मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना नाही, तर पुजार्‍यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकार कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणार नाही. त्यामुळे जेवढी भूमी मंदिरांच्या नावावर आहे, तेवढ्या भूमीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या भूमीचा लिलाव केवळ पुजार्‍यांनाच करता येईल. याखेरीज जी खासगी मंदिरे आहेत आणि जिथे विश्‍वस्त मंडळ आहे तेथेही पुजार्‍यांना सन्मानपूर्वक मानधन देण्याचा नियम सिद्ध करून निर्देश दिले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथे एका सभेत दिली.

ब्राह्मणांनी धर्माचे रक्षण केले !

शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मला हे सांगतांना गर्व वाटतो की, ब्राह्मणांनी धर्म, अधात्म, ज्ञान, विज्ञान, योग, आयुर्वेद, परंपरा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे काम केले. त्यांनी यज्ञ, हवन, शास्त्र आदी सर्व सुरक्षित ठेवण्याचे काम केले. त्यांनी संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम केले.

ब्राह्मणांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करणार !

व्यास ऋषींनी महाभारत लिहिले, संत तुलसीदास यांनी रामायण लिहिले. प्रत्येक क्षेत्रात असे ब्राह्मण विद्वान आहेत. त्यामुळे आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षक ब्राह्मण आहेत. त्यांच्या कल्याणासाठी ‘ब्राह्मण कल्याण मंडळा’ची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही शिवराज सिंह चौहान यांनी या वेळी केली.

संपादकीय भूमिका 

  • जर मध्यप्रदेश सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्य सरकारे का घेऊ शकत नाहीत ?
  • मध्यप्रदेश सरकारने याहीपुढे जाऊन मंदिरांचे झालेले सरकारीकरण रहित करून सर्व मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात द्यावीत !