‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला’, या आरोपाचे खंडण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आता पुन्हा विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. त्यातील एक आरोप, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. या आरोपाचे सप्रमाण खंडण येथे देत आहे.
सावरकर यांचा ‘सहा सोनेरी पाने’, हा ग्रंथ ‘समग्र सावरकर खंड ३’मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ४ थे प्रकरण ‘सद्गुण विकृती’ हे आहे. या प्रकरणात सावरकर यांनी ‘हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे काही समस्या निर्माण झाल्या’, असे म्हटले आहे.
१. हिंदूंची लोकसंख्या न वाढण्यासाठी मुसलमान आक्रमकांनी वापरलेली कूटनीती
मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या स्त्रिया पळवून नेल्या, त्यांच्यावर बलात्कार केले, त्यांची हत्या केली. परकीय मुसलमान आक्रमकांनी हिंदूंवर आक्रमण करतांना ते आक्रमण हिंदु स्त्रियांवर लक्ष केंद्रित करून केले आहे. याचे कारण सांगतांना सावरकर या ग्रंथात लिहितात…
‘‘पशूच्या कळपातूनच हा सृष्टीक्रम माणसात आला आहे. गोवंशाच्या कळपात वळूंची संख्या गायीपेक्षा अधिक असेल, तर त्या कळपाची संख्या वृद्धी झपाट्याने होणार नाही; पण ज्या कळपात गायींची संख्या वळूंच्या संख्येपेक्षा अधिक आहे, त्या कळपाची संख्या झपाट्याने पिढी मागून पिढी वाढत जाणारच.’’
याचा अर्थ हिंदु स्त्रियांची संख्या अधिक असेल, तर हिंदूंचे संख्याबळ वाढेल. हिंदु स्त्रियांची संख्या रोडावली, तर हिंदूंची लोकसंख्याही रोडावेल. हिंदूंची लोकसंख्या वाढू नये; म्हणूनच मुसलमानांनी आक्रमण करतांना हिंदु स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना ठार मारले आहे.
२. सावरकर यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेले लिखाण
असा निष्कर्ष सावरकर यांनी काढून ‘सद्गुण विकृती’ या प्रकरणात त्यांनी लिहिले…
‘‘शत्रू स्त्रीदाक्षिण्यासारखी राष्ट्र घातक आणि कुपात्री योजलेल्या प्रकाराच्या सहस्रावधी उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे इथे दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत तिच्या नवर्याकडे पाठवले. पोर्तुगीज किल्लेदाराच्या पराभूत झालेल्या शत्रू स्त्रीला सुद्धा चिमाजी आप्पाने अशाच प्रकारे गौरव करून तिच्या पतीकडे परत पाठवले. या दोन गोष्टींचा गौरवास्पद उल्लेख आजही आपण शेकडो वेळा मोठ्या अभिमानाने करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा चिमाजी आप्पांना महंमद गझनी, घोरी, अल्लाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहीर राजाच्या कन्या, कर्णावतीच्या कर्णराजाची कमलादेवी आणि तिची स्वरूप सुंदर मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी हिंदु राजकन्यांवर केलेले बलात्कार अन् लक्षावधी हिंदु स्त्रियांची केलेली विटंबना याची आठवण पाडाव झालेल्या मुसलमान स्त्रियांचा गौरव करतांना झाली नाही, हे आश्चर्य नव्हे काय ?’’
सावरकर यांनी लिहिलेल्या संपूर्ण उतार्यात कुठेही सावरकर यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला नाही. त्याचप्रमाणे शिवरायांविषयी कोणताही अपशब्द वापरलेला नाही.
३. सावरकर यांनी प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कार्याचे दिलेले दाखले
याच प्रकरणात सावरकर यांनी पुढे आपले वरील विचार कसे योग्य आहेत ? हे सांगण्यासाठी प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे दाखले दिले आहेत.
‘‘ज्या शत्रूच्या स्त्रियांनी आमच्या माता भगिनींना बळाने बाटवून बटीक करून सोडले. त्यांचे स्त्रीत्व त्या आततायी कृत्यामुळेच नष्ट होत होते. स्त्री दाक्षिण्यावरचा त्या आततायी मुसलमान स्त्री समाजाचा अधिकार तेथेच संपून आततायीपणाच्या कठोर दंडावाचून दुसर्या कशावरही त्यांचा अधिकार नसेल. ज्यास्तव ऋषीगणांच्या हत्या करणार्या आणि यज्ञाचा विध्वंस करणार्या राक्षसांसह त्राटिका श्रीरामावर चालून आली, तेव्हा रामचंद्राने त्याच क्षणी तिला ठार मारून टाकले. शूर्पणखा राक्षसीण सीतेला कोवळ्या काकडीसारखी खाऊन टाकण्यास जेव्हा धावली, तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून तिला परत पाठवले. परस्त्री दाक्षिण्यासाठी तिची खणा नारळाने ओटी भरून नव्हे.
नरकासुराने आर्यांच्या सहस्रावधी स्त्रिया पकडून त्यांच्या असुर राज्यात नेल्या. हे पहाताच श्रीकृष्णाने त्या असुरावर स्वारी करून त्याला युद्धात ठार मारले. हा सामाजिक आणि राजकीय सूड उगवूनच श्रीकृष्ण थांबले नाहीत. ज्या सहस्रावधी आर्य स्त्रिया असुरांच्या बंदीत बळाने कोंडून राबवल्या जात होत्या, त्यांना सोडवून परत आपल्या राज्यात आणून सामाजिक सूड उगवला. त्या आर्य स्त्रिया असुरांनी बळाने पळवल्या, भ्रष्ट केल्या, एवढ्यासाठी त्या आपल्या सहस्रावधी राष्ट्रभगिनींना त्याही बाटल्या, असे समजणार्या पौरुषशून्य दूधखुळेपणापायी त्यांना असुरांच्या हाती सोडून श्रीकृष्णाचे सैन्य परत फिरले नाही. उलट त्या सहस्रावधी स्त्रियांना पुनश्च आपल्या राष्ट्रात परत आणून प्रतिष्ठेने स्वसमाजात स्थापून स्वतः भूपती या नात्याने त्यांच्या पालनपोषणाचा आणि संरक्षणाचा साराभार श्रीकृष्णाने स्वतःकडे घेतला.’’
ही उदाहरणे किंवा दाखले देऊन सावरकर सांगतात की, आपण आपल्या स्त्रियांना जर शत्रूपासून वाचवले नाही, तर त्या स्त्रिया शत्रूच्या कह्यात रहातील आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली संतती आपल्या राष्ट्राचे शत्रू बनतील. या हेतूनेच श्रीकृष्णाने राक्षसांनी पळवून नेलेल्या आपल्या स्त्रियांना परत आणले. आपल्या स्वधर्मीय स्त्रियांची संख्या कमी होऊ दिली नाही. तसेच आततायी स्त्रियांचा वध करणे, हा अमानुषपणाही ठरत नाही. हे श्रीरामचंद्रांचा दाखला देऊन सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला हा आरोप तथ्यहीन !
थोडक्यात ‘शत्रूला ‘जशास तसे’ उत्तर देणे, हेच न्याय्य आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सांगायचे आहे. हे सांगतांना सावरकर यांनी कोणत्याही प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान केला नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ‘छत्रपती शिवरायांचा अपमान सावरकर यांनी केला’, हा आक्षेप किंवा हा आरोप तथ्यहीन आहे.
आरोप करणार्यांनी ‘वड्याचे तेल वांग्यावर काढले’, या म्हणीप्रमाणे आरोप केले आहेत. ‘मुसलमानांच्या विकृत मनोवृत्तीला उघड करण्यासाठी आणि मुसलमानांशी ‘जशास तसे’ वागावे’, असे सावरकर सांगतात. त्याचा राग आरोपकर्त्यांना आला. मुसलमानांची बाजू उघडपणे न घेता ‘सावरकर यांनी छत्रपती शिवरायांनाच दोष दिला’, अशी आवई उठवण्यात आली आहे.
५. सावरकर यांच्यावर आरोप करणे हे विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे दिवाळे निघाल्याप्रमाणेच !
सावरकर यांनी छत्रपती शिवरायांवर श्रीशिवगीत, श्री शिवाजी महाराजांची आरती, शिववीर आणि ‘हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’, अशी ४ गीते रचली आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. ‘सहा सोनेरी पाने’च काय; पण सावरकर यांनी लिहिलेल्या कोणत्याही ग्रंथात आणि ग्रंथातील कोणत्याही पृष्ठावर सावरकर यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही किंवा त्यांच्याविषयी एक अपशब्दसुद्धा योजलेला नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणे आणि मुसलमानांचा उदो उदो करणे, हाच ज्यांचा उद्योग झाला आहे, अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केलेल्या आरोपांवर विश्वास ठेवणे, म्हणजे आपल्या बुद्धीचे दिवाळे वाजले, हे आपणच घोषित केल्यासारखे आहे.
(संदर्भ – समग्र सावरकर खंड तिसरा, खंड दहावा आणि खंड सातवा, वीर सावरकर प्रकाशन, पहिली आवृत्ती, वर्ष १९९३)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (४.३.२०२३)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह राष्ट्रपुरुषांची होणारी अपकीर्ती रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा ! |