रशिया-युक्रेन युद्ध संपवण्‍याविषयी अमेरिकेला रस का आहे ?

एक वर्षाच्‍या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धामध्‍ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. सध्‍याच्‍या लष्‍करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे. रशिया आणि चीन यांच्‍यामध्‍ये पश्‍चिमी राष्‍ट्रांना कमकुवत करण्‍यासाठी डावपेच आखले जात नाहीत अन् तैवान अधिक असुरक्षित आहे तोपर्यंत हे झाले पाहिजे. अलिकडेच नवी देहली येथे अमेरिकेचे सचिव अँथनी ब्‍लिंकन आणि रशियाचे परराष्‍ट्रमंत्री सेरजे लवरोव यांची समोरासमोर बैठक झाली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्‍यानंतर पहिल्‍यांदाच उच्‍चस्‍तरावर विचारांची देवाणघेवाण होणे, हे वेगळेच होते. यावरून ‘राजकारण’ हा शब्‍द कदाचित् वाईट म्‍हटला जाणार नाही. ‘जी २०’ (जी २० म्‍हणजे जगाच्‍या सकल उत्‍पन्‍नाच्‍या ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उत्‍पन्‍न असणारे १९ देश आणि युरोपियन युनियन यांचे अर्थमंत्री आणि मध्‍यवर्ती बँक गव्‍हर्नर यांची संघटना) परिषदेच्‍या वेळी १० मिनिटांच्‍या दुसर्‍या बैठकीत अमेरिकेचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी दिलेल्‍या अहवालानुसार ‘युक्रेनला ते वाटाघाटी करण्‍यास सिद्ध आहेत, असे रशियाने दाखवावे’, अशी विनंती केली. या अलिकडच्‍या हालचालीवरून युद्धबंदी ही आवाक्‍यात असून ती शक्‍य आहे, असा आशेचा किरण दिसत आहे.

प्रा. ब्रह्मा चेल्लानी

१. रशिया-युक्रेन युद्धाचा जागतिक परिणाम

रशिया-युक्रेन यांच्‍यातील युद्धाने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांचा पाया डळमळला आहे. अनेक बाजूंनी विचार केला, तर हे जगातील दोन मोठ्या शक्‍तींमधील प्रातिनिधिक स्‍वरूपाचे युद्ध आहे. यामध्‍ये रशियाला चीनचा, तर युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा आहे. गतकाळात युद्धामध्‍ये जागतिक ऊर्जा आणि अन्‍न यांविषयी समस्‍या उत्‍पन्‍न झाल्‍या असून त्‍यामुळे महागाई वाढून जागतिक वाढ मंदावली आहे, तसेच धोके वाढले आहेत. उदा. रशियाने अलिकडेच रशिया आणि ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) संघटनेतील देशांच्‍या संघर्षामध्‍ये काळ्‍या समुद्रामध्‍ये अमेरिकेचा ड्रोन पाडला.

२. रशिया-युक्रेन युद्धामुळे त्‍यांना झालेले लाभ आणि हानी

रशियाचे अध्‍यक्ष व्‍लामिदिर पुतिन यांचा दृढ विश्‍वास आहे की, सध्‍याचे लांबलेले युद्ध हे त्‍यांच्‍या बाजूने लाभदायक आहे आणि रशियाच्‍या सैन्‍याला युक्रेनमध्‍ये कहर माजवण्‍यास, तसेच यामुळे पाश्‍चिमात्‍य देशांची परीक्षा पहाण्‍यास संधी मिळत आहे. युक्रेनच्‍या वायूदलाच्‍या बचावावर मात करण्‍यासाठी रशिया समांतर पातळीवर त्‍याच्‍या ‘किंझाल हायपरसॉनिक’ शस्‍त्रांसह पाडण्‍यास अशक्‍य असणारी अधिकाधिक क्षेपणास्‍त्रे युक्रेनवर सोडत आहे. याउलट पश्‍चिमी राष्‍ट्रांकडून मोठ्या प्रमाणात शस्‍त्रास्‍त्रे पुरवली जात असूनही युक्रेन रशियाकडून होणारी तीव्र स्‍वरूपातील हवाई आक्रमणे रोखू शकलेला नाही; परंतु रशियाही स्‍वतःचे राजकीय धोरण युक्रेनमध्‍ये साध्‍य करू शकलेला नाही, हे अधिकाधिक प्रमाणात स्‍पष्‍ट होत आहे. त्‍याने युक्रेनचा एक पंचमांश भाग कह्यात घेतला असला, तरी त्‍याने अजून एक शेजारी शत्रू निर्माण केला आहे. फिनलँड आणि कदाचित् स्‍वीडन या देशांचा ‘नाटो’च्‍या सूचीमध्‍ये समावेश होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे ‘नाटो’मध्‍ये पुन्‍हा नवीन चैतन्‍य पसरले आहे.

३. युद्धामुळे रशियावर झालेले विविध परिणाम

पाश्‍चिमात्‍य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात घातलेले निर्बंध हे युद्धानंतरही त्‍याला सहन करावे लागतील आणि याचा रशियाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर दीर्घकालीन परिणाम होणार आहे; परंतु त्‍याच वेळी अमेरिकेचे अध्‍यक्ष जो बायडेन यांचे ‘सॉफ्‍टवेअर पॉवर’ तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून आणि जागतिक आर्थिक स्‍थितीचे शस्‍त्र पुढे करून रशियामध्‍ये शिरकाव करण्‍याचे डावपेच हे पुतिन यांची रशियातून घसरण करण्‍यास अन् ‘रूबल’चे (रशियाचे चलन) अवमूल्‍यन करण्‍यास अपयशी ठरले आहेत. अमेरिकेकडून लादल्‍या गेलेल्‍या निर्बंधामुळे रशियाला त्‍याच्‍याकडे असलेल्‍या स्रोतांचा पुन्‍हा पुरवठा करण्‍यास मर्यादा आलेली आहे, तरी युद्धजन्‍य सामुग्रीवर निर्बंध लादण्‍यास ते अपुरे पडत आहेत. पाश्‍चिमात्‍य राष्‍ट्रांनी घातलेल्‍या निर्बंधामुळे ऊर्जा निर्यातीवरील रशियाची मिळकत अल्‍प झाली असली, तरी रशियाने तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्‍यासाठी पाश्‍चिमात्‍य देशांखेरीज अन्‍य इच्‍छुक देश मिळवले आहेत.

४. युक्रेनच्‍या भागांवरील रशियाचे नियंत्रण सुटणे अशक्‍य !

रशियन सैनिकांचे युक्रेनला शरण आणण्‍याविषयी मनोधैर्य खचले असण्‍याची शक्‍यता धरली, तरी रशियाने कह्यात घेतलेल्‍या युक्रेनच्‍या पूर्व आणि दक्षिण या दिशांकडील भागांतून रशियाच्‍या सैन्‍याला माघार घ्‍यायला लावणे, हे युक्रेनसाठी अशक्‍य आहे. युक्रेनच्‍या क्षेत्राची एकात्‍मता राखण्‍यास अमेरिका बांधील आहे. असे असले, तरी रशियाने कह्यात घेतलेल्‍या युक्रेनच्‍या भागांवर युक्रेनचे नियंत्रण आणणे, हे ध्‍येय आता पुष्‍कळ लांब आहे.

५. रशिया-चीन मैत्रीमुळे चीनकडून तैवानवर आक्रमण होण्‍याची शक्‍यता !

या प्रदीर्घ संघर्षाचा लाभ केवळ चीन या एकमेव देशाला मिळाला आहे. वॉशिंग्‍टनमध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या एका अहवालानुसार पश्‍चिमी देशांनी रशियावर निर्बंध लादल्‍याने चीन सर्वांत मोठा यशस्‍वी ठरला आहे. चीन हा रशियाला पैसे पुरवणारा (बँकर) आणि व्‍यापारातील भागीदार ठरला आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि वायू पुरवठा करून घेऊन चीनने ऊर्जेच्‍या सुरक्षिततेविषयी प्रावधान करण्‍यास या युद्धाचा लाभ करून घेतला आहे. चीनने तैवानवर आक्रमण केले, तरी तेल आणि वायू यांचा रशियाकडून होणारा पुरवठा खंडित करता येणार नाही.

जेवढ्या प्रमाणात अमेरिका युक्रेन युद्धात ओढली जाईल, तेवढी चीन तैवानवर आक्रमण करण्‍याची शक्‍यता अधिक प्रमाणात वाढेल. याचा होणारा भयानक भौगोलिक राजकीय परिणाम म्‍हणजे चीन-रशिया युती होईल, याची अमेरिकेला जाणीव झाली आहे. सध्‍या अमेरिका जगातील अग्रगण्‍य ‘लष्‍करी शक्‍ती’ असलेला देश असेल; परंतु चीन आणि रशिया यांच्‍या एकत्रित सैन्‍याशी सामना करणे, हे अमेरिकेसमोर मोठे आव्‍हान असेल.

६. चीनने रशियाला युद्धात साहाय्‍य करण्‍याचा सुप्‍त हेतू

या युद्धामुळे महत्त्वाच्‍या युद्धसामुग्रीचा साठा संपणे, शस्‍त्रास्‍त्रांचे उत्‍पादन योग्‍य प्रमाणात होणे आणि अमेरिका अन् युरोप यांच्‍यामध्‍ये युक्रेनविषयी विचारांचे एकमत न होणे, या पश्‍चिमी राष्‍ट्रांच्‍या लष्‍करातील उणिवा समोर आल्‍या आहेत. या सर्वांमुळे ‘तैवानवर आक्रमण करण्‍यापूर्वी पाश्‍चिमात्‍य राष्‍ट्रांचे शस्‍त्रागार रिकामे करावे’, अशी लालसा चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांची होऊ शकते. ते अप्रत्‍यक्षरित्‍या रशियाला शस्‍त्रे पुरवणे आणि अमेरिका अन् इतर देशांतील सरकारांना युक्रेनला शस्‍त्रे पुरवण्‍यास भाग पाडणे, असा डावपेच ते खेळू शकतात. सध्‍या काही मर्यादित स्‍वरूपात रशिया आणि रशियन संस्‍थांना ड्रोन, ‘नेव्‍हीगेशन’साठी (लढाऊ जहाजांसाठी) लागणारी आयुधे, जॅमिंग तंत्रज्ञान, लढाऊ विमानाचे (फायटर जेट) भाग आणि ‘सेमीकंडक्‍टर’ (एक इलेक्‍ट्रॉनिक भाग) यांचा पुरवठा करून पुतिन यांना या युद्धात साहाय्‍य करत आहे.

७. अमेरिकेची आर्थिक हानी रोखण्‍यासाठी रशिया-युक्रेन यांच्‍यात समेट घडवायला हवा !

पश्‍चिमात्‍य राष्‍ट्रांमधील काहींना वाटते की, वाटाघाटी करून युक्रेनमध्‍ये युद्धबंदी केल्‍यास चीनचे तैवानवर आक्रमण करण्‍याचे धैर्य वाढेल. आक्रमणाचा परिणाम होतो, हे दाखवण्‍यासाठी शी जिनपिंग यांना रशियाची आवश्‍यकता नाही. चीनचा दक्षिण चीन समुद्रापासून हिमालयापर्यंत असलेला विनाखर्चाचा विस्‍तारवाद हा त्‍याचा पुरावा आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्‍या एका अहवालानुसार रशिया-युक्रेन युद्ध प्रदीर्घ काळ लांबवणे यात अमेरिकेला रस नाही. या प्रदीर्घ संघर्षामुळे अमेरिकेचा पैसा आणि शस्‍त्रे युक्रेनला पुरवण्‍यासंबंधीच्‍या त्रुटी वाढतील, नाटो-रशिया यांच्‍यातील संघर्ष वाढेल आणि चीनच्‍या आव्‍हानांना उत्तर देण्‍यासाठी अमेरिकेला अडथळे निर्माण होतील. त्‍यामुळे ‘वाटाघाटी करून समेट घडवून आणणे’, हा युद्ध संपवण्‍याचा एकमेव मार्ग आहे, याची नोंद बायडेन यांनी घेतली आहे. अनेक मासांच्‍या युद्धातून रक्‍तपात आणि विध्‍वंस झालेला आहे. परिणामी असा समेट घडवून आणणे, हे योग्‍य ठरेल.

– प्रा. ब्रह्मा चेल्लानी, नवी देहली (३० मार्च २०२३)

(साभार : https://chellaney.net/)

(प्रा. ब्रह्मा चेल्लानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या केंद्रात ‘स्‍ट्रेटेजिक स्‍टडीज’ (धोरणात्‍मक अभ्‍यास) या विषयाचे प्राध्‍यापक आहेत. त्‍यांना बर्लिन (जर्मनी) येथील ‘रॉबर्ट बॉश अकादमी’ ही शिष्‍यवृत्ती मिळाली असून त्‍यांनी एकूण ९ पुस्‍तके लिहिली आहेत.)