झाल्याने, तर काहींना अपेक्षेपेक्षा अल्प गुण मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी सरन्यायाधिशांनी व्यक्त केली होती चिंता !

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीस डी.वाय. चंद्रचूड यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या सूत्रावरून चिंता व्यक्त केली होती. आपल्या शैक्षणिक संस्था कुठे चुकत आहेत ?, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता.

संपादकीय भूमिका

याला विद्यार्थीदशेपासूनच साधना न शिकवणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच साधना शिकवली असती, तर त्यांच्यात अपयश पचवण्याचे सामर्थ्य निर्माण झाले असते आणि अपयशावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची प्रेरणा मिळाली असती !