एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
प्रतिनिधी : श्री. अमोल चोथे, पुणे
पुणे, ९ एप्रिल (वार्ता.) – येथील स्वारगेट बसस्थानकामध्ये प्रवाशांसाठी बांधण्यात आलेली नवीन शेड म्हणजे मद्यपींचा अड्डाच झाला आहे. दिवसाढवळ्या मद्यपी एकत्रित बसून येथे मद्यपान करतात, तर काही जण या शेडचा उपयोग झोपण्यासाठी करतात. अद्याप वापरात नसलेल्या या शेडमध्ये चालू असलेल्या या अपप्रकारांकडे बसस्थानकातील अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
१. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असलेली काही आसने तुटली आहेत.
२. बसस्थानकातील संरक्षक भिंतीच्या बाजूला झाडांचा पालापाचोळा पडून कचरा साठला आहे. परिसरात जंगली झुडपे वाढली आहेत. बसस्थानकाच्या परिसरात कचरा इतरत्र टाकण्यात येतो. याकडे बसस्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे परिसर अस्वच्छ आहे.
३. बसस्थानकाच्या भिंती बुरशीने काळवंडलेल्या असून छताला जळमटे साठली आहेत. पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुळे छत आणि भिंती यांचा रंग उडाला आहे.
४. बसस्थानकातील टिव्ही, पंखे बंद आहेत.
५. अनेक मासांपासून बसस्थानकाच्या आवारात बंदस्थितीत असलेल्या शिवशाहीच्या बसगाड्या लावण्यात आल्या आहेत.
खासगी वाहतूक करणारे बसस्थानकात शिरून प्रवाशांना नेतात त्यांच्या वाहनातून !
खासगी वाहतूक करणारे उघडपणे स्वारगेट बसस्थानकामध्ये शिरून बससाठी थांबलेल्या प्रवाशांना खासगी वाहनांमधून घेऊन जातात. हे प्रकार उघडपणे चालू असूनही बसस्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करतात. एकंदरीत बसगाड्यांचे प्रवासी नेणार्या खासगी वाहतूकदारांवर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |